पहिला दिवस - पुढे चालू ...



आयुबोवान !!


विमान सुटलं तेव्हा ३ वाजून गेले होते म्हणजे दुसरा दिवस केव्हाच सुरू झाला होता. पण ते मेंदूला कसं कळणार झोप काढल्याशिवाय !!!

वैमानिकाने सूचना दिली आणि एकदम विमानाने वेग घेतला ... आजपर्यंत जास्तीतजास्त ताशी १२० कि.मी. वेगाची सवय ... हा वेग म्हणजे त्याहून 'कै-च्या-कै' होता. थोडा वेळ डोळे मिटून दीर्घ श्वसन करत बसले. साध्या अर्ध्या-एक तासाच्या बस प्रवासातही मला मळमळतं ... त्यामुळे मी मनाची तयारी करुन गेले होते. खिश्यात अव्हॉमिन होती. विमानात टेक-ऑफ़ आणि लॅंडिंगच्या वेळेसच त्रास होतो असं अजयनेच सांगितलं होतं. आश्चर्य म्हणजे मला काहीही त्रास झाला नाही. फक्त टेक-ऑफ़ केल्यावर डोकं एकदम जड झालं आणि दुखायला लागलं. पण त्यात जागरणाचा पण सहभाग होता असं आता मला वाटतंय. आदित्य खिडकीतून खाली पाहत 'आई हे बघ, ते बघ' करत होता. पण मी ते टाळलं. म्हटलं उगीच अजून त्रास नको व्हायला. आजी-आजोबांना काही त्रास झाला नाही. अजयला होणार हे अपेक्षितच होतं. आईला पण झाला थोडा. खूप पोट दुखून उलटी होईल की काय असं तिला वाटलं थोडा वेळ - पण तेवढंच.

श्रीलंकेच्या स्थानिक वेळेनुसार आम्ही पहाटे ५ वाजता पोचणार होतो. म्हणजे साधारण अडीच तासांचा प्रवास होता. 'आता जरा झोप काढूया' असा विचार करेपर्यंत खाणं-पिणं यायला सुरूवात झाली. पहाटे पावणेचारला कॉलिफ़्लॉवर मांचुरिअन खाईल का कुणी ??? बऱ्याच जणांनी खाल्लं; ऍपल ज्यूस प्यावंसं वाटेल का कुणाला? आदित्यला वाटलं !!! अर्थात, विमानप्रवासात काळवेळेचा विचार करायचा नसतो हे आम्ही पुढच्या १५ दिवसांत शिकलो आणि जे जेव्हा समोर ये‍ईल, ते तेव्हा निमूटपणे खायलाही शिकलो ... घड्याळाकडे न बघता !!!

जेमतेम डुलकी लागत होती तोपर्यन्त लॅंडिंगची सूचना ऐकू आली. पाण्यात भिजलेली कार्टून्स कशी मान हलवून पाणी झटकतात, अक्षरशः तशी मान झटकावी लागली डोळे उघडण्यासाठी ... आपण आपल्या देशाची हद्द ओलांडून आलोय याची जाणीव झाली, उत्सुकतेने पुन्हा उचल खाल्ली आणि २४ तासाच्या जागरणाला मागे ढकलले. श्रीलंकन क्षितीजावर फटफटत होतं, आमचं विमान उतरत होतं.

आपापलं सामान घेऊन निघालो. दारात हवाई सुंदरी होतीच 'आयुबोवान' करायला ... हा सिंहली भाषेतला 'राम-राम' !! (आणि हो, सिंहली भाषेत 'धन्यवाद'ला 'स्तुती' म्हणतात - ही माहितीत पडलेली अजून एक भर !) दरम्यान, कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिक गप्पा मारत बसलेले आदित्यने पाहून घेतले.


२२ ऑक्टो. - दुसरा दिवस.

बंदारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ - श्रीलंकेचा एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ. नकळत तुलना झाली. हा जास्त उजवा वाटला. पर्यटनाच्या दृष्टीने केलेले प्रयत्न लक्षात आले लगेच. श्रीलंकेच्या चार महत्त्वाच्या उद्योगधंद्यांपैकी पर्यटन हा एक आहे.
Arrival Forms भरले. Visa on Arrival च्या रांगेत उभे राहिलो. पुन्हा एकदा, अतिशय आत्मविश्वासाने वावरणारा एक ११ वर्षांचा मुलगा माझ्या पुढे रांगेत उभा होता !!! त्याच्या नावाची हॅन्डबॅग एका हातात, दुसऱ्या हातात पासपोर्ट आणि फ़ॉर्म ... कुठल्याही प्रश्नोत्तरांना तोंड द्यायच्या तयारीत ... जणू या गोष्टी तो लहान असल्यापासून करत आलाय !!!
व्हिसा, सिक्युरिटी - सगळं पार पडलं. तिथून पुढे आलो. २४ तासांच्या आत पुन्हा इथेच यायचंय याची तेव्हा जाणीव झालेली नव्हती !!! आता डोळे आणि डोकं दोन्ही झोप, झापड, पेंग या सगळ्याच्या पलिकडे पोचले होते. सर्वांनी आपापली घड्याळं तिथल्या वेळेनुसार लावली. 'विमानात बसणे' या पाठोपाठ आदित्य या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता !!! त्याला त्याच्या घड्याळातली वेळ पुढे-मागे करण्यातली मजा अनुभवायची होती.

परकीय चलन - मला आणि आदित्यला जाम उत्सुकता असलेली अजून एक गोष्ट !!! 'आत्ता किती अमेरिकन डॉलर्स बदलून घ्यायचे' यावर एक चर्चासत्र झालं. १ श्रीलंकन रुपया म्हणजे आपले ५० पैसे. त्यामुळे चलन बदलल्यावर एकदम 'मालदार पार्टी' असल्यासारखं वाटायला लागलं. २०-२५ मि. नंतर आमची बस आली. कोलम्बोजवळच निगम्बो म्हणून एक गाव आहे तिथे आमचं हॉटेल होतं. १५-२० कि.मी. अंतर असावं. 'असावं' अश्यासाठी लिहीलं की बस हलताक्षणी मला मळमळायला लागलं होतं ... खिडकीतून बाहेर 'गम्मत' वगैरे बघण्याचं त्राण नव्हतं. वाऱ्यावर डोलणारी श्रीलंकेची शेतं पाहण्याची संधी हुकली आणि पुन्हा तसंच ... जरा डुलकी लागेपर्यंत हॉटेल आलं. २२ ऑक्टोबरच्या आमच्या दिवसभराच्या कहाणीचं हेच शीर्षक होतं - 'जरा डुलकी लागेपर्यंत ...'


साडेसहाच्या सुमाराला हॉटेल वर पोचलो. सामान आणि खोल्यांच्या किल्ल्या मिळेपर्यंत अजून थोडा वेळ गेला. १० वाजता पुन्हा खाली जमायचं होतं. १५ दिवस भटकायला म्हणून बाहेर पडलेले आम्ही पण त्या क्षणी 'नको आज कुठे जायला' असं वाटत होतं. खोल्या मस्त होत्या, शिवाय प्रशस्त बाल्कनी आणि समोर समुद्र - क्या बात है !!! अगदी समुद्रकाठावरच हॉटेल उभं होतं. फक्त आत्ता त्या सगळ्याचं रसग्रहण करण्याचा कुणालाही उत्साह नव्हता.
अजयची तर पुरती वाट लागली होती. (ती त्याची तशी अवस्था अजून २-३ दिवस राहणार होती.) त्याने जे गादीवर अंग झोकून दिलं, थोड्याच वेळात तो घोरायला लागला. बसमध्ये एक झोप काढून आदित्य पुन्हा टुणटुणीत झाला होता. आमच्या तीनही खोल्यांमध्ये तो मोकाट वावरत होता. मी पण झोपायचा एक अयशस्वी प्रयत्न केला ...

९ च्या सुमाराला उठून आंघोळ केली, जरा ताजंतवानं वाटलं. खाली जाऊन नाश्ता केला. मी उठवलं नसतं तर अजय तसाच दिवसभर झोपून राहिला असता !!!! पण मी त्याला चलण्याचा आग्रह केला. १०.३० वाजता कोलंबो शहराच्या भटकंतीला निघालो. बसमध्ये पण तो पूर्णवेळ मान खाली घालून, डोळे मिटूनच बसला होता.
बस छान होती - ए/सीत गार वाटत होतं. १५ दिवस उकाडा, घाम, धूळमाती - सगळं विसरायला झालं होतं. आमचा त्यादिवशीचा गाईड - मि. देवा - मोडक्यातोडक्या इंग्रजीमध्ये पण छान, व्यवस्थित माहिती देत होता. मुख्य म्हणजे फालतू चर्पटपंजरी नव्हती. मी त्याला श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजाबद्दल विचारले. सिंहली, तामिळ, ख्रिश्चन आणि बौध्द हे चार प्रमुख वंश आहेत तिथे. त्यांचे प्रतिनिधित्व करणारे चार रंग झेंड्यावर आहेत. लोकांनी साहजिकच 'रावण' हा विषय काढला. रावण हा तिथे फारसा लोकप्रिय नाही. अशोकवनाची जागा पहायची अनेकांची इच्छा होती. पण रावणाची आठवण म्हणून तिथे कुठलंही स्मारक नव्हतं - निदान कोलम्बोत तरी नव्ह्तं. (तिथे 'कोलम्बो'चा उच्चार 'क्लांबो' असा करतात.) रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांचे क्रमांक ३-४ वेगवेगळ्या रंगांत रंगवलेले दिसले. म्हणून मी त्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ विचारला. तर एक आश्चर्यकारक माहिती मिळाली. २-३ वर्षांपूर्वीपर्यंत तिथे वाहनांच्या क्रमांकांबद्दल कुठलाही नियम नव्हता. ज्याला ज्या रंगाची जशी पाटी हवी तशी तो लावू शकत होता. पण आता नाही. आता त्याचे नियम ठरवले गेले आहेत.
वाटेत २-३ ठिकाणं दाखवली गेली पण बसमधूनच. दुपारी 'स्वातंत्र्य स्मारका'पाशी जेवायला थांबलो. अजय बसमधून खाली उतरून जेवायलाही तयार नव्हता. पण नंतर आला. तिथे आम्ही पाण्याच्या तीन बाटल्या विकत घेतल्या. ३३ श्रीलंकन रुपयांना ३ बाटल्या. परदेशी चलनाने केलेली पहिली खरेदी !!! लगेच मनातल्यामनात हिशोब केला - म्हणजे आपले साडेसोळा रुपये ... फक्त !!! सुटे पैसे परत घेताना कळलं की '१०' ला सिंहली भाषेत 'दहाय' म्हणतात. मी त्या माणसाला लगेच सांगितलं की आमच्या मातृभाषेत पण याला आम्ही 'दहा' म्हणतो. त्याला कितपत कळलं कोण जाणे पण मला सांगताना खूप मजा आली !!!
जेवणानंतर पुन्हा बस निघाली. 'द हाउस ऑफ़ फ़ॅशन'मध्ये खरेदीचा कार्यक्रम होता. आधीच खरेदी माझी आवडीची गोष्ट, त्यात कपड्यांची खरेदी त्याहून आवडीची. तास-दीड तास कसा गेला कळलं नाही. तिथून निघालो, पुन्हा वाटेत बसमधूनच २-३ ठिकाणं पाहिली आणि संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला हॉटेलवर परत आलो. वाटेत जोरदार पाऊस लागला. हॉटेलवर पोचलो तेव्हा पण पाऊस सुरूच होता. माझा आणि आदित्यचा पोहोण्याचा बेत ओम-फस्स झाला. शिवाय मला समुद्राचे फ़ोटो काढायचे होते ते पण जमलं नाही.
चहा-कॉफ़ी पिऊन सगळेजण आडवे झाले. कधी झोप लागली कळलंही नाही. ७.३० नंतर रात्रीचं जेवण सुरू होणार होतं. ८-८.३० ला जाग आल्यावर उठून जेवून आलो.
जेवण झाल्यावर सौ. शिंदेनी सांगितलं की पहाटे ३ वाजता फ़ोनवरून गजर होईल. गजर झाल्याझाल्या सर्वांनी कार्गो सामान खोलीच्या बाहेर आणून ठेवायचं - म्हणजे सगळं सामान आवरूनच झोपायचं होतं. मनात म्हटलं की 'अरे बाप रे! कसं काय जमायचं !!!' खोलीवर परत आल्यावर अपुऱ्या झोपेपायी सामान आवरायचं उलगडेना. त्यात अजय साफ आडवा होता. त्याच्या मदतीची शक्यता नव्हती. कसंतरी करून १० वाजता झोपलो.

जाग ये‍ईल की नाही याची चिंता होती, त्यात त्या फ़ोनचा आवाज इतका मंजूळ होता की त्याने निदान मला तरी जाग येणं कठीणच होतं.

सहलीचा पहिला दिवस अतिशय धावपळीचा गेला होता. दुसऱ्या दिवशी उठून बॅंकॉकला जायचं होतं. पहाटे ३ वाजता उठायचं होतं ...

अपुरी झोप पूर्ण करायला आम्हाला अजून २४ तास वेळ मिळणार नव्हता ...

1 comment:

Anonymous said...

Chala, tumchya barobar amchi suddha singapore trip hotiye. Tuzya varnanamule ekhada picture baghat asalyasarakha vatatay. Good sisu, keep it up!