ट्विन टॉवर्सची दिवसभर सोबत ...
दिवसाची सुरूवात प्रसन्न झाली की सबंध दिवस छान जातो असं म्हणतात. सलग तेरा दिवस प्रसन्न सुरूवात आणि छान दिवस - ही म्हणजे एक जंगी मेजवानीच होती. बरं, रोज त्या प्रसन्नतेचे वेगवेगळे प्रकार! आता त्यादिवशीचंच बघा ना... आदल्या दिवशी खिडकीतून दिसलेल्या विहंगम दृश्यानं समाधान झालं नव्हतं जणू, म्हणून त्या दिवशी सुध्दा उठल्याउठल्या पुन्हा पडदे सारून बाहेर नजर टाकली. धुकं खूप कमी दिसलं. पण त्यामुळे आधी न दिसलेली एक गोष्ट अचानक समोर आली!! चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आणि आदल्या दिवशी धुक्यात लपलेलं क्वालालंपूर शहर!! साताऱ्याहून येताना कात्रजचा बोगदा ओलांडला की कसं अचानक पुणे शहर समोर लुकलुकायला लागतं - अगदी तसंच! मग आम्ही निरनिराळ्या खिडक्यांतून डोकावून बघण्याचा सपाटाच लावला. हॉटेल-लॉबीच्या एका खिडकीतून पूर्वानं लांबवर 'पेट्रोनास ट्विन टॉवर्स' आणि 'के. एल. टॉवर' पण शोधून काढले. पुढचा अर्धा तास मग त्या खिडकीतून फ़ोटो काढण्यासाठी सगळ्यांची रांगच लागली.
त्या दिवशीची पहिली आकर्षणाची गोष्ट होती ती म्हणजे 'दिवसाचा 'केबल कार'चा प्रवास'. आदल्या दिवशी करकरीत तिन्हीसांजेला त्या काळ्याकुट्ट जंगलानं मनावर जे दडपण आणलं होतं ना ते मला झुगारून द्यायचं होतं. त्या जंगलाची ती तशी आठवण मला पुसून टाकायची होती आणि झालंही तसंच.
ते घनदाट पर्जन्यवन आता सकाळच्या कोवळ्या, प्रसन्न उन्हात फारच देखणं वाटत होतं. 'अचानक होणाऱ्या बिघाडा'चा विचारही शिवला नाही मनाला ... कारण कुठल्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी वाटेत ठिकठिकाणी अतिशय उत्कृष्ट यंत्रणा उभी केलेली दिसत होती आणि निसर्गदृश्याचं

.... परतीचा तो प्रवास आदल्या दिवशीपेक्षा फारच पटकन झाल्यासारखा वाटला. आदित्यच्या दृष्टीनं मात्र थीम-पार्क, केबल-कार वगैरे सगळं केव्हाच भूतकाळात जमा झालं होतं कारण आमची बस आता 'चॉकोलेट फ़ॅक्टरी'च्या दिशेनं निघाली होती!
त्या चॉकोलेट फ़ॅक्टरीचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे केवळ शाकाहारी चॉकोलेट्स बनवली आणि विकली जातात. 'चॉकोलेट फ़ॅक्टरी' नावावरून वाटलं होतं की चॉकोलेट्स बनवण्याची प्रक्रिया पहायला मिळेल. पण प्रत्यक्षात आम्ही गेलो ते चॉकोलेट्सच्या दुकानात. सुरूवातीलाच, तिथल्या एका विक्रेत्याने सगळ्यांना खूष करून टाकलं - मलेशियन उच्चारांच्या इंग्रजीत माहिती देताना आम्हाला चक्क २-३ हिंदी वाक्यं ऐकवली. ती सुध्दा उगीच इकडची तिकडची नाहीत तर कुठली चॉकोलेट्स स्वस्त पडतील ते मुद्दाम हिंदीत सांगितलं. आधीच शाकाहारी चॉकोलेट्स म्हटल्यावर तमाम जोशी, परांजपे, छत्रे मंडळी सरसावली होती; त्यात आता स्वस्त चॉकोलेट्स कुठली ते ही कळलं. मग आदित्यची काय कथा... सगळ्या मोठ्या माणसांनासुध्दा 'हे घेऊ की ते घेऊ' असं झालं होतं. एकदा त्या चॉकोलेट्सची खरेदी झाल्यावर आदित्यच्या दृष्टीनं सहल 'सुफळ संपूर्ण' झालेली होती. त्यानंतरचे दोन दिवस तो 'आता उरलो उपकारापुरता' अश्या अविर्भावातच वावरत होता.
अर्ध्या-पाऊण तासानं, त्या दुकानाचा भरपूर फायदा करून दिल्यावर तिथून निघालो. गेंटिंग हायलंड परिसराला टा-टा करून आमची बस आता क्वालालंपूरच्या दिशेनं निघाली. उरलेला दिवस 'क्वालालंपूर दर्शना'चा कार्यक्रम होता.
प्रथम घड्याळांच्या एका मोठ्या दुकानात गेलो. Window Shopping आणि खरंखुरं shopping यात तासभर घालवून मग प्रसिध्द Batu Caves पहायला गेलो.
वर्षानुवर्षं पाऊसपाणी झेलत उभ्या असलेल्या डोंगरांत नैसर्गिकरीत्या त्या क्षारांच्या गुहा तयार झालेल्या आहेत. काही-शे वर्षांपूर्वी त्यांचा शोध लागला. मग तिथे कार्तिकस्वामींचं देऊळ बांधण्यात आलं. जगातलं ते एकमेव असं कार्तिकस्वामींचं देऊळ आहे की जिथे स्त्रियांनाही प्रवेश आहे म्हणे. २७० पायऱ्या चढून गेल्यावरच ते दुर्लभ दर्शन होणार होतं. खरंतर असल्या भेदभावांची मला मनस्वी चीड आहे. पण पुन्हा एकदा मी स्वतःलाच समजावलं की 'देऊळ बघायला' म्हणून जायचंच नाही. त्याऐवजी 'निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार' पहायला म्हणूनच जायचं.
ती पायऱ्यांची संख्या ऐकूनच अर्ध्याअधिक आजी-आजोबांनी माघार घेतली. बाकीच्यांनी गिर्यारोहण सुरू केलं. आमच्या सहाजणांपैकीही दोनच गडी होते त्यांत - मी आणि आदित्य. पायथ्यापाशी

.... पण, १५ मिनिटांनी जेव्हा वर पोचले आणि त्या गुहांचा दर्शनी भाग जेव्हा दृष्टीस पडला तेव्हा इतके कष्ट घेतल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं ... अनंत काळापासून जमत आलेले क्षार आणि त्यांपासून बनलेले तिथले चित्रविचित्र आकार खरंच थक्क करणारे होते. दोन दिवसांत दुसऱ्यांदा निसर्गापुढे नतमस्तक होण्याची वेळ आलेली होती. प्रत्यक्ष देवळापाशी पोचायला पुढे थोडं चालत जायचं होतं. 'गुहा' म्हटल्यावर जे डोळ्यांस

अर्ध्या तासानं उन्हातून थकून-भागून खाली उतरलेल्या मंडळींची क्षुधाशांती करायला एक शहाळंवाला हजर होताच आणि तो ही आदित्यनंच शोधून काढलेला ... त्याच्याकडचे नारळही बॅंकॉकसारखेच - मोठे, जड, पसरट आणि बाहेरून पांढऱ्या रंगाचे.
तिथून जायचं होतं के. एल. टॉवर पहायला ... किंबहुना के. एल. टॉवरवरून संपूर्ण क्वालालंपूर शहर पहायला. निसर्गनिर्मित चमत्कार पहायला २७० मानवनिर्मित पायऱ्या चढून झाल्या, आता मानवनिर्मित चमत्कार पहायला 'लिफ़्ट' सारख्या अजून एका मानवनिर्मित चमत्काराच्याच मदतीने हजार-बाराशे फ़ूट उंची गाठायची होती. के. एल. टॉवरच्या Observation Deck वर आम्ही जाणार होतो. दूरसंचारासाठी वापरल्या जाणाऱ्या जगातल्या पाच सर्वात उंच टॉवर्समध्ये तो गणला जातो. हजा

नावाप्रमाणेच आसपासचा परिसर न्याहाळण्याची ती जागा होती. चहूबाजूंना काचेच्याच भिंती होत्या. खाली विस्तीर्ण पसरलेलं शहर दिसत होतं.... आणि समोरच जणू एखादी शेजारची इमारत दिसावी तसे 'पेट्रोनास ट्विन टॉवर्स' दिसत होते. अगदी जवळ - शंभर पट Zoom-in केल्यासारखे!!! त्यांचं धातूचं बाह्य चंदेरी आवरण उन्हात चमचम करत होतं. त्यांच्यासमोर इतर उत्तुंग इमारती खुज्या वाटत होत्या.
अर्धा तास तिथे होतो, बरंच काही डोळ्यांत साठवायचा प्रयत्न केला. पण हळुहळू, त्या हजार फ़ूट उंचीवरसुध्दा पोटात भुकेमुळे तेवढाच खोल खड्डा पडायला सुरूवात झाली होती. तुम्ही हजार फ़ूट उंचीवर असा किंवा जमिनीखालच्या एखाद्या खोल खाणीत असा ... शरीराचं घड्याळ टिकटिक करत भुकेच्या, झोपेच्या वेळांची जाणीव करून देण्याचं थांबवत नाही!
त्या टॉवरच्या तळमजल्यावरच्या रेस्तरॉंमध्ये जेवण होतं. मिनिटभराच्या आत लिफ़्टनं पुन्हा 'जमिनीवर' आलो. रेस्तरॉ रिकामं होतं आणि गरमागरम जेवण आमची वाट बघत होतं. जोडीला कांदा-भजी, गोडाचा शिरा आणि मुख्य म्हणजे दही होतं मस्तपैकी!! सगळ्यांनी आडवा हात मारला ते सांगायला नकोच - विशेषतः शिऱ्याचं भांडं तर पटापट रिकामं होत होतं.
जेवणानंतर निघालो. पेट्रोनास टॉवर्सपाशी फक्त फ़ोटो काढायला थांबायचं होतं. दरम्यान ढग भरून आले होते आणि भुरभूर पाऊस पडायला सुरूवात झाली होती ..... चुटपुट क्र. तीन!! पावसात फ़ोटो काढायला बसमधून उतरावं की नाही ते ठरेना थोडा वेळ. मी आणि अजय उतरलोच शेवटी आणि तेच बरं झालं, नाहीतर इतर उतरलेल्या लोकांनी काढलेले फ़ोटो नंतर पाहून 'चुटपुट क्र. चार' व्हायला वेळ लागला नसता.... कसेबसे १-

त्या दोन्ही टॉवर्सच्या ४१व्या आणि ४२व्या मजल्यांना जोडणारा एक पूल आहे. पर्यटकांना तिकीट काढून त्या पुलापर्यंत जाता येतं आणि त्यासाठी पहाटेपासून लोकांच्या रांगा लागतात असं कळलं. सांगायचा मुद्दा म्हणजे काही मिनिटांपूर्वी 'चुटपुट क्र. चार' टाळल्याच्या माझ्या आनंदावर ताबडतोब विरजण पडलं होतं....
भुरभुरणाऱ्या पावसातून बसमधूनच गाईडनं 'हायकोर्ट, ब्रिटीशकालीन फ़ुटबॉल मैदान' इ. २-३ ठिकाणं दाखवली. बस जसजशी वळणं घेत होती तसतसे ते ट्विन टॉवर्स कधी उजवीकडे, कधी डावीकडे, कधी मागे, कधी समोर असे दिसतच राहिले.
आता पाऊस थांबला होता. आम्हाला उतरायचं होतं एक चिनी देऊळ पहायला. पुन्हा एकदा, त्या देवळाची रंगसंगती, वास्तुरचना सगळंच वेगळं आणि बघण्यासारखं होतं. चिनी-जपानी घरांची छपरं, देवळांचे कळस दोन्ही टोकांना कुत्र्याच्या शेपटीसारखे गुंडाळलेले दिसतात. ते आकार मला फार आवडतात.... आणि त्यात वापरलेला भगवा आणि हिरवा रंग सुध्दा. आपल्या देवळांत देवाच्या पायाशी तुळशीपत्रं, बिल्वपत्रांच्या रुपात हिरवा रंग असतो, डोक्यावर शेंदराचा भगवा रंग असतो - तिथे देवळाच्या कळसावरच हे दोन्ही रंग विराजमान झालेले होते.
लांबवर पुन्हा ट्विन टॉवर्स नजरेस पडले. आयफ़ेल टॉवरचं वर्णन करताना पु. लं. नी 'अपूर्वाई'त लिहिलंय की पुण्यात जशी पर्वती कुठूनही दिसते तसाच आयफ़ेल टॉवर पॅरिसमध्ये कुठूनही दिसतो. त्याप्रमाणेच पेट्रोनास ट्विन टॉवर्स क्वालालंपूरमध्ये कुठूनही दिसतात!
चिनी देवदर्शनानंतर मलाय राजप्रासाददर्शन होतं... पण फक्त बाहेरूनच. राजवाडा म्हटला की तो भव्य, सुंदर, स्वच्छ असायचाच - तसाच तो ही होता. आत प्रवेश नसल्यामुळे यापलिकडे त्याबद्दल काही कळू शकलं नाही.
.... 'क्वालालंपूर दर्शन' संपलेलं होतं. आता हॉटेलवर परतायची वेळ झालेली होती. पण 'हॉटेलवर परतायचं' म्हणायला आम्ही अजून आमचं तिथलं हॉटेल कुठे पाहिलं होतं. लगेच उत्सुकता जागी झाली - इथलं हॉटेल कसं असेल, आधीच्या सगळ्या हॉटेल्ससारखंच की त्यांपेक्षा जास्त चांगलं असेल वगैरे, वगैरे. जास्त विचार करावा लागला नाही, ५-१० मिनिटांत बस Hotel Pearl International च्या आवारात शिरलीच.
प्रथमदर्शनी हॉटेल एकदम झकास वाटलं. खोल्या ताब्यात मिळायला जवळजवळ अर्धा-पाऊण तास लागला. दिवसभराच्या दगदगीपायी तो वेळ थोडा कंटाळवाणा गेला, शिवाय 'अजून फक्त २ दिवस, मग परतायचंय' याचीही प्रथम

इकडे आदित्यला खाली पाचव्या मजल्यावरचा पोहोण्याचा तलाव खिडकीतून जास्तच खुणावायला लागला होता. आता त्याच्याबरोबर जाणं भाग होतं.
तासभर पाण्यात डुबक्या मारून झाल्यावर त्याला बाहेर काढलं. तसंही संध्याकाळचे सात म्हणजे तलाव बंद होण्याची वेळ झालेलीच होती. रात्रीच्या जेवणाचं ठिकाण हॉटेलपासून थोडं लांब होतं. त्यामुळे आम्ही साडेसातलाच निघालो. त्यादिवशी प्रथमच जेवणाबरोबर ग्लासभर ताक मिळालं. त्यामुळे मजा आली जेवायला. चारही देशांपैकी फक्त मलेशियातच आम्हाला ताकदह्याचं दर्शन घडलं....
साडेदहा वाजून गेले होते. हॉटेलवर परतलो. आता रात्रीच्या अंधारात ट्विन टॉवर्सच्या त्या दोन रेषा पिवळ्या दिव्यांनी झगमगत होत्या. रस्ते अजूनही वाहतच होते. ते वाहणारे रस्ते त्या खिडकीतून बघायला इतके का छान वाटत होते ते तेव्हा माझ्या लक्षात आलं - धावणारी वाहनं दिसत होती, त्यांचे लाल-पिवळे दिवे दिसत होते पण कर्णकर्कश्श हॉर्न्स कानावर आदळत नव्हते की पेट्रो

.... पण त्या सगळ्यावर बोळा फिरवणारी गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळीच ते हॉटेल आम्हाला सोडायचं होतं!!! सर्वात आवडलेल्या हॉटेलमध्ये आमचं सर्वात कमी वास्तव्य होतं. एकाच दिवसात चुटपुटींचा आकडा तीननं वाढला होता ....!!!
No comments:
Post a Comment