२८ ऑक्टोबर - आठवा दिवस



वलयांकित शहरात प्रवेश ...


विमान-प्रवास असूनसुध्दा त्यादिवशी सकाळी फारसं लवकर उठायचं नव्हतं. ११ वाजता 'चेक-आऊट' होतं. सगळं आवरून 'डिस्कव्हरी' वरचा एक कार्यक्रम पण पाहून झाला तरी निघायला अजून अवकाश होता. मग खोलीतून बाहेर आले.
आमच्या मजल्यावर एका बाजूला एक छोटीशी गच्ची होती जिचं दार त्यादिवशी उघडं दिसलं. आमच्या खोलीच्या खिडकीतून समोर अजून एक ठोकळा इमारतच दिसायची. म्हटलं बघू त्या गच्चीत जाऊन काय दिसतंय ते .... तर डावीकडे एक वाहता रस्ता आणि उजवीकडे 'बयोके स्काय' हे बॅंकॉकमधलं सर्वात उंच ८०-९० मजली हॉटेल - असं एकदम मस्त दृश्य दिसलं. त्याच बयोके स्कायच्या पायथ्याशी 'करी पॉट' होतं. रोज तिथे जेवायला गेलो की एकदातरी मी मान वर करून जे उंच हॉटेल वऽऽरपर्यंत बघायचा प्रयत्न करायचे तेच हे. अध्ये-मध्ये इतर कुठ्ल्याही इमारतीचा व्यत्ययही नव्हता. पण, जरा फ़ोटो काढेपर्यंत 'बस आली' असं कळलं....१-२ दिवस आधीच तिकडे लक्ष गेलं असतं तर काही बिघडलं असतं का?? पण काही गोष्टींची चुटपूट ही लागलीच पाहिजे ना! प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली तर कसं चालेल!!!

'फ़र्स्ट होटेल' ला टा-टा करून निघालो. सुदैवाने फारशी रहदारी नव्हती. त्यामुळे अर्ध्या-पाऊण तासात विमानतळावर पोचलो. आधीच त्या विमानतळाच्या मी प्रेमात पडलेली होते. त्यात त्यादिवशी तिथलं 'डिपार्चर लाऊंज' पाहून तर अजूनच प्रभावित झाले. 'ए ते जे' अश्या १० ओळी आणि प्रत्येक ओळीत १५ ते २० काऊंटर्स होते. त्यापैकी 'जी - १०,११,१२' या काऊंटर्सवर 'फ़्लाईट नं. एल एक्स १८२' ही अपेक्षित अक्षरं झळकताना दिसली. सामान 'चेक-इन' साठी उभे राहिलो. आजी-आजोबांनी बसायला जागा शोधली. कारण आता तिथेच किमान तास-दीड तास तरी जाणार होता. शिवाय एक अनपेक्षित गोंधळ होणार होता ...
इतरांबरोबरच आमचे ५ जणांचे बोर्डिंग पासेस मिळाले पण सासूबाईंचा नाही मिळाला. म्हटलं - झाला असेल पुढे-मागे, मिळेल पण नाहीच मिळाला ... मग गेला कुठे? काहीतरी गोंधळ नक्कीच होता. 'श्रीलंकन' कडून तिथे आलेल्या चुकीच्या माहितीमुळे त्या एका तिकिटाचा व्हाऊचर नं. जुळत नव्हता .... पण त्यामुळे बोर्डिंग पास आम्हाला ताब्यात मिळेना आणि तो ताब्यात मिळाल्याशिवाय पुढे 'सिक्युरिटी चेक' ला जाता ये‍ईना. आमच्याजवळची तिकिटं दाखवूनसुध्दा काही उपयोग होईना. मग त्या ऑपरेटरने 'श्रीलंकन' ला फ़ोन केला. तो लागेना. फ़ॅक्स पाठवला आणि 'उत्तर मिळेपर्यंत मी काही करू शकत नाही' असं सांगितलं. इकडे आमचे इतर सगळे सहप्रवासी पुढे निघून गेले आणि काऊंटरपाशी आम्ही सहाजण आणि शिंदे पति-पत्नी असेच उरलो. आदित्यनं आजीला चिडवायला सुरुवात केली - 'तू रहा इथेच, आम्ही जातो सिंगापूरला' म्हणून!!!
ऍनाची आणि शिंदेंची धावपळ सुरु झाली. आमच्या हातात काहीच नव्हतं त्यामुळे शांतपणे बघत उभे राहिलो... करणार काय दुसरं?? दरम्यान मध्येच ऍना कुठेतरी गायब झाली, ती उगवली एकदम २०-२५ मिनिटांनी. तिने 'श्रीलंकन' च्या ऑफ़िसमधल्या एकीला पकडून आणलं होतं सोबत. मग त्या काऊंटरपाशी भारतीय इंग्रजी, थाई इंग्रजी आणि सिंहली इंग्रजी अशी थोडा वेळ खिचडी झाली, हातवारे झाले आणि शेवटी 'विमानातली जागा निश्चित राहील पण नवीन तिकिट खरेदी करावं लागेल' असं कळलं. अर्थात ती जबाबदारी शिंदेंची होती. त्यांनी चार-साडेचार हजार बाथ भरून एक नवीन तिकिट घेतलं. आधीच्या तिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठी सहल संपल्यावर त्यांना धावपळ करावी लागणार होती ती वेगळीच. तरी त्यांच्या मते हा गोंधळ थोडक्यात निस्तरला होता आणि तो ही केवळ ऍनामुळे. तिचे आभार मानले, टा-टा केलं. आम्ही आपापसात 'तला-तला' करेपर्यंत ती दिसेनाशीही झालेली होती. 'यथा काष्ठं च ...' या उक्तीनुसार दुसऱ्या दिवशी येणाऱ्या अजून एखाद्या गृपचं ती पुन्हा तसंच स्वागत करणार होती ...

विमान सुटायला अजून अर्धा-पाऊण तास अवकाश होता. 'चार तास आधी चेक-इन'चा आम्हाला असा फायदा झाला होता. शिवाय गृपबरोबर आल्याचाही फायदा होता!! आमचं आम्ही स्वतंत्रपणे आलो असतो आणि असा काही गोंधळ झाला असता तर आम्ही काय करणार होतो कोण जाणे!!!
सिक्युरिटीतून पुढे सरकलो, बोर्डिंग गेट तिथून कुठल्या-कुठे लांब होतं. चालत जायला १५-२० मि. लागली. या सगळ्या गोंधळामुळे विमानतळावरची दुकानं वगैरे मात्र पाहता आली नाहीत. खरं तर तो सगळा भाग पाहण्यासारखा होता. तरा-तरा चालत बोर्डिंग गेटपाशी पोचलो, जरा ५-१० मि. खुर्चीत विसावतोय तोपर्यंत निघायची वेळ झाली......

त्यादिवशीचं आमचं विमान होतं 'स्विस एअर' चं. गोऱ्या कातडीबद्दल आपल्या मनात कायम एक आकर्षण असतं. त्यामुळे त्यादिवशीसुध्दा 'अरे वा! आज स्विस एअर ने जायचंय!' अशी उगीचच एक उत्सुकता होती. खरं तर त्यात विशेष असं काहीही नव्हतं पण तरी.
विमानात प्रवेश केला तोच 'बिज़िनेस क्लास' मध्ये. त्याक्षणी लक्षात नाही आलं ते; उलट रुंद, ऐसपैस सीट्स पाहून मी खूष झाले थोडा वेळ. स्विस एअरचं मनातल्या मनात गुणगान करायला सुरुवात केली. कारण १-२ प्रवासातच इकॉनॉमी क्लासला मी वैतागले होते. विमानप्रवासाचं आकर्षण कुठल्याकुठे गायब झालेलं होतं.
पण हा माझा सगळा आनंद क्षणभंगूर ठरला - ठरणारच होता ... इकॉनॉमी क्लास नामक काडेपेटीत पुढचे तीन-साडेतीन तास बसायचं होतं. ते तसं दिवस-दिवस बसून युरोप-अमेरिकेचा प्रवास करणारे खरंच महान!!
आपापल्या जागांवर बसलो. कधी एकदा समोरचा रिमोट हातात घेतोय आणि त्यावरची बटणं दाबायला सुरूवात करतोय असं आदित्यला झालं होतं. या वेळी सहाजणांत मिळून एकच खिडकीची सीट मिळाली होती ती पण पुन्हा एकदा पंखाजवळची. केवळ व्हिडियो-गेम्स होत्या म्हणून नाहीतर आदित्यने मला एकदाही खिडकीत बसू दिलं नसतं.
ठरलेल्या वेळेला विमान हवेत झेपावलं. 'स्विस' मुळे हवाई-सुंदरींचे गणवेष वगैरे पाहण्यासारखे होते - दोनदा 'श्रीलंकन' च्या साड्या पाहिल्यावर तेवढंच जरा काहीतरी नाविन्य!! जरा स्थिरस्थावर झाल्यावर मात्र भुकेची जाणीव झाली. थोड्या वेळाने जेवण आलं. 'स्विस' चं नाविन्य झालं, आता 'स्विस धक्क्या'ची पाळी होती. भाताबरोबर दाट, अळणी कढीसारखं काहीतरी होतं - त्यात एक मोठ्ठं, लांबलचक हिरवं पान होतं आणि आणखीनही कसल्या-कसल्या भाज्यांचे तुकडे होते. ते काय होतं ते मला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये पण ४-५ दिवस मसालेदार पंजाबी जेवण जेवल्यानंतर ते सौम्य जेवण मला स्वतःलातरी बरं वाटलं. मी त्या कढीबरोबर भात खाल्ला आणि मग भाज्यांचे तुकडे मीठ-मिरपूड घालून खाल्ले. विमानात कडकडून भूक लागल्यावर फारसा विचार करायचा नसतो, समोर ये‍ईल ते पोटात ढकलायचं, बास!!

..... खिडकीतून सिंगापूर जवळ आल्याच्या खुणा दिसायला लागल्या. 'चांगी एअरपोर्ट' अगदी समुद्रकिनाऱ्याला लागूनच आहे. म्हणजे अक्षरशः बीचवरच धावपट्टी आहे असं म्हटलं तरी चालेल. समुद्र संपून सिंगापूरचा भूभाग दिसायला लागे-लागेपर्यंत विमान उतरतं सुध्दा. पाण्याच्या इतक्या जवळ विमानतळ का बांधावासा वाटला असेल? कसा बांधला असेल? कदाचित समुद्रात भर घालून? मग पर्यावरणवाद्यांनी तिथेसुध्दा त्याच्याविरुध्द आवाज उठवला असेल का? कारण तिथे इतरत्र तरी निदान पर्यावरणाची विशेष काळजी घेतलेली दिसली.

नव्या विमानतळावर पाय ठेवले की पहिलं काम काय तर आपापल्या घड्याळांतली वेळ बदलायची. आम्ही उतरलो तेव्हा तिथला दिवस मावळत आला होता. संध्याकाळचे ७ वाजत होते. कुठ्ल्याही विमानतळाची दिवसा आणि रात्री अशी दोन वेगवेगळी रूपं दिसतात. दिवसा तो जास्त भव्य वाटतो आणि रात्री जास्त आकर्षक!! बॅंकॉकचा विमानतळ आम्हाला रात्रीचा पहायलाच नाही मिळाला आणि सिंगापूरचा मात्र फक्त रात्रीचाच पाहिला.
पुन्हा एकदा इमिग्रेशनच्या दिशेने 'कदम कदम बढाए जा ...' सुरु झालं. पण त्यादिवशी जास्त कदम बढवावे लागले नाहीत. कारण एकापुढे एक ५-६ सरकते पट्टे, त्याच्यापुढे सरकते जिने आणि थोड्याच वेळात आम्ही इमिग्रेशनपाशी पोचलो सुध्दा !! मुळात हे सरकते पट्टे, जिने - हे सगळं बनलं असणार कुणाचा खोळंबा न होता पटापट कामं व्हावीत म्हणून, जड सामान घेऊन जाण्याऱ्या लोकांना सोयीचं जावं म्हणून ... पण त्यामुळे माणसं जास्त आळशी बनलीयेत. जड सामान-बिमान काही जवळ नसणारे सुध्दा सरकता जिना दिसला की साध्या जिन्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत!! आदित्य तर मागून आजी-आजोबा हळूहळू ये‍ईपर्यंत त्या सरकत्या जिन्यांवरून नुसता वर-खाली करत बसायचा!!
कुठल्या काउंटरपाशी काय करायचं, कुठे पासपोर्ट दाखवायचा, कुठे बिलकुल बाहेरही काढायचा नाही इ. गोष्टींत मंडळी आता एकदम सराईत झालेली होती. त्यामुळे शिंदेंच्या सूचना आपसूकच कमी झाल्या होत्या, कामंही पटापट होत होती.

पाऊण-एक तासात बाहेर पडलो. बाहेरची हवा पुन्हा एकदा तशीच - दमट आणि ऊष्ण, वापीची आठवण करून देणारी. पण अजून किमान एक आठवडा तरी वापीची आठवण काढायची नव्हती ...
आमची बस उभीच होती. आम्ही ४९ जण, बसचा ड्राइव्हर आणि आमची तिथली गाईड - यांच्याव्यतिरिक्त तिथे चिटपाखरूही नव्हतं. अरेच्च्या! आत्ताच काही वेळापूर्वी इथे २-३ विमानं उतरली होती ना? मग बिलकुल गर्दी कशी नाही?? बाहेर पडायला अनेक दरवाजे होते की काय? पण अनेक म्हणजे तरी एवढे की बाहेर पडलेली इतर माणसं दृष्टीसही पडू नयेत!!! पण एकंदरच, पुढच्या २-३ दिवसांत तिथे 'सर्वात जास्त गर्दी' अशी जी पाहिली त्यापेक्षा कितीतरी जास्त माणसं आपल्याकडे रविवारी दुपारी दादर लोकलच्या एका डब्यात असतात!!
बसबरोबरच्या एका व्हॅन मध्ये सगळं सामान चढलं आणि सामानबरोबरची सगळी माणसं त्या बसमध्ये चढली. दोन्ही वाहनं तिथून निघाली. आमच्या चिनी गाईडने स्वतःची ओळख करून दिली. तिचं नाव 'मे' - चिनी उच्चार 'मे‍ऽऽई'. चिनी वंशाची असूनही तिच्या अनेक पिढ्या सिंगापूरमध्येच गेल्या होत्या. त्यामुळे ती स्वतःला 'सिंगापोरिअन'च समजायची. ऍनाच्या तुलनेत ही फाड-फाड इंग्रजी बोलणारी, पक्की व्यावसायिक अशी होती. आम्हाला खूष करण्याकरता हिंदी वगैरे बोलायच्या फंदात पडली नाही. सिंगापूरबद्दल जुजबी माहिती दिल्यानंतर तिने तिथले नियम सांगायला सुरूवात केली. ते नियम आपल्या भारतीयांच्या मानाने चांगलेच कडक होते. आता ते तसे येणाऱ्या प्रत्येक परदेशी माणसाला सांगितले जातात की फक्त भारतीयांनाच - ते कळलं नाही पण सार्वजनिक ठिकाणी काही कचरा केल्यास किंवा धूम्रपान केल्यास १००० डॉलर्स दंड, ट्रॅफ़िकमधून पळत रस्ता ओलांडला तर ५०० डॉलर्स दंड, अमुक केलं तर इतका दंड, तमुक झालं तर इतका दंड, अजून कश्यासाठीतरी तुरुंगवास - काही विचारू नका. ती यादी चांगली लांबलचक होती. ते सगळे नियम ऐकून मंडळी थोडावेळ एकदम चिडीचूप झाली. मग हळूच कुणीतरी म्हणालं - 'श्वास घेतला तर चालेल ना?' .... आणि बसमध्ये हास्याचा जो स्फोट झाला ना की विचारता सोय नाही. विचारणारा नक्की पुणेकर असणार यात शंकाच नव्हती!! पुढे २-३ दिवस त्या 'नियम आणि दंड' या जोडगोळीची सगळ्यांनी यथेच्छ खिल्ली उडवली - पण फक्त मराठीतून आणि शाब्दिकच ... प्रत्यक्ष नियम मोडायची कुणाची टाप नव्हती.
अर्धा-पाऊण तास बसचा प्रवास होता. बाहेर अंधार असल्यामुळे जास्त काही पाहता आलं नाही पण जे काही थोडंफार पाहिलं त्यात सगळ्यात जास्त काय लक्षात राहिलं तर कमालीची स्वच्छ्ता!!

'हॉटेल न्यू पार्क' ला पोचेपर्यंत साडेआठ वाजत आले होते. नवव्या मजल्यावर सगळ्यांच्या खोल्या होत्या. खोलीत सामान टाकलं, खिडकीचा पडदा सारला आणि अहाहा! काचेतून अप्रतिम दृश्य दिसत होतं. विहंगम दृश्याची मजाच काही और असते. पण तसं तिथे बघत उभं रहायला वेळ नव्हता कारण जेवायला जायचं होतं.
हॉटेलपासून हाकेच्या अंतरावर एक भारतीय रेस्तरॉं होतं. तिथे जेवलो. त्याला लागूनच 'मुस्तफ़ा मॉल' होता. त्या मॉलचं वैशिष्ट्य म्हणजे तो चोवीस तास उघडा असतो. जेवण झाल्यावर थाई बाथ बदलून सिंगापूर डॉलर्स घेतले. एकदम गरीब झाल्यासारखं वाटलं कारण रुपये आणि बाथ साधारण सारखे आणि एका सिंगापूर डॉलरला सत्तावीस रुपये मोजावे लागतात. कित्येक आशियाई राष्ट्रांच्या तुलनेतही आपली अर्थव्यवस्था अजून किती दुबळी आहे .... आपल्या आर्थिक विकासाच्या गप्पा कधी प्रत्यक्षात उतरणार? पडत असेलही म्हणा रोज थोडा-थोडा फरक पण तो पैश्यांच्या हिशोबातला फरक चलन बदलून घेताना ग्राह्य धरला जात नाही. कदाचित अजून दहा-पंधरा वर्षांनी तो जाणवेल.
जेवणानंतर मॉलला एक भेट द्यायचा बेत होता पण पोट भरल्यावर दिवसभराचा सगळा शीण डोळ्यात उतरायला लागला होता. त्यामुळे सरळ हॉटेलवर परत आलो....

अजय सोडून आम्हा पाचजणांची ही पहिलीच परदेशवारी होती आणि त्यातसुध्दा का कोण जाणे पण सिंगापूरबद्दल एक विशेष आकर्षण होतं. 'सिंगापूर' या नावाभोवतीच एक वलय आहे. अश्या त्या वलयांकित शहरात आज आम्ही प्रवेश केला होता आणि आता पुढचे दोन दिवस त्या वलयाचे निरनिराळे आविष्कार पाहणार होतो ....

No comments: