२८ ऑक्टोबर - आठवा दिवसवलयांकित शहरात प्रवेश ...


विमान-प्रवास असूनसुध्दा त्यादिवशी सकाळी फारसं लवकर उठायचं नव्हतं. ११ वाजता 'चेक-आऊट' होतं. सगळं आवरून 'डिस्कव्हरी' वरचा एक कार्यक्रम पण पाहून झाला तरी निघायला अजून अवकाश होता. मग खोलीतून बाहेर आले.
आमच्या मजल्यावर एका बाजूला एक छोटीशी गच्ची होती जिचं दार त्यादिवशी उघडं दिसलं. आमच्या खोलीच्या खिडकीतून समोर अजून एक ठोकळा इमारतच दिसायची. म्हटलं बघू त्या गच्चीत जाऊन काय दिसतंय ते .... तर डावीकडे एक वाहता रस्ता आणि उजवीकडे 'बयोके स्काय' हे बॅंकॉकमधलं सर्वात उंच ८०-९० मजली हॉटेल - असं एकदम मस्त दृश्य दिसलं. त्याच बयोके स्कायच्या पायथ्याशी 'करी पॉट' होतं. रोज तिथे जेवायला गेलो की एकदातरी मी मान वर करून जे उंच हॉटेल वऽऽरपर्यंत बघायचा प्रयत्न करायचे तेच हे. अध्ये-मध्ये इतर कुठ्ल्याही इमारतीचा व्यत्ययही नव्हता. पण, जरा फ़ोटो काढेपर्यंत 'बस आली' असं कळलं....१-२ दिवस आधीच तिकडे लक्ष गेलं असतं तर काही बिघडलं असतं का?? पण काही गोष्टींची चुटपूट ही लागलीच पाहिजे ना! प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली तर कसं चालेल!!!

'फ़र्स्ट होटेल' ला टा-टा करून निघालो. सुदैवाने फारशी रहदारी नव्हती. त्यामुळे अर्ध्या-पाऊण तासात विमानतळावर पोचलो. आधीच त्या विमानतळाच्या मी प्रेमात पडलेली होते. त्यात त्यादिवशी तिथलं 'डिपार्चर लाऊंज' पाहून तर अजूनच प्रभावित झाले. 'ए ते जे' अश्या १० ओळी आणि प्रत्येक ओळीत १५ ते २० काऊंटर्स होते. त्यापैकी 'जी - १०,११,१२' या काऊंटर्सवर 'फ़्लाईट नं. एल एक्स १८२' ही अपेक्षित अक्षरं झळकताना दिसली. सामान 'चेक-इन' साठी उभे राहिलो. आजी-आजोबांनी बसायला जागा शोधली. कारण आता तिथेच किमान तास-दीड तास तरी जाणार होता. शिवाय एक अनपेक्षित गोंधळ होणार होता ...
इतरांबरोबरच आमचे ५ जणांचे बोर्डिंग पासेस मिळाले पण सासूबाईंचा नाही मिळाला. म्हटलं - झाला असेल पुढे-मागे, मिळेल पण नाहीच मिळाला ... मग गेला कुठे? काहीतरी गोंधळ नक्कीच होता. 'श्रीलंकन' कडून तिथे आलेल्या चुकीच्या माहितीमुळे त्या एका तिकिटाचा व्हाऊचर नं. जुळत नव्हता .... पण त्यामुळे बोर्डिंग पास आम्हाला ताब्यात मिळेना आणि तो ताब्यात मिळाल्याशिवाय पुढे 'सिक्युरिटी चेक' ला जाता ये‍ईना. आमच्याजवळची तिकिटं दाखवूनसुध्दा काही उपयोग होईना. मग त्या ऑपरेटरने 'श्रीलंकन' ला फ़ोन केला. तो लागेना. फ़ॅक्स पाठवला आणि 'उत्तर मिळेपर्यंत मी काही करू शकत नाही' असं सांगितलं. इकडे आमचे इतर सगळे सहप्रवासी पुढे निघून गेले आणि काऊंटरपाशी आम्ही सहाजण आणि शिंदे पति-पत्नी असेच उरलो. आदित्यनं आजीला चिडवायला सुरुवात केली - 'तू रहा इथेच, आम्ही जातो सिंगापूरला' म्हणून!!!
ऍनाची आणि शिंदेंची धावपळ सुरु झाली. आमच्या हातात काहीच नव्हतं त्यामुळे शांतपणे बघत उभे राहिलो... करणार काय दुसरं?? दरम्यान मध्येच ऍना कुठेतरी गायब झाली, ती उगवली एकदम २०-२५ मिनिटांनी. तिने 'श्रीलंकन' च्या ऑफ़िसमधल्या एकीला पकडून आणलं होतं सोबत. मग त्या काऊंटरपाशी भारतीय इंग्रजी, थाई इंग्रजी आणि सिंहली इंग्रजी अशी थोडा वेळ खिचडी झाली, हातवारे झाले आणि शेवटी 'विमानातली जागा निश्चित राहील पण नवीन तिकिट खरेदी करावं लागेल' असं कळलं. अर्थात ती जबाबदारी शिंदेंची होती. त्यांनी चार-साडेचार हजार बाथ भरून एक नवीन तिकिट घेतलं. आधीच्या तिकिटाचे पैसे परत मिळवण्यासाठी सहल संपल्यावर त्यांना धावपळ करावी लागणार होती ती वेगळीच. तरी त्यांच्या मते हा गोंधळ थोडक्यात निस्तरला होता आणि तो ही केवळ ऍनामुळे. तिचे आभार मानले, टा-टा केलं. आम्ही आपापसात 'तला-तला' करेपर्यंत ती दिसेनाशीही झालेली होती. 'यथा काष्ठं च ...' या उक्तीनुसार दुसऱ्या दिवशी येणाऱ्या अजून एखाद्या गृपचं ती पुन्हा तसंच स्वागत करणार होती ...

विमान सुटायला अजून अर्धा-पाऊण तास अवकाश होता. 'चार तास आधी चेक-इन'चा आम्हाला असा फायदा झाला होता. शिवाय गृपबरोबर आल्याचाही फायदा होता!! आमचं आम्ही स्वतंत्रपणे आलो असतो आणि असा काही गोंधळ झाला असता तर आम्ही काय करणार होतो कोण जाणे!!!
सिक्युरिटीतून पुढे सरकलो, बोर्डिंग गेट तिथून कुठल्या-कुठे लांब होतं. चालत जायला १५-२० मि. लागली. या सगळ्या गोंधळामुळे विमानतळावरची दुकानं वगैरे मात्र पाहता आली नाहीत. खरं तर तो सगळा भाग पाहण्यासारखा होता. तरा-तरा चालत बोर्डिंग गेटपाशी पोचलो, जरा ५-१० मि. खुर्चीत विसावतोय तोपर्यंत निघायची वेळ झाली......

त्यादिवशीचं आमचं विमान होतं 'स्विस एअर' चं. गोऱ्या कातडीबद्दल आपल्या मनात कायम एक आकर्षण असतं. त्यामुळे त्यादिवशीसुध्दा 'अरे वा! आज स्विस एअर ने जायचंय!' अशी उगीचच एक उत्सुकता होती. खरं तर त्यात विशेष असं काहीही नव्हतं पण तरी.
विमानात प्रवेश केला तोच 'बिज़िनेस क्लास' मध्ये. त्याक्षणी लक्षात नाही आलं ते; उलट रुंद, ऐसपैस सीट्स पाहून मी खूष झाले थोडा वेळ. स्विस एअरचं मनातल्या मनात गुणगान करायला सुरुवात केली. कारण १-२ प्रवासातच इकॉनॉमी क्लासला मी वैतागले होते. विमानप्रवासाचं आकर्षण कुठल्याकुठे गायब झालेलं होतं.
पण हा माझा सगळा आनंद क्षणभंगूर ठरला - ठरणारच होता ... इकॉनॉमी क्लास नामक काडेपेटीत पुढचे तीन-साडेतीन तास बसायचं होतं. ते तसं दिवस-दिवस बसून युरोप-अमेरिकेचा प्रवास करणारे खरंच महान!!
आपापल्या जागांवर बसलो. कधी एकदा समोरचा रिमोट हातात घेतोय आणि त्यावरची बटणं दाबायला सुरूवात करतोय असं आदित्यला झालं होतं. या वेळी सहाजणांत मिळून एकच खिडकीची सीट मिळाली होती ती पण पुन्हा एकदा पंखाजवळची. केवळ व्हिडियो-गेम्स होत्या म्हणून नाहीतर आदित्यने मला एकदाही खिडकीत बसू दिलं नसतं.
ठरलेल्या वेळेला विमान हवेत झेपावलं. 'स्विस' मुळे हवाई-सुंदरींचे गणवेष वगैरे पाहण्यासारखे होते - दोनदा 'श्रीलंकन' च्या साड्या पाहिल्यावर तेवढंच जरा काहीतरी नाविन्य!! जरा स्थिरस्थावर झाल्यावर मात्र भुकेची जाणीव झाली. थोड्या वेळाने जेवण आलं. 'स्विस' चं नाविन्य झालं, आता 'स्विस धक्क्या'ची पाळी होती. भाताबरोबर दाट, अळणी कढीसारखं काहीतरी होतं - त्यात एक मोठ्ठं, लांबलचक हिरवं पान होतं आणि आणखीनही कसल्या-कसल्या भाज्यांचे तुकडे होते. ते काय होतं ते मला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये पण ४-५ दिवस मसालेदार पंजाबी जेवण जेवल्यानंतर ते सौम्य जेवण मला स्वतःलातरी बरं वाटलं. मी त्या कढीबरोबर भात खाल्ला आणि मग भाज्यांचे तुकडे मीठ-मिरपूड घालून खाल्ले. विमानात कडकडून भूक लागल्यावर फारसा विचार करायचा नसतो, समोर ये‍ईल ते पोटात ढकलायचं, बास!!

..... खिडकीतून सिंगापूर जवळ आल्याच्या खुणा दिसायला लागल्या. 'चांगी एअरपोर्ट' अगदी समुद्रकिनाऱ्याला लागूनच आहे. म्हणजे अक्षरशः बीचवरच धावपट्टी आहे असं म्हटलं तरी चालेल. समुद्र संपून सिंगापूरचा भूभाग दिसायला लागे-लागेपर्यंत विमान उतरतं सुध्दा. पाण्याच्या इतक्या जवळ विमानतळ का बांधावासा वाटला असेल? कसा बांधला असेल? कदाचित समुद्रात भर घालून? मग पर्यावरणवाद्यांनी तिथेसुध्दा त्याच्याविरुध्द आवाज उठवला असेल का? कारण तिथे इतरत्र तरी निदान पर्यावरणाची विशेष काळजी घेतलेली दिसली.

नव्या विमानतळावर पाय ठेवले की पहिलं काम काय तर आपापल्या घड्याळांतली वेळ बदलायची. आम्ही उतरलो तेव्हा तिथला दिवस मावळत आला होता. संध्याकाळचे ७ वाजत होते. कुठ्ल्याही विमानतळाची दिवसा आणि रात्री अशी दोन वेगवेगळी रूपं दिसतात. दिवसा तो जास्त भव्य वाटतो आणि रात्री जास्त आकर्षक!! बॅंकॉकचा विमानतळ आम्हाला रात्रीचा पहायलाच नाही मिळाला आणि सिंगापूरचा मात्र फक्त रात्रीचाच पाहिला.
पुन्हा एकदा इमिग्रेशनच्या दिशेने 'कदम कदम बढाए जा ...' सुरु झालं. पण त्यादिवशी जास्त कदम बढवावे लागले नाहीत. कारण एकापुढे एक ५-६ सरकते पट्टे, त्याच्यापुढे सरकते जिने आणि थोड्याच वेळात आम्ही इमिग्रेशनपाशी पोचलो सुध्दा !! मुळात हे सरकते पट्टे, जिने - हे सगळं बनलं असणार कुणाचा खोळंबा न होता पटापट कामं व्हावीत म्हणून, जड सामान घेऊन जाण्याऱ्या लोकांना सोयीचं जावं म्हणून ... पण त्यामुळे माणसं जास्त आळशी बनलीयेत. जड सामान-बिमान काही जवळ नसणारे सुध्दा सरकता जिना दिसला की साध्या जिन्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत!! आदित्य तर मागून आजी-आजोबा हळूहळू ये‍ईपर्यंत त्या सरकत्या जिन्यांवरून नुसता वर-खाली करत बसायचा!!
कुठल्या काउंटरपाशी काय करायचं, कुठे पासपोर्ट दाखवायचा, कुठे बिलकुल बाहेरही काढायचा नाही इ. गोष्टींत मंडळी आता एकदम सराईत झालेली होती. त्यामुळे शिंदेंच्या सूचना आपसूकच कमी झाल्या होत्या, कामंही पटापट होत होती.

पाऊण-एक तासात बाहेर पडलो. बाहेरची हवा पुन्हा एकदा तशीच - दमट आणि ऊष्ण, वापीची आठवण करून देणारी. पण अजून किमान एक आठवडा तरी वापीची आठवण काढायची नव्हती ...
आमची बस उभीच होती. आम्ही ४९ जण, बसचा ड्राइव्हर आणि आमची तिथली गाईड - यांच्याव्यतिरिक्त तिथे चिटपाखरूही नव्हतं. अरेच्च्या! आत्ताच काही वेळापूर्वी इथे २-३ विमानं उतरली होती ना? मग बिलकुल गर्दी कशी नाही?? बाहेर पडायला अनेक दरवाजे होते की काय? पण अनेक म्हणजे तरी एवढे की बाहेर पडलेली इतर माणसं दृष्टीसही पडू नयेत!!! पण एकंदरच, पुढच्या २-३ दिवसांत तिथे 'सर्वात जास्त गर्दी' अशी जी पाहिली त्यापेक्षा कितीतरी जास्त माणसं आपल्याकडे रविवारी दुपारी दादर लोकलच्या एका डब्यात असतात!!
बसबरोबरच्या एका व्हॅन मध्ये सगळं सामान चढलं आणि सामानबरोबरची सगळी माणसं त्या बसमध्ये चढली. दोन्ही वाहनं तिथून निघाली. आमच्या चिनी गाईडने स्वतःची ओळख करून दिली. तिचं नाव 'मे' - चिनी उच्चार 'मे‍ऽऽई'. चिनी वंशाची असूनही तिच्या अनेक पिढ्या सिंगापूरमध्येच गेल्या होत्या. त्यामुळे ती स्वतःला 'सिंगापोरिअन'च समजायची. ऍनाच्या तुलनेत ही फाड-फाड इंग्रजी बोलणारी, पक्की व्यावसायिक अशी होती. आम्हाला खूष करण्याकरता हिंदी वगैरे बोलायच्या फंदात पडली नाही. सिंगापूरबद्दल जुजबी माहिती दिल्यानंतर तिने तिथले नियम सांगायला सुरूवात केली. ते नियम आपल्या भारतीयांच्या मानाने चांगलेच कडक होते. आता ते तसे येणाऱ्या प्रत्येक परदेशी माणसाला सांगितले जातात की फक्त भारतीयांनाच - ते कळलं नाही पण सार्वजनिक ठिकाणी काही कचरा केल्यास किंवा धूम्रपान केल्यास १००० डॉलर्स दंड, ट्रॅफ़िकमधून पळत रस्ता ओलांडला तर ५०० डॉलर्स दंड, अमुक केलं तर इतका दंड, तमुक झालं तर इतका दंड, अजून कश्यासाठीतरी तुरुंगवास - काही विचारू नका. ती यादी चांगली लांबलचक होती. ते सगळे नियम ऐकून मंडळी थोडावेळ एकदम चिडीचूप झाली. मग हळूच कुणीतरी म्हणालं - 'श्वास घेतला तर चालेल ना?' .... आणि बसमध्ये हास्याचा जो स्फोट झाला ना की विचारता सोय नाही. विचारणारा नक्की पुणेकर असणार यात शंकाच नव्हती!! पुढे २-३ दिवस त्या 'नियम आणि दंड' या जोडगोळीची सगळ्यांनी यथेच्छ खिल्ली उडवली - पण फक्त मराठीतून आणि शाब्दिकच ... प्रत्यक्ष नियम मोडायची कुणाची टाप नव्हती.
अर्धा-पाऊण तास बसचा प्रवास होता. बाहेर अंधार असल्यामुळे जास्त काही पाहता आलं नाही पण जे काही थोडंफार पाहिलं त्यात सगळ्यात जास्त काय लक्षात राहिलं तर कमालीची स्वच्छ्ता!!

'हॉटेल न्यू पार्क' ला पोचेपर्यंत साडेआठ वाजत आले होते. नवव्या मजल्यावर सगळ्यांच्या खोल्या होत्या. खोलीत सामान टाकलं, खिडकीचा पडदा सारला आणि अहाहा! काचेतून अप्रतिम दृश्य दिसत होतं. विहंगम दृश्याची मजाच काही और असते. पण तसं तिथे बघत उभं रहायला वेळ नव्हता कारण जेवायला जायचं होतं.
हॉटेलपासून हाकेच्या अंतरावर एक भारतीय रेस्तरॉं होतं. तिथे जेवलो. त्याला लागूनच 'मुस्तफ़ा मॉल' होता. त्या मॉलचं वैशिष्ट्य म्हणजे तो चोवीस तास उघडा असतो. जेवण झाल्यावर थाई बाथ बदलून सिंगापूर डॉलर्स घेतले. एकदम गरीब झाल्यासारखं वाटलं कारण रुपये आणि बाथ साधारण सारखे आणि एका सिंगापूर डॉलरला सत्तावीस रुपये मोजावे लागतात. कित्येक आशियाई राष्ट्रांच्या तुलनेतही आपली अर्थव्यवस्था अजून किती दुबळी आहे .... आपल्या आर्थिक विकासाच्या गप्पा कधी प्रत्यक्षात उतरणार? पडत असेलही म्हणा रोज थोडा-थोडा फरक पण तो पैश्यांच्या हिशोबातला फरक चलन बदलून घेताना ग्राह्य धरला जात नाही. कदाचित अजून दहा-पंधरा वर्षांनी तो जाणवेल.
जेवणानंतर मॉलला एक भेट द्यायचा बेत होता पण पोट भरल्यावर दिवसभराचा सगळा शीण डोळ्यात उतरायला लागला होता. त्यामुळे सरळ हॉटेलवर परत आलो....

अजय सोडून आम्हा पाचजणांची ही पहिलीच परदेशवारी होती आणि त्यातसुध्दा का कोण जाणे पण सिंगापूरबद्दल एक विशेष आकर्षण होतं. 'सिंगापूर' या नावाभोवतीच एक वलय आहे. अश्या त्या वलयांकित शहरात आज आम्ही प्रवेश केला होता आणि आता पुढचे दोन दिवस त्या वलयाचे निरनिराळे आविष्कार पाहणार होतो ....

२७ ऑक्टोबर - सातवा दिवस


द गोल्डन बुध्द आणि द रिक्लायनिंग बुध्द.


रोज आम्ही तयार व्हायच्या आत ऍना हजर असायची. त्यादिवशी मात्र सकाळी सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला तरी तिचा पत्ता नव्हता. थोड्याच वेळात तिचा फ़ोन आला की तिच्या यायच्या रस्त्यावर एक अपघात झाला होता आणि ती रहदारीत अडकली होती. मग काय, आमच्याजवळ वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण एव्हाना सगळ्यांच्या एकमेकांशी अर्धा-पाऊण तास गप्पा मारण्याइतपत ओळखी झालेल्या होत्या. कुणी 'फ़ोटो सेशन्स' सुरू केली, कुणी गटागटाने गप्पा मारत बसले.
ऍना पोचली तोपर्यंत १० वाजून गेले होते. लगेच आम्ही निघालोच. आज आम्ही सगळेजण 'भगवान बुध्द के सामने मत्था टेकने' जाणार होतो!! आम्हाला मिळालेल्या 'डे टू डे' कार्यक्रमानुसार आजच्या 'बॅंकॉक सिटी टूर' मध्ये बुध्दाची देवळंच जास्त होती. 'देऊळ' म्हटलं की माझा अर्धा उत्साह संपलेला असतो. पण त्यादिवशी ठरवलं की 'देवळात जायचंय' असं मनात न आणता 'एका वेगळ्या शैलीचं बांधकाम पहायला जातोय' असं म्हणून जायचं. आणि खरंच, त्या देवळांची रचना वगैरे सगळंच वेगळं होतं.

त्यादिवशी माझी आणि अजयची जागा व्हॅनमध्ये होती. ती छोटी असल्यामुळे बसच्या बरीच पुढे निघून आली. बस मात्र रहदारीत अडकली. मग आम्ही बसची वाट पाहत एके ठिकाणी थोडावेळ थांबलो. तो बॅंकॉकच्या मुख्य रस्त्यांपैकी एक असावा.आठ पदरी वाहतूक सुरू होती. दुतर्फा झाडं लावलेली होती. चौकात राजा-राणीचं मोठ्ठं चित्रं लावलेलं होतं. (अशी राजा-राणीची चित्रं बॅंकॉकमध्ये ठिकठिकाणी दिसली.) संपूर्ण रस्ताभर पिवळे झेंडे फडकत होते. त्या पिवळ्या रंगाचं एक कारण होतं. यंदा थायलंडचा राजा आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहे. राजा-राणी वर थाई लोकांचं भारी प्रेम. त्याच्या सन्मानार्थ अनेकजणांच्या अंगातपण पिवळे कपडे होते. रस्त्याच्या डाव्याबाजूला भल्या-थोरल्या परिसरात राजवाडा पसरलेला होता. ड्राइव्हरनं सांगितलं की कुठलेही शाही सोहोळे, मिरवणूका, परदेशी पाहुण्यांचं स्वागत हे सगळं त्या परिसरात, त्या रस्त्यावर होतं. काही दिवसांपूर्वी थाई पंतप्रधान परदेशात असताना याच राजाने लष्कराला उठावात मदत केली होती.
'उठाव ...!!' खरंच की .... मी विसरूनच गेले होते!! आम्ही निघायच्याआधी ८-१५ दिवस हा उठाव झाला होता. इतर वेळेला त्या बातमीकडे मी लक्षंही दिलं नसतं फारसं, पण तेव्हा मात्र मी २-३ दिवस बेचैन झाले होते हे मला आठवलं. त्यासंबंधी नंतर आठवडाभर पेपरमध्ये येणाऱ्या बातम्यासुध्दा मी इतक्या लक्षपूर्वक वाचल्या होत्या की जितक्या त्या परदेशात असलेल्या त्यांच्या पंतप्रधानांनी पण वाचल्या नसतील. 'बॅंकॉक-पट्टाया रद्द करावं लागतंय बहुतेक' इथपर्यंत माझी विचारांची गाडी येऊन पोचली होती तेव्हा - तोच हा राजा काय!! मी चित्रातल्या राजाच्या चेहेऱ्याकडे पुन्हा नीट पाहिलं. ७५व्या वर्षी असलं काही करण्यासाठी अंगात हिम्मत पाहिजे!!

बस दिसल्यावर आम्ही पुन्हा निघालो. ५-१० मिनिटांत एका प्रवेशद्वारापाशी आमच्या गाड्या थांबल्या. ते ३-४ देवळांचं बनलेलं असं एक संकुल होतं. प्रथम आम्ही गेलो 'द रिक्लायनिंग बुध्द' पहायला. दारात चपला काढल्या. (चपला काढल्यावर मात्र खरंच देवळात आल्यासारखं वाटलं!) आत एक ४५ मि. लांब, १४-१५ मि. उंच अशी बुध्दाची उजव्या कुशीवर पहुडलेली प्रचंड मूर्ती होती. तिची भव्यता आपल्या श्रवणबेळगोळच्या बाहुबलीच्या भव्यतेशी नातं सांगणारी होती. त्या बुध्दाच्या डोक्याखालच्या उशीची उंचीच ८-१० फ़ूट होती. कुठल्याही प्रकारे ती आख्खी मूर्ति कॅमेऱ्यात मावेना. भिंतींवर चित्ररूपी कथा रंगवलेल्या होत्या - थाई पुराणातल्या असाव्यात बहुतेक. तिथून बाहेर पडलो.

समोरच 'द गोल्डन बुध्द' होता. साडे-पाच टन शुध्द सोन्यात घडवलेली मूर्ती - बाप रे! इतकं असूनही कुठेही सुरक्षा-व्यवस्था वगैरेचा मागमूसही नव्हता. 'थायलंड-ब्रह्मदेश लढाईत टिकून राहिलेलं ते एकमेव देऊळ आहे' अशी माहिती कळली. थायलंड-ब्रह्मदेश यांच्यात विळ्या-भोपळ्याचं सख्यं आहे भारत-पाकिस्तान सारखं. ही माहिती मात्र मला नवीन होती. ब्रह्मदेशने लढाईत सगळी देवळं नष्ट करायला सुरूवात केल्यावर त्या देवळातल्या बुध्दाच्या मुख्य मूर्तीवर सिमेंटचा थर चढवण्यात आला आणि त्यासारख्याच अजून काही नुसत्या सिमेंटच्या मूर्ती बनवण्यात आल्या. त्यामुळे हल्लेखोरांना खरी मूर्ती कुठली ते कळलं नाही आणि ते तसेच तिथून निघून गेले..... थायलंडमध्येही देवळात गेल्यावर लोक उदबत्या लावतात, गुडघ्यावर बसून मनोभावे नमस्कार करतात हे तिथे कळलं. पु.लं.चं एक वाक्य आठवलं - देश, धर्म, जात, प्रांत कुठलाही असो, त्या सर्वशक्तीमान परमेश्वरापुढे झुकताना प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर लीनतेचे एकच भाव असतात.

प्रत्यक्ष मूर्ती किंवा नमस्कार यापेक्षा मला साहजिकच देवळाचा परिसर, वास्तुशैली इ.त जास्त रस होता. परिसर अतिशय स्वच्छ होता. बुध्द धर्मातल्या प्रत्येक महापुरुषाचं एक-एक स्मारक उभं केलेलं होतं. कळसांची रचना, आकार, त्यावरचं कोरीव काम खूपच वेगळं आणि सुंदर होतं; मुख्य म्हणजे 'नवीन काहीतरी पाहिलं' हा आनंद देणारं होतं.

१२ वाजत आले होते. देवळाच्या बाहेर पडलो तर बाहेर एक शहाळंवाला दिसला. जवळ पाण्याच्या बाटल्या असूनही साहजिकच आदित्यला त्याची तहान लागली. पण त्यामुळे त्या माणसाला फायदाच झाला. कारण, आदित्यने घेतल्यावर आमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्याच्याकडून शहाळी घेतली. तो नारळ पसरट गोल आकाराचा, मोठा आणि बाहेरून पण पांढऱ्या रंगाचा होता. पण निसर्गाची काय कमाल आहे - हजारो कि.मि. अंतर पार केल्यावर नारळाचं बाह्य रूप बदललं पण आतल्या पाण्याची चव मात्र तशीच मधूर, ताजंतवानं करणारी!!!

तिथून निघालो. अजून एका बुध्दाच्या देवळाला भेट दिली. हे देऊळ मात्र थोडं आपल्या देवळांसारखं होतं - म्हणजे दगडी पायऱ्या, बाहेर दुकानं वगैरे.
जेवायची वेळ होत आली होती. पोटात कावळे 'करी पॉट,करी पॉट' असं ओरडायला लागले होते. परतताना आमची व्हॅन कुठल्या-कुठल्या गल्ली-बोळातून आली. तो संपूर्ण भाग पुण्यातल्या रविवार पेठेसारखा होता. फक्त रविवार पेठेत मिनी स्कर्टमधल्या पोरी दिसत नाहीत, इथे होत्या. इतकाच काय तो फरक!!

जेवणानंतरचा वेळ मोकळा होता - खरेदी इ. साठी. दोन्ही आज्ज्यांना 'बिग सी' ला जायचं होतं. पण मोकळा वेळ म्हटल्यावर आदित्यला लगेच स्विमिंग आठवलं. मग त्याची रडारड आणि शेवटी तह - आदल्या दिवशी आजोबांनी मॉल पाहिला होता म्हणून ते आदित्यसाठी हॉटेलवरच थांबले आणि पाचच्या सुमाराला आम्ही चौघं निघालो. रस्ता अगदीच सोपा होता. आदल्या रात्री आम्ही बराच मोठा वळसा घालून गेलो होतो असं लक्षात आलं. तरीही जाताना रस्त्यातल्या खाणाखुणा लक्षात ठेवत चाललो होतो. वाटेत चार पादचारी पूल लागले. 'चार पुलांनंतर डावीकडे वळायचे' अशी खूणगाठ मनाशी बांधली आणि मॉलमध्ये शिरलो. थोडी-फार खरेदी केली.
'४०-५० बाथ मध्ये टुकटुकनं हॉटेलवर परत येता ये‍ईल' असं सौ.शिंदेनी सांगितलं होतं. थायलंडमधली टुकटुक म्हणजे आपल्या सहा आसनी रिक्षाच्या आकाराची तीन आसनी रिक्षा! म्हटलं - चला, टुकटुक तर टुकटुक. तर तो टुकटुकवाला परदेशी लोक पाहिल्यावर अव्वाच्या सव्वा भाडं सांगायला लागला. बरं, 'आम्ही रोज जातो, ४० बाथच होतात' असं म्हणायची पण सोय नव्हती!! शेवटी गुपचुप चालतच निघालो. अपेक्षेप्रमाणे, '३ पुलांनंतर वळायचं की ४?', 'हा गेला तो दुसरा की तिसरा?' असे सगळे वाद पार पडले. नाहीतरी, त्यादिवशीचा आमचा वादावादीचा कोटा पूर्ण व्हायचाच होता.
हॉटेलवर पोचलो तर पाण्यात यथेच्छ डुंबून आदित्य आमची वाटच पाहत बसला होता.
रात्री जेवण हॉटेलच्याच डायनिंग-रूममध्ये होतं. तिथे एका कोपऱ्यात एक माणूस मोठ्ठ्या पियानोवर कुठलंतरी इंग्रजी गाणं म्हणत बसला होता. त्याच माइकवर आमच्या गृपपैकी एका काकांनी एक मराठी गाणं म्हटलं. त्यांनी त्या माणसाला गाण्याची पट्टी वगैरे काहीतरी सांगितलं असावं. कारण त्याने त्या गाण्याला पियानोवर बऱ्यापैकी साथ दिली. इतका मोठा पियानो मी प्रथमच पाहत होते. एकदम झकास होता!! मग जवळ जाऊन थोडावेळ तो वाजणारा पियानो निरखत उभी राहिले.

..... तो 'झकास' पियानो आमचं सामान आवरणार नव्हता रूमवर जाऊन. त्यामुळे नाइलाजास्तव तिथून निघावं लागलं. रात्री बॅग आवरली. विमानप्रवास म्हणून एक-एक कपड्यांचा जोड पुन्हा हॅन्डबॅगेत ठेवला. कारण, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून 'जीवन में एक बार जाना था सिंगापूर ...'

त्यात, थायलंडला टाटा करून निघण्यापूर्वी विमानतळावर एक 'अनपेक्षित गोष्ट' घडणार होती ....

२६ ऑक्टोबर - सहावा दिवसदाती हू मे, दल्दी हे क्या ...


आधी ठरलेल्या कार्यक्रमानुसार त्यादिवशी आमची 'बॅंकॉक सिटी टूर' होती. पण त्याऐवजी आम्ही 'सफ़ारी वर्ल्ड'ला भेट देणार होतो. तसा आमच्या दृष्टीने काही फ़रक पडत नव्हता म्हणा! आधी तिथे मजा करायची त्याऐवजी ती इथे ... शिवाय दुसऱ्या दिवशी तिथे जायचंच होतं ना!!
त्यामुळे त्यादिवशीच्या दिल्या गेलेल्या पहिल्या वेळेला उठलो, दुसऱ्या वेळेला नाश्ता केला आणि तिसऱ्या वेळेच्या आधीच बसमध्ये जाऊन बसलो.

रोज सकाळी हॉटेल वरून निघताना किंवा एकूणच कुठूनही निघताना मंडळी बसमधे चढली की ऍनाची मोजदाद सुरू व्हायची - मनातल्या मनातच. आम्ही ४९ जण आणि ती ५० वी - आकडा जुळला की ती सुटकेचा निःश्वास टाकायची. माझी फार इच्छा होती की एकदा तरी तिला मोठया आवाजात मोजायला सांगायचं. १ ते ५० ला थाई भाषेत काय म्हणतात ते तरी कळलं असतं.
आमच्या गृपमध्ये बरेच गायक होते - हौशी पण, रीतसर शिकलेले पण. बस निघाली की रोज कुणीतरी एखादं स्तोत्र किंवा श्लोक असं काहीतरी म्हणायचं. ते झालं की मग इतर काहीजण भावगीत, भजन, अभंग म्हणायचे. मी ऍनाला ती पण विनंती करून पाहिली. तिला म्हटलं - बाकी काही नाही तर निदान थायलंडचं राष्ट्रगीत तरी म्हण. त्यामागे केवळ 'एक वेगळी भाषा ऐकणे' हाच उद्देश्य होता. पण तिने नकार दिला. (नंतर वाटलं - तिनं नाही म्हटलं तेच बरं झालं. त्या राष्ट्रगीताला बस मध्येच उभे राहून सर्वांनी मान दिला असता का?)
सहज गप्पा मारता-मारता तिनं सांगितलं की तिला २ हिंदी गाणी माहीत होती - 'तू चीज़ बडी है मस्त मस्त' आणि 'जाती हूँ मैं, जल्दी है क्या' आणि ते कसं - 'तू तीद बदी हे मत्त मत्त' आणि 'दाती हू मे दल्दी हे क्या'!!! काही वर्षांपूर्वी अश्याच कुठल्यातरी भारतीय गृपमधल्या एका लहान मुलीनं तिला ती शिकवली होती. तिच्या तोंडून त्या ओळी ऐकायला फार मजा यायची.
तो संपूर्ण दिवस आम्ही सफ़ारी वर्ल्ड मध्येच घालवणार होतो. त्या दिवशी विशेषकरून आदित्यच्या आकर्षणाच्या जास्त गोष्टी पहायच्या होत्या. सर्वात पहिलं आकर्षण होतं - सफ़ारी ड्राईव्ह. नैसर्गिक वातावरणात वावरणारे जंगली प्राणी आम्ही बंद गाडीत बसून पाहिले. त्या वनातल्या छोट्या रस्त्यावरून १०-१५ च्या वेगाने बस चालवत ड्रायव्हरने आम्हाला सगळीकडे फिरवून आणले. आपल्याला प्राणी नेहेमीच पिंजऱ्यात पहायची सवय, त्यामुळे तो अनुभव खरंच छान होता. वाघ-सिंह आठ-आठ, दहा-दहाच्या कळपानं बसलेले होते. तेव्हा ती त्यांची न्याहारीची वेळ होती. थोड्याच वेळात त्यांच्या रोजच्या परिचयाची एक 'ट्रेलर व्हॅन' तिथे आली. त्या ट्रेलरवर एका बंदिस्त पिंजऱ्यात एक विशीची मुलगी उभी होती. तिच्या शेजारीच एका मोठ्या बादलीत मांसाचे मोठे-मोठे तुकडे ठेवलेले होते. पिंजऱ्यातून ती नुसता एक तुकडा बाहेर काढायची की एखादा सिंह झडप घालून तो पकडायचा. बघता-बघता ७-८ सिंह चहूबाजूंनी त्या पिंजऱ्यावर चढले. 'सगळ्यांना मिळणार आहे, घाई करू नका' अश्या थाटात ती त्या हिंस्त्र श्वापदांना शांतपणे भरवत होती. आम्ही बंद बसमध्ये बसलेलो असूनसुध्दा ते पाहून अंगावर अक्षरश: काटा आला.
अर्ध्या तासाच्या त्या फेरीत जिराफ, झेब्रा, एमू पक्षी यांसारख्या आपल्याकडे न दिसणाऱ्या मंडळींनी जास्त लक्ष वेधून घेतले आणि तेवढ्या वेळातच आदित्य तुडुंब खूष झालेला होता.

त्यानंतर, प्राण्यांचे काही खेळ पहायचे होते - 'द सी-लायन शो' आणि 'द डॉल्फिन शो'. आदल्या दिवशी 'नॉंग-नूच व्हिलेज' मध्ये आणि त्यादिवशी तिथेपण आत शिरल्यावर सगळ्यांच्या कपड्यांवर एक-एक छोटा प्रवेश-परवाना चिकटवला गेला. एकाच तिकीटावर अनेक गोष्टी पहायच्या असतील तेव्हा तिथे ही पद्धत पहायला मिळाली. याच्यामुळे खूपच वेळ वाचायचा. एक म्हणजे - दिवसभर तिकीट सांभाळून ठेवायची कटकट नाही आणि प्रत्येकवेळी प्रवेशद्वारापाशी तिकीट दाखवा, परत घ्या ही भानगड नाही.
प्रत्येक शो पाऊण तासाचा आणि मध्ये एक-एक तासाचा वेळ. त्या मधल्या वेळात एका प्रेक्षागृहापासून पासून दुसऱ्या प्रेक्षागृहापर्यंत चालत जायचं. 'या चालत जायच्या वेळेला उन्हाचा थोडा त्रास होईल' असं ऍनाने सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही पूर्ण तयारीनिशी गेलो होतो - म्हणजे टोप्या, रूमाल, गॉगल, पाण्याच्या भरपूर बाटल्या ... पण तसा विशेष त्रास झाला नाही .... (उलट त्या बाटल्यांचं ओझंच झालं जास्त. पण त्याची चिंता नव्हती कारण आता ते वजन उचलायला आमचा खंदा वीर एकदम 'फ़िट ऍन्ड फ़ाईन' होता !!!)
तो रस्ता झाडांनी आणि हिरवाईने इतका नटलेला होता की आजूबाजूला पाहूनच गाऽऽर वाटायचं. वाटेत पक्ष्यांचे मोठे-मोठे पिंजरे होते. असंख्य रंगांचे आणि आकाराचे पक्षी त्यांत होते. प्रत्येक पिंजऱ्याच्या डोक्यावर पाण्याचा छोटासा फवारा उडत होता. पक्षी वाटेल तितक्या वेळेला ते पाणी प्यायचे, त्यात आंघोळ करायचे. कुठेही घाण नव्हती की अश्याठिकाणी जो एक विशिष्ट डोक्यात जाणारा वास असतो तो नव्हता. मग कसला त्रास आणि काय!! ते सगळे खेळ पाहताना आदित्यला जितकी मजा आली तितकीच मजा मला त्या पायवाटांवरून चालताना आली.
पहिला शो होता - 'द सी लायन शो'. तीन-चारशे माणसं बसू शकतील असं एक अर्धवर्तुळाकार छोटं खुलं प्रेक्षागृह आणि समोर रंगमंच. तिथेसुध्दा अर्ध्या भागात मोठा पाण्याचा तलाव होता. सी-लायन हा प्राणी त्याआधी केवळ टी.व्ही. वरच पाहिलेला होता. त्यामुळे प्रत्यक्ष पहायला मजा आली. खेळ करवून घेणाऱ्या प्रत्येक माणसाच्या कमरेला सी-लायनच्या खाद्याची एक पिशवी लटकवलेली होती. एखादी करामत दाखवून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या की लगेच सगळे सी-लायन्स त्या माणसांजवळ 'आ' करून उभे रहायचे. मग ती माणसं त्यातलं खाद्य त्यांना भरवायची. हे म्हणजे 'गाणं म्हणून दाखव, मग बिस्कीट देणारे हं' अश्यातलाच प्रकार होता. पण एकंदर शो मस्त होता. तमाम बच्चेकंपनी उड्या मारत होती, खुषीने टाळ्या पिटत होती.
त्यानंतर होता - 'द डॉल्फिन शो'. स्वरूप साधारण तसंच; ती 'गाणं म्हटलं तरच बिस्किट' ची अट पण तशीच. डॉल्फिन हा प्राणी पण आधी कधी प्रत्यक्ष पाहिलेला नसल्यामुळे मजा आली.
त्यानंतर होता - 'द काऊबॉय स्टंट शो'. रंगमंचाच्या जागी एखाद्या काऊबॉयच्या सिनेमात शोभेल असा सेट उभा केलेला होता. काऊबॉयच्या वेषातले कलाकार 'स्टंट' च्या नावाखाली एकमेकांना नुसते धोपटत होते. हा शो मात्र खरंच 'केवळ लहान मुलांसाठी' होता. कारण मला तरी ५ मिनिटांतच त्या हाणामारीचा कंटाळा आला. आदित्यचा खिदळणारा चेहेरा त्यापेक्षा जास्त प्रेक्षणीय होता. हा शो संपेपर्यंत जेवणाची वेळ झाली.

एका मोठ्या हॉलमध्ये सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती. तिथे एकाच वेळी हजार-दीड हजार माणसं जेवू शकत होती. तो आकडा आणि तिथली प्रत्यक्ष गर्दी पाहून जेवणाचं जे चित्रं डोळ्यासमोर आलं त्याच्या एकदम उलटं दृश्य तिथे होतं. अतिशय उत्तम व्यवस्था, कुठेही गडबड-गोंधळ नाही; खोळंबलेली, जागेअभावी उभ्याने जेवणारी माणसं नाहीत की काही नाही. तिथे थाई, जपानी, चिनी पदार्थांचे वेगवेगळे स्टॉल्स होते. आधी व्यवस्थित पोट भरून जेवल्यावर मग मी त्या दिशेला मोहरा वळवला. चिनी पदार्थांचं विशेष आकर्षण नव्हतं, जपानी पदार्थांचा कसातरीच वास येत होता आणि नावावरून काय पदार्थ आहे ते पण कळत नव्हतं. राहता राहिले थाई पदार्थ .... त्यातल्यात्यात दोन पदार्थ जरा बरे वाटले म्हणून चाखून पहायचं ठरवलं. नावं आता विसरले - त्यातला एक छान होता चवीला पण दुसरा जो खाल्ला त्याची चव मात्र 'अशक्य भयंकर' होती. तो तोंडात घातल्याक्षणी माझा इतका विचित्र चेहेरा झाला की मी लगेच चपापून आपल्याकडे आपल्या गृपमधलं कुणी पाहत नाहीये ना याची खात्री करून घेतली. तर माझी ती फजिती नेमकी आईनंच पाहिली होती!!! आता पुन्हा म्हणून असल्या कुठल्याही पदार्थांच्या वाटेला जायचं नाही असं मी ठरवून टाकलं.

जेवणानंतर होता चौथा शो - 'द स्पाय वॉर शो'. जेम्स बॉन्डच्या सिनेमातला एक सेट उभा केलेला होता. पाऊण तासात वेगवेगळे स्पेश्यल इफ़ेक्ट्स आणि निरनिराळ्या इलेक्ट्रॉनिक करामती वापरून एक जेम्स बॉन्डची गोष्टच सादर केली गेली. अगदी रोप-वे वरची साहसदृष्यं आणि मिसाईल्सचा स्फोट सुध्दा!!! हा शो मात्र त्यातल्या नाविन्यामुळे मला आवडला.

चार खेळ आणि सोबतची भटकंती यांत दिवस कसा संपला ते कळलंही नाही. परतायची वेळ झाली. ऍनाचं 'तला-तला' कानावर पडलं आणि आम्ही बसच्या दिशेनं चालायला सुरूवात केली.
परतताना एका मोठ्या 'ड्यूटी-फ़्री शॉप' ला भेट द्यायची होती. (शुध्द मराठीत - एक अत्यंत महागडं दुकान !!) 'विंडो शॉपिंग' ला पैसे पडत नाहीत ते बरंय! तिथे तासभर वेळ घालवला. थाई चॉकोलेट्स विकत घेतली. बाहेर पडता-पडता कुठूनतरी कॉफ़ीचा वास दरवळत आला. नकळत पावलं तिकडे वळली. मी आणि अजय तिथली ८०-८० बाथ ची कॉफ़ी प्यायलो. आपल्या देशात 'एका कपाला ८० रुपये घेतात' म्हणून मी 'बरिस्ता कॉफ़ी' ला नेहेमी नावं ठेवते याचा मला तिथे चक्क विसर पडला!!

सात-साडेसातला हॉटेलवर परत आलो. जेवायला पुन्हा (ऍनाच्या भाषेत) 'कली पॉत' ला जायचं होतं. थाई भाषेत लहानग्यांचे बोबडे बोल आणि मोठ्यांचे साधे बोल असा फरकच नसावा बहुतेक!

थायलंडमधला चौथा दिवस संपत आला होता. 'चार दिवस झाले या देशात येऊन ??' खरं वाटेना ... तसंही, स्वप्नवतच चाल्लेलं होतं सगळं म्हणा!!!

२५ ऑक्टोबर - पाचवा दिवस

आमचं पहिलं भांडण ...


रोज संध्याकाळी 'बाय-बाय' म्हणायची वेळ झाली की ऍना आम्हाला दुसऱ्या दिवशीच्या तीन वेळा सांगायची - म्हणजे ७.००, ७.४५, ८.४५ किंवा ६.००, ७.००, ८.०० अश्या. त्या तीन वेळांपैकी, पहिली वेळ जेव्हा ६ पेक्षा जास्त असायची (जे फार क्वचित व्हायचं ...) तेव्हा सर्वात पहिला मला आनंद व्हायचा कारण त्या वेळा अनुक्रमे गजर, नाश्ता आणि हॉटेलमधून निघण्याच्या असायच्या!!!
त्यादिवशी पट्टाया सोडायचं होतं, साहजिकच चेक-आऊट असल्यामुळे सहा वाजता गजर होणार होता. काय करणार ... बॅंकॉक पहायचंय ? मग उठा लवकर ... !!! दोन दिवसांपासून त्या हॉटेलची एक लिफ़्ट बिघडली होती. मग एकतर एकाच लिफ़्टची वाट पाहत रहा उभं १०-१५ मिनिटं किंवा जिने चढा. बहुतेक वेळेला जिनेच चढावे लागायचे. त्यामुळे गुडघेदुखीवाली मंडळी जरा वैतागलीच होती. तरी बरं, खोल्या तिसऱ्या मजल्यावरच होत्या. त्यामुळे त्यादिवशी खाली येताना सर्वांच्या चेहेऱ्यावर जरा समाधान होतं की 'चला, आता इथून पुढे जिने चढावे लागणार नाहीत.'

काउंटरवर 'चेक‍आऊट' असं सांगून ज्याने-त्याने किल्ल्या 'ड्रॉप बॉक्स' मध्ये टाकायच्या होत्या. आदल्या दिवशी आमच्या रूमची किल्ली रिसेप्शनवाल्यांच्या हातूनच गहाळ झाली होती कुठेतरी. (नंतर ती सापडली म्हणे.) सकाळी कॉरल आयलंडला निघताना मी व्यवस्थित ड्रॉप बॉक्समध्ये टाकली होती. रात्री परत आल्यावर ती सापडेना म्हटल्यावर सगळेजण उगीचच माझ्याकडे संशयित नजरेने पहायला लागले होते. ती रिसेप्शनिस्ट तर काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हती. तावातावाने बोलताना थाई माणसं आपले डोळे मिटून घेतात आणि वाक्यातला शेवटचा शब्द लांब ओढत बोलतात. तिची भाषा कळली नाही पण 'डोकं भडकलंय' हे तर समजलंच लगेच. शेवटी, मास्टर-की ने आमची खोली उघडावी लागली होती. ते करणारी रूम-सर्विसवाली मुलगी पण 'एक साधी किल्ली नाही सांभाळता येत' असा चेहेरा करून आमच्याकडे पाहतपाहत निघून गेली होती. थोडक्यात काय, त्या दिवशी चेक‍आऊट करतानासुध्दा मी रिसेप्शन काउंटरवरच्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं हातवारे करून आणि मगच ड्रॉप बॉक्स मध्ये किल्ली टाकली. बाद में खालीपीली झंझट नहीं मंगता था अपुन को !!!
८.००-८.३० ला चेक‍आऊट करून, सामानासकट आम्ही निघालो. अर्धा दिवस पट्टाया परिसरातच रहणार होतो आम्ही पण पुन्हा हॉटेलवर यायचं नव्हतं. आज आमचा दौरा होता 'नॉंगनूच व्हिलेज'ला. (नॉंगनॉश व्हिलाश - इती ऍना); किंवा कदाचित तोच खरा थाई उच्चार होता त्या शब्दांचा. ३०-४० मिनिटं होती तिथे पोहोचायला. असा वेळ मिळाला की ऍना आमच्याशी गप्पा मारायची. थाई लोक, त्यांची संस्कृती, कुटुंब व्यवस्था, शिक्षणपध्दती याबद्दल बोलायची. तिथे लग्नाच्या वेळी नवऱ्याला हुंडा द्यावा लागतो आणि मोठ्यांची काळजी घेण्याचं वचन द्यावं लागतं असं कळलं. 'थाई लोक कुटुंबात रमणारे आहेत' असं तिने सांगितलं. तिथे शाळा-कॉलेजमध्ये दुय्यम भाषा शिकवत नाहीत. पूर्ण देशभर एकच भाषा शिकवली जाते, बोलली जाते. आपल्याला इंग्रजी येत नाही याचा त्या लोकांना सतत एक न्यूनगंड वाटतो. ऍना म्हणाली - 'तुम्ही भारतीय लोक जगभर कुठेही फिरा, इंग्रजी येत असल्यामुळे तुमचं कुठेही अडत नाही पण आम्हाला बाहेर गेलं की खूप अवघड जातं.' ते ऐकून तमाम पब्लिक खूष झालं ... मनातल्या मनात. पण चेहेऱ्यावर कुणी काही दाखवलं नाही. आपली 'इंग्रजी ज्ञानाची सव्वा लाखाची झाकली मूठ' कोण कशाला विनाकारण उघडेल !!! म्हणजे बघा, तिथे ते चित्र आणि इथे आपल्याकडे 'इंग्रजीचा अतिरेक, फाजिल लाड' म्हणून आरडाओरड चाललेली असते. लोकांना जिथे जे सहजासहजी मिळतं तिथे ते त्यांना नकोसं झालेलं असतं हेच खरं. दरम्यान, नॉंगनूच व्हिलेजच्या परिसरात बस शिरत होती त्यामुळे त्या गप्पा तिथेच थांबल्या.

एक ६०-७० वर्षांची थाई म्हातारी, तिच्या नावावर शेकडो एकरांची जमीन होती. कुठल्याही उद्योगधंद्याला किंवा गृहनिर्माण योजनेला ती जागा न विकता तिने ती तशीच मोकळी ठेवली, तिथे बागा बनवल्या, मोठमोठाली तळी खोदली, जगभरातली निरनिराळी झाडं, फुलझाडं तिथे आणून लावली आणि त्या जमिनीचं अक्षरशः सोनं करून टाकलं - ते हे 'नॉंगनूच व्हिलेज'. त्याचा पसारा सांभाळता यावा म्हणून तिनं लग्न देखील केलं नाही. ती झाडं इतकी कलात्मक रीतीनं लावली होती की काय-काय बघावं आणि नजरेत साठवावं असा प्रश्न पडला. आदल्यादिवशीच्या त्या गाडगीळांच्या दसपट असलेल्या जेम्स गॅलरीपेक्षा निसर्गाचं हे वैभव पहायला मला केव्हाही जास्त आवडलं असतं.

तासभर त्या बागेत घालवल्यावर पुढचा कार्यक्रम होता 'थाई कल्चरल शो'. नॉंगनूच व्हिलेजमध्ये झाडांचं प्रदूषणापासून रक्षण करण्यासाठी एका विशिष्ट मर्यादेनंतर कुठल्याही वाहनांना जायची परवानगी नाहीये. त्यामुळे पुढच्या त्या 'शो'च्या ठिकाणी चालतच जावं लागतं.विविध जमातींचे नृत्यप्रकार, थाई 'किक-बॉक्सिंग'चे प्रात्यक्षिक असा तो अर्ध्या-पाऊण तासाचा शो होता. कलाकारांची वेषभूषा, केशभूषा इ. आधी कधीही पाहिलेलं नसल्यामुळे बघायला छान वाटलं. बरेचसे प्रेक्षक परदेशीच होते .... आपण तरी कुठे आपल्या देशातली आदिवासी नृत्यं वगैरे पहायला जातो? पिकतं तिथे विकत नाही हेच खरं.
त्या शो नंतर होता The Elephant Show. सर्कसमध्ये असतात तश्या हत्तींच्या करामती, गमतीजमती होत्या. त्यामुळे विशेषतः आदित्यला खूप मजा आली. शोच्या शेवटी एका हत्तीनं त्याला आपल्या सोंडेत उचलून पण घेतलं.
ते खेळ संपल्यावर लोकांची बाहेर पडताना खूप गर्दी होते म्हणून ऍनाने आम्हाला एक भेटण्याची जागा दाखवून ठेवली होती. शिवाय तिची 'नीदी छत्ली' होतीच. मी बाहेर आले तर अजय आधीच तिथे पोचलेला होता. मला शंका आली. जवळ जाऊन त्याच्या कपाळाला हात लावून पाहिला - त्याच्या अंगात ताप होता. मला जोरात ओरडावंसं वाटलं - 'अरेऽऽऽ! काय चाललंय काय?!! कशाला आलो आपण इथे?' घरी त्याला कधीही आजारी पडलेला मी पाहिलेला नाही. आणि इथे त्याचं हे काय झालं होतं. मला हसावं की रडावं ते कळेना!! ... मुलांच्या मदतीला आली नाही तर ती आई कसली !! सासूबाईंकडे क्रोसिन होती. ती त्यांनी अजयला दिली. त्या क्रोसिनवर हवाला ठेवून आम्ही तिथून निघालो. पट्टाया शहराबाहेरच्या एका हॉटेलमध्ये जेवण होतं. जेवायला जायचं असलं की ऍना आधी त्या हॉटेलमध्ये फ़ोन करून दुसरा कुठला भारतीय गृप तिथे जेवायला आलेला नाहीये ना ते विचारायची. कारण आम्ही जाऊ त्या प्रत्येक ठिकाणी भारतीय हॉटेल्स होती पण लहानलहान होती आणि 'केसरी-सचिन' वगैरे सगळेजण तिथेच यायचे जेवायला आणि मग तिथे अशी गर्दी व्हायची की विचारायची सोय नाही. त्या गर्दीचा अनुभव आम्हाला अल्काझार शो नंतर आलेला होता. त्यादिवशी 'रेस्तरॉं मोकळं आहे' असं कळल्यावर तिनं आम्हाला घाई करून तिथून बाहेर काढलं आणि बस त्या दिशेने निघाली.
जय क्रोसिन!!! जेवायच्या ठिकाणी पोचेपर्यंत अजयचा ताप उतरलेला होता. तिथे जेवलो. आमचं जेवण संपतासंपता सचिन ट्रॅव्हल्सचा गृप आलाच तिथे. मग आम्ही विजयी मुद्रेने तिथून बाहेर पडलो.

'चोनबुरी राज्य महामार्गा'वरून आमची बस निघाली. बॅंकॉक आणि पट्टाया दोन्ही 'चोनबुरी' जिल्ह्यात येतात हे रस्त्यांवरच्या एकदोन इंग्रजी पाट्या वाचून कळलं. फक्त महामार्गांवरच इंग्रजी आणि थाई - दोन्ही भाषेत पाट्या होत्या. इतर सगळीकडे निरक्षराची गत होती. वाटेत 'लोटस शॉपिंग मार्केट' मध्ये थोडा वेळ थांबायचं होतं. शॉपिंग मार्केट कसलं, तो तर एक भलाथोरला मॉल वाटला मला तरी. कदाचित २-३ मजलीच होता म्हणून त्याला मॉल म्हणत नसावेत. आम्ही त्या मोठ्याच्यामोठ्या मार्केटमध्ये सर्वप्रथम काय शोधलं असेल ?? ... तर डोक्याला लावायचं तेल!!! प्रवासासाठी सामानाची बांधाबांध करत असताना दहा जणांच्या दहा सूचना रोज ऐकायला मिळत. अशीच कुठलीतरी सूचना ऐकून आम्ही सामानातली तेलाची बाटली काढून ठेवली होती. पण आम्हाला सगळ्यांनाच नियमित तेल वापरायची सवय आहे - अजय सोडून. त्यामुळे ३-४ दिवसांनी त्याच्याविना चैन पडेनासं झालं होतं. साधं तेल कुठेच दिसलं नाही. सेल्स गर्ल्सना विचारून काहीही उपयोग झाला नाही. शेवटी आम्ही चक्क 'बेबी ऑईल' विकत घेतलं. साठी-सत्तरीच्या घरातल्या तीन, पस्तिशीच्या एका आणि ११ वर्षांच्या एका - अश्या पाच 'बेबीज'नी मग ते तेल वापरलं पुढचे ८-१० दिवस!!! आम्ही त्या मार्केटमध्ये इकडेतिकडे फिरेपर्यंत आदित्य दुसऱ्या मजल्यावरच्या काही व्हिडियोगेम्स खेळून आला. सरकते जिने आणि व्हिडियोगेम्स अशी दुहेरी मेजवानी मिळाली त्याला. थोडीफार खाद्यपदार्थांची पण खरेदी केली आणि तासाभराने तिथून निघालो. बाहेर खूप ऊन होतं. आता बॅंकॉक गाठायचं होतं.

बॅंकॉकमध्ये वाहतुकीचा खोळंबा होणं ही नित्याचीच बाब आहे याचं सूतोवाच ऍनानं आधीच करून ठेवलं होतं आणि त्याचा प्रत्यय बॅंकॉकमध्ये शिरल्यावर लगेच आलाच. पण त्या दिवशी आम्ही बसमध्ये सर्वात पुढच्या सीटवर बसलो होतो. त्यामुळे समोरच्या काचेतून रस्त्यांवरच्या पाट्या बघण्यात, त्यांवरच्या थाई अक्षरांचा अर्थ लावण्याच्या प्रयत्नात तो खोळंबा कंटाळवाणा नाही झाला.
आपला देश सोडून आता आम्हाला ३-४ दिवस झाले होते. इतक्या दिवसात बसमधून जाता-येता कुठेही शाळा किंवा शाळेला जाणारी मुलं दिसली नव्हती रस्त्यांवर. ऍनाला तसं विचारल्यावर तिनं सांगितलं की सुट्ट्यांनंतर शाळा सुरु व्हायला अजून १-२ दिवस अवकाश होता.

बॅंकॉकमध्ये भर गर्दीच्या रस्त्यावर आमचं 'फ़र्स्ट हॉटेल' होतं. खरेदीची सर्व प्रमुख ठिकाणं जवळपासच होती. भर रस्त्यावर हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशी बस उभी करायला परवानगी नव्हती. शेजारच्या एका अरुंद गल्लीत बस वळवायची होती. एक तर ती भलीथोरली 'व्हॉल्वो' बस, वळवायला जागा अगदी कमी आणि वाहता रस्ता ... पण आमच्या ड्रायव्हरनं इतक्या शिताफीनं ते सगळं केलं की मान लिया उसको. २-३ वेळा पुढेमागे करावं लागलं पण तेवढंच. मागून येणाऱ्या गाड्या तोपर्यंत शांतपणे रस्ता मिळण्याची वाट पाहत थांबल्या. कुठेही घुसवाघुसवी नाही की कर्णकर्कश्श हॉर्न्स नाहीत. खरं तर, त्यामुळेच २-३ प्रयत्नांत ती बस आत वळू शकली. तसंही, १५ दिवसांत गाड्यांचे जोरजोरात वाजणारे हॉर्न्स आम्ही कुठेही ऐकले नाहीत.
कोलंबो, पट्टायाच्या तुलनेत या हॉटेलच्या खोल्या जरा लहान होत्या. कोलंबोला आमचा पोहण्याचा बेत पावसामुळे फसला, पट्टायाला तेवढा रिकामा वेळच नव्हता मिळाला. इथे खोल्या ताब्यात मिळून सामान टाकल्यावर मात्र आदित्यनं भुणभूण सुरु केली. माझा त्या वेळी पोहण्याचा बिलकुल मानस नव्हता कारण जेमतेम तासाभरात आम्हाला जेवणासाठी बाहेर पडायचं होतं. त्यापूर्वी जरा मस्त चहा-कॉफ़ी प्यायचा आमचा विचार होता. पण आदित्यची समजूत कशी काय काढायची? शेवटी आमच्या गृपमधले एक काका पोहायला चालले होते, त्यांच्याबरोबर त्याला पाठवलं. त्या परांजपे काकांशी आदित्यची नंतर चांगलीच गट्टी जमली.
रात्री 'करी पॉट' नावाच्या भारतीय रेस्तरॉमध्ये जेवण होतं. आमच्या हॉटेलपासून ते अगदी जवळ होतं, पण गृपमध्ये आजी-आजोबा बरेच असल्याने आम्ही बसनंच गेलो तिथे. हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी होती. कुठलातरी गुज्जू गृप होता. 'आता १५ दिवस कानावर 'आगड-पाछड' पडणार नाही' असं वाटलं होतं घरातून निघताना. पण सहलीच्या पाचव्या दिवशीच तो समज चुकीचा ठरला. गुज्जूंपासून आता आम्हाला सुटका नाही हेच खरं.
तिथे जवळच 'बिग-सी शॉपिंग मॉल' होता. जेवणानंतर त्या शॉपिंग मॉलमध्ये एक चक्कर टाकायची टूम निघाली. आमच्याबरोबर जोशी म्हणून एक कुटुंब होतं. त्यांची मुलगी पूर्वा आणि आई - दोघी मिळून एक खोली वापरायच्या. त्यामुळे त्यांच्याशी पण आमची आता चांगली ओळख झाली होती. प्रथम, मी, आदित्य, बाबा आणि ते तिघं जोशी असे जमलो. शिंदेंची परवानगी घेतली. हळुहळू इतर काहीजण सुध्दा आम्हाला येऊन मिळाले आणि शेवटी आम्ही १६-१७ जण तिथून निघालो चालत. इतर लोकांना घेऊन बस हॉटेलवर परत गेली. संध्याकाळी आदित्य जेव्हा पोहायला गेला होता तेव्हा त्या जोशींनी आसपासच्या भागात एक चक्कर मारलेली होती. त्यामुळे त्यांच्या भरवश्यावर आम्ही सगळे त्यांच्या मागेमागे निघालो होतो ... बॅंकॉकच्या पूर्णपणे अनोळखी रस्त्यांवरून आम्ही असे भटकत होतो की जणू तो डेक्कन जिमखाना असावा आणि ते सुध्दा रात्री ९.३० वाजता. 'बिग-सी' रात्री ११ वाजेपर्यंत उघडं असतं असं कळलं होतं. म्हणजे भरपूर वेळ होता. पदपथावर विक्रेत्यांची आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांची प्रचंड गर्दी होती. दादर परिसरातून फिरत असल्यासारखं वाटत होतं. फरक एवढाच की आपल्याकडे वडापाव किंवा पावभाजीच्या गाड्या असतात, तिथे केवळ मांसाहारी पदार्थांच्या होत्या. त्या गाड्यांवर जे काही शिजत होतं ना त्याची अक्षरशः शिसारी आली. तो वास अजूनही माझ्या नाकात बसलाय. हेच का ते जगप्रसिध्द 'थाई फ़ूड'?? बॅंकॉकमध्ये शक्य झालं तर कुठेतरी 'थाई फ़ूड' चाखून पहायचं मी ठरवलं होतं आधी. पण आता या असल्या वासानं त्याचा पुनर्विचार करण्याची गरज भासायला लागली होती. रस्ता पक्का माहीत नसल्यामुळे थोडा लांबचा वळसा घेऊन, अधेमधे कुणाकुणाला विचारत १० नंतर मॉलपाशी पोचलो. ८-१० मजली शॉपिंग मॉल मी प्रथमच पाहत होते. आत शिरल्यावर समोर मोठ्या फलकावर कुठल्या मजल्यावर काय आहे त्याची माहिती दिसत होती. अर्धीअधिक जागा चित्रपटगृहं आणि उपहारगृहं यांनीच व्यापलेली होती. आम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तिसऱ्या मजल्यावर होत्या. 'एस्कलेटर्स ... !!!' आदित्यचे डोळे लगेच चमकले. तिसऱ्या मजल्यावर एस्कलेट झालो ...

... ११ कधी वाजले कळलंही नाही. परत चालतचालत हॉटेलवर आलो. जरा पायपीट केल्यामुळे बरं वाटलं. आमच्याबरोबर मॉलमध्ये एक आजी-आजोबा आले होते ते शिंदेंना न सांगताच! आम्हाला त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे तिकडे हॉटेलमध्ये ते कुठे दिसेनात म्हटल्यावर साहजिकच सगळ्यांना काळजी वाटायला लागली होती. शिंदेंनी अंदाज बांधला की ते आमच्याबरोबर असतील. पण कळणार कसं? म्हणून, आम्ही परत आलोय की नाही ते विचारण्यासाठी त्यांनी ३-४ वेळा अजयला फ़ोन केला. अजयला वाटलं आम्हीच न सांगता गेलोय म्हणून ते सारखा फ़ोन करताहेत. तो आमच्यावर जाम भडकला. आम्ही परत आलो तेव्हा तो जोरदार भांडणाच्या पावित्र्यात होता. 'मी सांगून गेले होते' हे तो ऐकून घ्यायलाच तयार होईना. अश्यावेळी मात्र ताप-मळमळ काही आड येत नाही!!! मलाही कळेना की व्यवस्थित परवानगी घेऊनसुध्दा शिंदेंनी ३-४ वेळा चौकशी का करावी? पण रात्री ११.३० वाजता, आदित्यसमोर वाद नको म्हणून मी काही जास्त बोलले नाही. या सगळ्या प्रकाराचा उलगडा दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी झाला.

कुठेही प्रवासाला निघायचं की नवरा-बायकोचं सामान भरताना पहिलं भांडण होतं. नंतर प्रवासातपण साध्यासाध्या कारणानं भांडणं, वादावादी होते. निघाल्यापासून आमच्यात एकही वाद झाला नव्हता - जरा आश्चर्याचीच गोष्ट होती पण कदाचित निघाल्यापासून अजयची तब्ब्येत बरी नव्हती त्यामुळे असेल ... पण, जर तसं होतं तर मग आता मला निवांत झोपायला हरकत नव्हती कारण आम्ही भांडलो याचा अर्थ आमचा नवरा ठणठणीत बरा झाला होता ...आणि याहून दुसरं काय हवं होतं !!!!!!!!!

२४ ऑक्टोबर - चौथा दिवस


आज मैं उपर ...


सकाळी ७ वाजता गजर होणार होता. सहा-सव्वासहालाच माझी झोप पूर्ण झाली आणि जाग आली. (घरी पण रोज अशी जाग आली तर किती बरं होईल!!) क्षणभर काही उलगडेना - आपण नक्की कुठे आहोत, ही खोली कुठली - काही कळेना! अचानक ट्यूब पेटली आणि झोप उडाली. उठून बाल्कनीत गेले. बाहेर खूप दमट हवा होती. समोर तळमजल्यावरचा निळाशार पोहण्याचा तलाव मस्त दिसत होता. त्यात थोडा वेळ डुंबायचा खूप मोह झाला. पण आज आम्ही तेच तर करणार होतो आणि ते सुध्दा समुद्रावर, म्हणजे सर्वात मोठ्या नैसर्गिक तलावात!!!
तेवढ्यात उजवीकडच्या बाल्कनीत आई दिसली. गजराच्याआधी जाग आली म्हणून मी स्वतःवर खूष होते तर इथे आई आंघोळ वगैरे उरकून तयार हो‍ऊन बसली होती. पण एकंदरच, आमची तीनही म्हातारी मंडळी फारच उत्साही होती. आधीच्या जागरणभरल्या दोन दिवसांत सुध्दा त्यांचा कंटाळलेला, थकलेला चेहेरा मी पाहिला नाही. आईशी थोडा वेळ बोलेपर्यंत डावीकडच्या बाल्कनीतून बाबांचं 'गुड मॉर्निंग' ऐकू आलं. बॅटऱ्या पुन्हा चार्ज झालेल्या होत्या!!!
आज अजून एका गोष्टीची उत्सुकता होती. आज आमच्या सासूबाईंना आम्ही प्रथमच पंजाबी ड्रेसमध्ये पाहणार होतो. सौ. शिन्देंच्या विनंतीवरून त्या ड्रेस घालायला तयार झाल्या होत्या. ड्रेसमध्ये त्या ७-८ वर्षांनी लहान दिसत होत्या. ट्रीपला त्यांना आणून आम्ही बिलकुल चूक केलेली नव्हती. कारण नाहीतर आम्हाला त्यांना ड्रेसमध्ये कधीच पाहता आलं नसतं!! त्या दिवशी बोटीत चढ-उतर बरीच होती दिवसभर म्हणून साडीपेक्षा ड्रेस बरा असा शिंदेंचा सगळ्या आज्यांना सल्ला होता आणि आश्चर्य म्हणजे झाडून सगळ्या आज्या त्या दिवशी पंजाबी ड्रेसेस घालून आल्या होत्या!!! एकेकीला ओळखणं अवघड गेलं आम्हाला.
तर, सगळे तयार हो‍ऊन साडेआठ वाजता खाली आलो. नाश्त्याला मऊ-मऊ, गरमा-गरम उपमा होता. वा! याहून जास्त काय हवं होतं!!! मस्त उपमा चापला, नंतर छान कॉफ़ी होतीच. निघाल्यापासून प्रथमच त्या दिवशी अजयने व्यवस्थित नाश्ता केला. पुरेशी झोप झाल्यामुळे आज त्याचा चेहेरा जरा ताजातवाना वाटत होता.
हॉटेलतर्फेच सगळ्यांना टॉवेल्स देण्यात आले होते. ते घेतले आणि साडेनऊला बस आणि व्हॅन निघाली. पाच मिनिटांतच उतरायचं होतं. फ़ूटपाथ पार केला की लगेच समुद्र. दोन स्पीड मोटर बोट्स उभ्याच होत्या. पाण्यातून बोटीत चढलो. चांगलं गुडघाभर पाणी होतं. बोटी निघाल्या.
एकंदर वेग आणि लाटांवरचे हेलकावे बघता अजयचं - आणि माझंही - काही खरं नव्हतं पुन्हा एकदा. लांबवर इतर बोटी, पॅरासेलिंगची उडणारी पॅराशूट्स दिसत होती. थोड्याच वेळात त्या लटकणाऱ्या पॅराशूट्सपैकी एक माझंही असणार होतं!!!
पट्टायाचा किनारा हळुहळू मागे पडत होता. १५-२० मिनिटांनंतर एका मोठ्या तराफ्यापाशी बोट थांबली. तिथे पॅरासेलिंगसाठी सगळे उतरलो. मी तिकिट काढलं आणि रांगेत उभी राहिले. एक तिकिट - ३५० बाथ. बाप-रे!! आपल्या देशात इतके पैसे देऊन मला नाही वाटत मी अर्ध्या-एक मिनिटाच्या पॅरासेलिंगच्या नादाला लागले असते म्हणून. पण ते सहलीचं, मजा करायचं वातावरण वेगळंच असतं आणि त्यात मी तर वापीतच ठरवलं होतं की पॅरासेलिंग करायचं. थोडा वेळ हो-नाही करताकरता बाबापण रांगेत येऊन उभे राहिले. उत्साह असावा तर असा! आदित्यने मात्र विशेष उत्सुकता दाखवली नाही. मी पण त्याला जास्त आग्रह केला नाही. अजयला पुन्हा बोटीमुळे त्रास व्हायला लागला होता. त्यामुळे तो बाद होता. अनुक्रमे, गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आणि रक्तदाबाचा त्रास यामुळे दोन्ही आज्या पण बाद होत्या. म्हणजे आमच्यातले दोनच गडी मैदानात उतरले होते.
जरा वेळाने लाईफ़-जॅकेट्स अंगावर चढली. तो सगळा प्रकार भलताच बोजड होता. ह्या असल्या सगळ्या वजनदार वस्तू अंगावर चढवून लोकं रिव्हर-राफ़्टींग, पॅरासेलिंग, ग्लायडींग कशी काय करतात कोण जाणे. कदाचित त्यातला थरार त्यांना जास्त भावत असेल.
रांगेतले पुढचे लोक टेकऑफ़ करताना, खाली उतरताना मी निरीक्षण करत होते. तिथले मदतनीस फारच चपळाईने हालचाली करत होते. एका माणसाला पॅराशूटपासून सोडवायचं आणि त्याच हूक्सना पुढच्या माणसाला अडकवायचं आणि हे सगळं काही सेकंदांच्या आत, वारा जोरात वाहत असताना, पॅराशूटमध्ये पूर्ण हवा भरलेली असताना ... खायचं काम नव्हतं!!! सगळे घामेघूम झाले होते. ओरडून सूचना देऊन सगळ्यांचे घसे बसलेले होते. एक व्यक्ती उतरत-उतरत आली की ४-५ जण लगेच धावत त्याला पकडायचे आणि अलगद त्याचे पाय खाली टेकवायचे, पॅराशूटपासून सोडवून त्याला तिथून हाताला धरून अक्षरशः हाकलायचे. तोपर्यंत अजून दोनजण पुढच्या माणसाला पकडून त्या जागी उभे करायचे, सोडवलेले हूक्स त्या माणसाच्या जॅकेटच्या हूक्समध्ये अडकवायचे, की मोटरबोटवाला सुसाट निघायचा. पॅराशूटची दोरी त्या बोटीला बांधलेली ... बोटीने वेग घेतला की पॅराशूट वर, वेग कमी झाला की पॅराशूटची उंची कमी-कमी व्हायला लागायची. या एवढ्या सगळ्या गोष्टी फक्त ४-५ सेकंदांत पार पडायच्या. एक माणूस उडतोय न उडतोय तोपर्यंत आधी उडलेला एखादा उतरायचा - हे असं अविरत चाललेलं होतं.
रांगेत मी पुढेपुढे सरकत होते ... पण मला भीती वगैरे बिलकुल वाटत नव्हती. घाबरायचं केव्हा, जेव्हा ताबा ठेवण्याचं काम आपल्या हातात असेल. तिथे माझ्या हातात काहीच नव्हतं. सगळी भिस्त मला लटकवणाऱ्या त्या दोन हूक्सवर. पाण्याची भीती तर मला कधीच नव्हती शिवाय लाईफ़-जॅकेट्स होतीच. माझ्या आधीचा माणूस उडला, तो वर जाताना पाहत होते तेवढ्यात डावीकडून एक उतरला. खस्सकन मला ३-४ जणांनी ओढलं, हूक्स अडकवले. त्यांनी सांगितलं त्यापेक्षा भलतीकडेच मी दोर पकडले हाताने तर त्यांतला एक माझ्यावर जाम भडकला. बिच्चारे! ते तरी काय करणार. काही अपघात झाला तर लोक आधी त्यांनाच धरणार ना. त्यामुळे मला त्या माणसाचा राग नाही आला. आधीच त्यांचं मोडकंतोडकं थाई उच्चारांचं इंग्रजी, त्यात डोळ्यांशिवाय त्या सगळ्यांचे चेहेरे रुमालाने झाकलेले. त्यामुळे ते काय सांगताहेत ते काहीही कळत नव्हतं. त्याने चिडून 'माझ्या डोळ्यांकडे बघ' अशी खूण केली. मग माझ्या डोक्यात शिरलं की तो मला कुठले दोर धरायला सांगत होता ते. जरा 'सॉरी' वगैरे म्हणायचा विचार करत होते पण वेळ निघून गेली होती ... मी केव्हाच वर उडालेली होते ...
त्या क्षणी जे वाटलं त्याचं शब्दांत वर्णन करणं केवळ अशक्य!! १-२ सेकंद मी श्वास घ्यायचा विसरले. पक्ष्यांसारखे पंख नसल्यामुळे मनुष्यप्राणी कुठल्या आनंदाला मुकतो त्याची कल्पना ना जमिनीवरून येत ना विमानात बसून!! बोटीला ब्रेक लागला की लटकणारे पाय पुढेमागे झुलायला लागायचे आणि पॅराशूट हळुहळू खाली-खाली यायला लागायचं. वेग वाढला की पुन्हा वर, की पुन्हा श्वास घ्यायचा विसर पडायचा. बोटीने त्या मोठ्या तराफ्याला एक फेरी मारली. उंची आणि वेग जरा अंगवळणी पडे-पडेपर्यंत उतरायची वेळ आली सुध्दा!! तोपर्यंत एक हात सोडायचा धीर पण आला होता. अजय खाली कॅमेरा घेऊन तयार होता. मी चक्क त्याला एक 'पोझ' वगैरे दिली हात हलवून. खरं म्हणजे, टेक ऑफ़ करताना सुध्दा हाताने दोर धरले नसते तरी चाललं असतं हे नंतर लक्षात आलं. पण त्यासाठी पुन्हा ३५० बाथ कोण खर्च करणार!!!
... जसं टेक ऑफ़ कधी झालं ते कळलं नाही तसंच खाली उतरून अंगावरचं लाईफ़-जॅकेट कधी निघालं तेही कळलं नाही. पण माझ्या चेहेऱ्यावर आता 'लई मोटं मैदान' मारून आल्याचे भाव होते. आमच्यापैकी बरेचजण रांगेत उभे होते पण उड्डाण सर्वप्रथम मी केलं होतं!! त्यामुळे आपला भाव आता एकदम वधारला होता. सगळ्यांनी मला पकडून नाना प्रश्न विचारायला सुरूवात केली. मी पण अगदी जग जिंकल्याच्या थाटात त्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली, काही आज्यांना धीरही दिला!! जरा पाणीबिणी पिऊन इतरांची मजा बघायला पुन्हा पुढे जाऊन उभी राहीले. आता बाबांची उडायची वेळ आली होती. पुन्हा तेच ना, आपल्या हातात काहीच नसतं करण्यासारखं .. त्यामुळे बाबा नीट जातील ना, त्यांना काही अडचण नाही ना येणार या शंकांना काही अर्थ नव्हता. त्यांनी पण मस्त मजा घेतली. मग इतरांचं होईपर्यंत पुन्हापुन्हा तो क्षण आठवत राहिले. पूर्ण १५ दिवसांच्या सहलीत कोलंबो-बॅंकॉक प्रवासापाठोपाठ हा अनुभव मनावर कायमचा कोरला गेला होता. २४ ऑक्टोबर २००६ हा दिवस आता मी कधीही विसरणार नाही.

अर्ध्यापाऊण तासाने तिथून सगळे निघालो. आता कॉरल आयलंडला जायचं होतं. पुन्हा एकदा हेलकावे खाणारी बोट ... नको वाटत होतं. ३०-४० मिनिटांचा प्रवास होता. वाटेत पुन्हा एक मोठा तराफा लागला. २-४ इच्छुक मंडळी तिथे 'स्कूबा डायव्हिंग' साठी उतरली आणि आमची बोट पुढे निघाली. का कोण जाणे, पण स्कूबा डायव्हिंग मला नाही करावसं वाटलं. पाण्याखालचं विश्व मला म्हणावं तेवढं आकर्षित करत नाही कधी. 'डिस्कवरी'वरचे त्या प्रकारचे कार्यक्रम पण मला कंटाळवाणे वाटतात कधीकधी. मला खरंच त्याचं कारण माहीत नाही!!!
कॉरल आयलंडवर उतरलो. किनाऱ्यावर बसायला आरामखुर्च्या आणि वर मोठ्ठ्या छत्र्या - अश्या लांबच्यालांब रांगा होत्या. खुर्च्या दिसल्यावर आमची इकडची स्वारी पुन्हा एकदा खुर्चीत सांडली ... मान खाली घालून, डोळे मिटून बसून राहिली!!
पाणी एकदम स्वच्छ, निळं-हिरवं होतं. वाळू पांढरी. समुद्राचा तळ अगदी स्पष्ट दिसत होता. काही अंतरापर्यंत पोहण्यासाठी वगैरे पाणी सुरक्षित होतं. तिथपर्यंत दोर लावून ठेवलेले होते. त्यापुढे जायला बंदी होती. आदित्यला स्कूटरबोटवर बसायचं होतं. त्याचं तिकीट काढलं. रांग होतीच. पण फार वेळ उभं रहावं लागलं नाही. स्कूटरबोटवर पुढे लाईफ़-जॅकेटसकट आदित्य आणि मागे एक मदतनीस - असे निघाले. बोट निघाल्याक्षणी पुढून पाण्याचा मोठा फ़वारा त्याच्या अंगावर उडला. त्याला तेच हवं होतं. थोड्याच वेळात तो दिसेनासा झाला. ५-१० मिनिटांनी परत आला तेव्हा तो पूर्ण भिजलेला होता आणि चेहेरा मात्र आनंदाने फुललेला होता. पैसे (की बाथ??) वसूल झालेले होते.
आता त्याला माझ्याबरोबर पाण्यात खेळायचं होतं. बाबा पण आले आमच्याबरोबर. पाण्यात कितीही वेळ घालवता येतो. अर्धा-एक तास, दोन तास - कमीच वाटतात. किती वेळ पाण्यात होतो माहीत नाही. पण निघायची वेळ आली तेव्हा नेहेमीप्रमाणे आदित्यला बाहेर यायचं नव्हतं ... खरं म्हणजे मला सुध्दा!!! पण पट्टायाला परत जाऊन जेवायचं होतं.
पाण्यात खेळायला मजा येते पण नंतर भूकही लागते फार. अजय बसला होता तिथे एक माणूस मक्याची उकडलेली, गरमागरम कणसं विकत होता. त्यातल्या चार कणसांच्या दाण्यांवर आमची नावं लिहिलेली होती त्यामुळे आम्हाला ती खाणं क्रमप्राप्त होतं!!! पण किंमत ऐकून ती लिहिलेली नावं पुसून टाकावीत या निर्णयापर्यंत मी आले होते कारण किंमत खूपच जास्त होती आणि 'भाव करणे' हा माझा प्रांत कधीच नव्हता. शेवटी सासूबाईंचं प्रॉंप्टिंग, त्या माणसाला कळतील असे ४-२ इंग्रजी शब्द आणि भरपूर हातवारे आणि खाणाखुणा - एवढं सगळं झाल्यावर दोन्ही गटांचं समाधान होईल असा सौदा पक्का झाला आणि ती चार कणसं इप्सीत स्थळी जाऊन पोचली. त्या मेजवानीची मजा काय वर्णावी!!!
तिथून 'तला-तला' झाल्यावर सौ. शिंदेंनी सांगितलं की आता काचेचा तळ असलेल्या बोटीतून एक फेरी आहे ज्यात पाण्याखालची कॉरल्स पहायला मिळतील. अरे वा! अजून एक नवा अनुभव! उत्साहात सगळे त्या काचेचा तळ असलेल्या बोटीत बसलो. तर कुठलं काय, तो काचेचा तळ की काय - तो कुठेच दिसेना. मग लक्षात आलं की बोटीत तळाशी लांब फळ्या असतात त्यांपैकी एक फळी पारदर्शक ऍक्रिलिकची बनलेली होती. रुंदी जेमतेम ८-१० इंच!!! अमोरासमोर आम्ही बसलो होतो ... 'खाली वाकून डोक्यावर पूर्ण टॉवेल्स पांघरून घ्या' अशी सूचना आली. ते थाई मिश्रित इंग्रजी समजायला आम्हाला पाच मिनिटं लागली. वरच्या उन्हामुळे पाण्याचा तळ दिसत नव्हता, तो टॉवेल्सची सावली धरल्यावर एकदम दिसायला लागला आणि त्यातली कॉरल्स पण. जरा त्याला नजर सरावते न सरावते तोच ती फेरी संपली!!! 'हात्तिच्या- एवढंच?' असं झालं सगळ्यांना. ती फेरी अजून ५-१० मिनिटं तरी जास्त हवी होती असं वाटलं. कारण तेवढ्या वेळात सुध्दा जी काय ४-२ कॉरल्स पाहिली ती अप्रतिम होती. कदाचित स्कूबा डायव्हिंग केलं असतं तर ती जास्त चांगल्या रितीने पाहता आली असती. पण आता 'जर-तर'ला थारा नव्हता; ती बोट सोडून आम्ही पुन्हा स्पीड मोटर बोटीत चढलो होतो आणि परतीच्या वाटेला लागलो होतो.

वाटेत पुन्हा मगाचचा पॅरासेलिंगचा तराफा दिसला. तशीच रांग होती, तशीच माणसं उडत होती, उतरत होती; तशीच त्या मदतनिसांची धावपळ सुरू होती. आम्ही पॅरासेलिंगचा अनुभव कधीही विसरणार नव्हतो पण तिथे काम करणाऱ्या त्या लोकांना लक्षात ठेवण्यासारखं काही विशेष होतं का? त्यांच्या दृष्टीने दोन वेळची भ्रांत मिटवण्याचं ते केवळ एक साधन होतं. दृष्टिकोन बदलला की एकाच गोष्टीचं किती वेगळं रूप समोर येतं!!

परतताना बोट जरा जास्तच हेलकावे खात होती. त्यामुळे मला पण त्रास व्हायला लागला. 'कधी पोचतोय' असं झालं होतं. शेवटी एकदाचा किनारा गाठला. उतरून रस्त्यावर आलो तर तिथे आमचेच पॅरासेलिंगचे फ़ोटो मांडून ठेवलेले होते विक्रीसाठी!!! एक फ़ोटो - १०० बाथ. पैसे कमवायचे किती मार्ग शोधून काढतो माणूस!!! त्या फ़ोटोंचं ते नंतर काय करत असतील असा मला प्रश्न पडला.
बसमध्ये बसायचं तर बस कुठे दिसेना. त्या ऐवजी ऍनाने आम्हाला रस्ता ओलांडून समोरच्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका नळापाशी नेलं आणि तिथे पाय धुवायला सांगितलं. माझे पाय काही फारसे खराब नव्हते म्हणून मी तशीच पुढे चालायला लागले तर तिने मला परत बोलावलं. पायांची सगळी वाळू धुवून काढल्याशिवाय बसमध्ये कुणालाही प्रवेश नव्हता असं कळलं. मी निमूटपणे पाय धुतले. त्या इमारतीच्या पलिकडे आमची बस उभी होती. तिथून निघून हॉटेलवर परत आलो.

जेवणानंतर विश्रांतीसाठी थोडा वेळ होता. त्यानंतर 'जेम्स गॅलरी' ला भेट द्यायची होती. हॉटेलवर आल्यावर आमच्या सासूबाईंनी पहिली गोष्ट काय केली असेल तर पंजाबी ड्रेस बदलून पुन्हा साडी नेसली!!! 'जेम्स गॅलरी'ला अजय आलाच नाही. काहीही न खातापिता तो तसाच खोलीत झोपून राहिला. 'ह्याला ट्रीपला आणून चूक केली' असं आता मला वाटायला लागलं होतं!!!!!!

एका मोठ्या दिमाखदार, दुमजली इमारतीत ती खाजगी 'जेम्स गॅलरी' आणि दुकान आहे. आत शिरल्याशिरल्या एक छोटी 'ट्रेन राईड' होती सर्वांसाठी. लहान मुलांच्या बागेत असते तशी एक चार डब्यांची छोटी गाडी होती. ती १५-२० मिनिटांत आपल्याला फिरवून आणते एका अंधाऱ्या गुहेतल्या मार्गावरून. मौल्यवान रत्नं कशी बनतात, पुरातन काळापासून जडजवाहिऱ्यांचा व्यवसाय कसाकसा बदलत आला इ. वर्णन करणारे देखावे वाटेत ठिकठिकाणी उभे केलेले होते आणि एकीकडे ध्वनिमुद्रित समालोचन सुरू होतं. मजा आली ते पहायला आणि ऐकायला!! कंटाळवाणी ठरणारी माहिती लोकांनी आवडीने ऐकावी यासाठी केलेला तो एक छानच प्रयत्न होता. त्यानंतर आम्ही रत्नांना पैलू पाडण्याचं काम चालू होतं तिथे गेलो. ते अतिशय जिकीरीचं काम असतं हे माहीत होतं पण प्रत्यक्ष तेव्हा पहायला मिळालं. तिथून मग मुख्य दुकानात गेलो. ते फारच भव्य आणि प्रचंड होतं. लोकांच्या जिभांवर लगेच - पु. लं. च्या भाषेत - सरस्वतीने क्लास उघडला - 'गाडगीळांची १० दुकानं मावतील यात, एक जेम्स गॅलरी पौड रोडवर सुरू केली तर त्याची त्यांनी केवढी जाहिरातबाजी केली, इथे येऊन पहा म्हणावं. याची सर तरी आहे का त्या दुकानाला ...' वगैरे, वगैरे!! आता, ते दुकान भव्य होतं हे खरंच, गाडगीळांची १० दुकानं खरंचंच तिथे मावली असती पण म्हणून गाडगीळांना खुन्नस द्यायची काही गरज होती का!!! आणि गाडगीळांना 'इथे येऊन पहा' म्हणायला त्यांनी काय ती पाहिली नसेल का!!! पण अश्या गप्पा नाही झाल्या तर आपलं मनोरंजन तरी होणार कसं, नाही का!! त्यामुळे मी त्या सगळ्या गप्पांची मस्त मजा घेतली. कारण नाहीतर त्या दागदागिन्यांत मला विशेष रस नव्हता. अर्थात, अनेक अनमोल रत्नं, ज्यांचे आजवर फक्त फ़ोटोच पाहिले होते, ती सगळी तिथे प्रत्यक्ष पाहिली - विविध आकार-प्रकारांत. हौशी मंडळी किमती विचारत होती, अव्वाच्यासव्वा किमती ऐकून, चेहेरे पाडून पुढे सरकत होती. काहींनी थोडीफार खरेदी पण केली. आम्ही पाचजण सगळीकडे एक चक्कर मारून बाहेर पडलो.

सहा-सव्वासहाला तिथून निघालो. त्या दिवसाचं शेवटचं आकर्षण होतं - थाई मसाज. अर्थात ते ऐच्छिक होतं. आदल्या दिवशीच बॅंकॉकहून येताना ऍनाने त्याबद्दल सांगितलं होतं. थाई मसाजचा अनुभव एकदा घ्यायलाच हवा असं सौ. शिंदेंचं पण मत होतं. आधी मी फारशी उत्सुक नव्हते. तर अजयने मला आग्रह करुन माझं पण नाव दिलं होतं यादीत आणि आज तो स्वतःच झोपला होता खोलीत. मग मी, आदित्य आणि माझी आई - असे तिघेजण गेलो. इतरही बरेचजण होते. थाई मसाज केंद्र आमच्या हॉटेलला लागूनच होतं. ७ ते ९ आम्ही तिथे होतो. थाई मसाज म्हणजे एका विशिष्ट शास्त्रोक्त पद्धतीने हात-पाय-डोकं चेपणे. 'मसाज' या शब्दाने अनेकांचा गैरसमज होतो, माझा पण झाला होता. पण त्याने खरंच शरीर आणि मन हलकं झालं. इथे वापीत रोज असे कुणी हातपाय चेपून दिले तर किती बरं होईल असं वाटलं.

९ वाजता परत हॉटेलवर आलो. आई-बाबा जेवतच होते. अजय दिसला नाही कुठे. तो जेवायलाही खाली यायला तयार नव्हता. आता मात्र हद्द झाली. मी जेवले, वर गेले आणि अक्षरशः त्याला झापलं. जरा चिडूनच, जबरदस्तीने खाली घेऊन आले. थोडा हलकं जेवण आणि नंतर औषध घ्यायला लावलं. अजयची आता मला जरा काळजीच वाटायला लागली होती. विमान प्रवास, बस प्रवास आता १५ दिवस असणारच होता अधूनमधून. मग त्याचं हे असंच सुरू राहणार की काय ... काही कळेना. थोडा हलका आहार आणि योग्य औषधं - हाच एक उपाय होता त्यावर.
त्यादिवशी त्याने घेतलेल्या औषधांचा परिणाम दुसऱ्या दिवशी दिसणार होता. आमचं पट्टाया वास्तव्य संपलं होतं. दुसऱ्या दिवशी बॅंकॉकला जायचं होतं. बॅंकॉकला अजयचा कुठला चेहेरा दिसणार होता???

२३ ऑक्टोबर - तिसरा दिवसरजनीकांत, रावण आणि अल्काझार शो.


जाग न यायला काय झालं होतं ... मला पावणेतीनलाच जाग आली. उठून आवरून खाली आलो. अवेळी उठल्यामुळे २-३ मंडळींचे विधी उरकायला जरा वेळ लागला आणि निघायला थोडा उशीर झाला. पण कदाचित ते सगळं गृहित धरूनच तीन वाजताची वेळ सांगण्यात आली होती. सातच्या विमानासाठी तीन वाजता उठावं लागत होतं ... काही मूठभर नतद्रष्ट लोकांमुळे जगभर विमानप्रवास करणाऱ्या लाखो लोकांना झोप घ्यायला वेळ मिळत नव्हता ...

बस निघाली ... अजयचा त्रास मागील पानावरून पुढे चालू होता. मला आता मळमळत नव्हतं पण बाहेर अंधार होता. त्यामुळे वाऱ्यावर डोलणारी श्रीलंकेची शेतं पहायची राहिली ती राहिलीच !!!
'कोलंबोत एक दिवस-एक रात्र' हा नुसता भोज्ज्याला शिवण्यासारखा प्रकार झाला होता. यायचं-जायचं 'श्रीलंकन'चं बुकिंग केल्यामुळे ते पॅकेज फुकट मिळालं होतं आणि 'फुकट' या शब्दाला भुलला नाही तर तो माणूस कसला !!! खरं तर 'श्रीलंकन'चं तसंच पॅकेज घ्यावं लागतं असं नंतर कळलं. तरी, त्यातल्या त्यात, 'एअर इंडिया' पेक्षा 'श्रीलंकन' खूपच चांगलं आहे असं अजय म्हणाल्यामुळे जरा बरं वाटलं !!! घरातून निघाल्यापासून आत्तापर्यंतचा दिनक्रम पाहिल्यावर मनाला एक शंका चाटून गेली की आजी-आजोबांना घेऊन येण्यात आपण चूक तर नाही केली ? आपल्यालाच जागरणाचा इतका त्रास होतोय तर त्यांचं काय होत असेल ?? पण सुदैवाने पट्टायानंतर तसं काही झालं नाही, अजय पण पुन्हा माणसांत आला, पण ते सगळं पुढे ...

तर, २४ तासांच्या आत पुन्हा आम्ही विमानतळावर होतो. पण आज नवीनच उत्सुकता होती - दिवसाच्या विमानप्रवासाची !!! पुन्हा एकदा डिपार्चर कार्ड, बोर्डिंग पास, इमिग्रेशन, सिक्युरिटी, सामानाची तपासणी आणि या प्रत्येक ठिकाणी रांगा - सगळं पार पडलं. रोजचे आपले कसे प्रातर्विधी असतात, तसे हे प्रत्यक्ष विमान प्रवासापूर्वीचे प्रातर्विधी आहेत. ते सगळं केल्याशिवाय मजा नाही. तरी बरं, तिथे बोर्डिंगचे चारच दरवाजे होते - पुढे बॅंकॉक, सिंगापूरला तर ते गेट गाठण्याच्या नादात, जशी वेळ असेल त्याप्रमाणे, प्रभातफेरी/सायंफेरी व्हायची सगळ्यांची.

इथे एक विनोद म्हणजे बोर्डिंग पास मिळाल्यानंतरचं जे वेटिंग लाऊंज होतं तिथे टॉयलेट्सच नव्हती. कुणाला जायचं असेल तर दारातल्या कारकुनाकडे आपला बोर्डिंग पास द्यायचा, तिथून बाहेर पडायचं, शंकासमाधान झालं की पुन्हा आपला बोर्डिंग पास घेऊन आत यायचं. त्या दिवशी एक तर सकाळची वेळ, त्यात आम्ही भर मध्यरात्री हॉटेलवरून निघालेलो, त्यात बरीच आजी-आजोबा मंडळी ... त्यामुळे तो तिथला कारकून सारखा बोर्डिंग पासेस घेत होता, परत देत होता !!!
हळूहळू भूक लागायला लागली होती. नाश्त्याचं पॅक मिळणार होतं पण 'ते इथे की विमानात' ते माहीत नव्हतं. सर्वांच्या सुरूवातीच्या आतबाहेर वाऱ्या झाल्यावर नाश्ता मिळाला - प्रत्येकासाठी एक-एक मोठा केकचा तुकडा ... 'सकाळी सहा वाजता भुकेपोटी केक खायचा?' - ये बात हजम नहीं हो रही थी !! पण खाण्यावाचून पर्याय नव्हता. अजयने तिथेही काही खाल्लं नाही. गेल्या चोवीस तासात थोड्या फळांव्यतिरिक्त त्याने काहीही खाल्लेलं नव्हतं.

Flight No. UL 422 - Now Boarding असं दिसल्यावर आदित्य टुण्णकन उडी मारून उठला. त्याला कारणही तसंच होतं - 'आजच्या विमानात व्हिडिओ गेम्स खेळता येतील' असं त्याला शिंदे काकूंनी सांगितलं होतं !!! बोर्डिंग गेट पासून विमानापाशी जायला बस होती. त्या बसमधून सगळे 'इश्ट्यांडिंग प्याशिंजर' पाच मिनिटांत विमानापाशी पोचले. फक्त श्रीलंकेतच विमानात शिरण्यासाठी जिना चढावा लागला. इतर ठिकाणी बोगदे होते. पायथ्यापाशी उभं राहून पाहिल्यावर विमानाचा नाकाकडचा भाग छान दिसत होता. मुख्य म्हणजे आपण विमानाच्या असं इतके जवळ कधी येत नाही. त्यामुळे फ़ोटो काढायची इच्छा होती पण 'परवानागी असेल की नाही' अशी शंका आली. कॅमेरा गळ्यात नव्हता आणि 'फ़ोटो काढला तरी चालतो' हे कळून बॅगमधून तो बाहेर काढेपर्यंत जिन्याच्या २-३ पायऱ्या चढून झाल्या होत्या. परत मागे फिरणं मला प्रशस्त वाटलं नाही. अजून तेवढी निर्ढावले नव्हते ना मी ... पण तेव्हा तिथे फ़ोटो काढता आला नाही याची मला अजून चुटपूट लागून राहिली आहे ...
हे विमान आदल्या दिवशीपेक्षा मोठं आणि प्रशस्त होतं. २+४+२ सीट्स होत्या. ठराविक अंतरावर टी.व्ही. स्क्रीन्स होते आणि प्रत्येक सीटच्या पुढ्यात छोटा स्क्रीन आणि रिमोट होता. आदित्यचे हात आता नुसते शिवशिवत होते पण 'टेक ऑफ़' होईपर्यंत थांबायचं होतं.

पहिल्या प्रवासात त्रास न झाल्यामुळे मी या वेळी जरा खिडकीतून बाहेर वगैरे पहायचं ठरवलं होतं. खिडकीतून समोरच विमानाचा पंख दिसत होता. आधी थोडं 'पिचिक' झालं - की खालचं विहंगम दृश्य पाहता येणार नाही म्हणून; पण नंतर लक्षात आलं की टेक ऑफ़ आणि लॅंडींगच्या वेळी पंखांपाशी पण काही यांत्रिक हालचाली सुरू असतात. दरम्यान कधी, कसल्या हालचाली होतात ते बाबांनी मला सांगितलं होतं. ही सीट मिळाली नसती तर ते सगळं पाहता आलं नसतं. त्यामुळे ते 'पिचिक' कुठल्याकुठे विरून गेलं. टेक ऑफ़चा खऱ्या अर्थाने अनुभव घेण्यासाठी मी तयार होते ...
आता त्या 'कै-च्या-कै' वेगाचं काही वाटत नव्हतं. अगदी ठरवून टेक ऑफ़च्या क्षणी खिडकीबाहेर बघितलं ... जे दिसलं ते थक्क करणारं होतं!! खाली दिसणारं दृश्य डोळ्यांत साठवावं की ज्या सुपिक डोक्यातून ही विमान नावाची वस्तू अवतरली होती त्या मानवाच्या मेंदूला सलाम ठोकावा हे कळेना. जमिनीवरच्या सगळ्या गोष्टी हळूहळू छोट्याछोट्या होत गेल्या. काही मिनिटांतच आम्ही वर आणि ढग खाली होते. मध्येच वैमानिकाने 'आता श्रीलंकेतला सर्वात उंच पर्वत दिसेल' असं सांगितलं. त्याचं नाव नाही कळलं पण खिडकीतून दिसला मात्र मस्त!!
इकडे मोठ्या टी.व्ही.स्क्रीन्सवर जगाचा भौगोलिक नकाशा आणि त्यात विमानाची दिशा आणि आगेकूच दिसत होती; थोड्या वेळाने विमानाची उंची, वेग (जो प्रचंड होता), वाऱ्याचा वेग, बाहेरचं तापमान (जे अतिशय कमी होतं) इ. माहिती दिसत होती. त्यानंतर पुढे विमानाच्या नाकाजवळ लावलेल्या कॅमेऱ्याने दिसणारं दृश्य दिसत होतं. त्या सगळ्या गोष्टी पहायला-वाचायला भलतीच मजा येत होती.
आधीच ते विमानाचं धूड आणि केवढा तो त्याचा एक-एक पंख; त्यात इतका वेग आणि बाहेर इतकं कमी तापमान; अश्या परिस्थितीत आपला रजनीकांत त्या पंखावर उभा राहून मारामारी करतो, अमिताभ, धर्मेन्द्र खाली लटकत खलनायकाचा पाठलाग करतात आणि हे सगळं आपण अक्कल गहाण ठेवून बघत असतो! रजनीकांतची मारामारी आठवून त्याक्षणी मला जाम हसू आलं!!!
तेवढ्यात खाणं-पिणं यायला सुरूवात झाली पण त्या क्षणी सगळेच त्याची वाट पाहत होते. पुन्हा एकदा अजयने काहीही खाल्लं नाही. 'आता काय करावं या माणसाला' ते मला कळेना.
पोट भरलं, पुन्हा नकाशे, बाहेरचं दृश्य ... वेळ मस्त चालला होता. आता विमानप्रवास म्हटलं की मला माझा हा प्रवास आठवेल नेहमी.
दरम्यान तिकडे आदित्य व्हिडिओ गेम्सच्या वेगळ्याच विश्वात हरवला होता.
आता हळूहळू खिडकीतून घरं, शेतं, रस्ते दिसायला सुरुवात झाली होती. वैमानिकाने लॅंडिंगची सूचना दिली. वरूनच विमानतळाची भव्यता लक्षात येत होती. १०-१५ मिनिटात विमान उतरले. पुन्हा एकदा 'आयुबोवान' वगैरे ऐकत आम्ही बाहेर पडलो.

बॅंकॉकचा सुवर्णभूमी एअरपोर्ट, एक-दीड महिन्यापूर्वीच खुला झालेला - केवढा भव्य, प्रचंड ... आंतरराष्ट्रीय विमानतळ असे असतात!!! आपला मुंबईचा विमानतळ आठवला - आंतरराष्ट्रीय विमानतळ तसे असतात??? दोन्ही विमानतळांची तुलनाच शक्य नाही. प्रथम दर्शनाने मी तर जाम भारावून गेले. समोरच मोठाच्यामोठा 'डीमन गॉड'चा पुतळा होता ... म्हणजे आपला रावण!!! त्या परिसरात असे ८-१० पुतळे उभे आहेत. मी एक-एक गोष्ट निरखत होते. तेवढ्यात माणसांची ने-आण करणारे सरकते पट्टे आदित्यला दिसले. एकापुढे एक असे ३-४ होते बहुतेक; तो लगेच त्या पट्ट्यांवरून दोन फेऱ्या मारून आला. आधी एकटाच गेला, दुसऱ्या फेरीला दोन्ही आज्ज्यांनाही बरोबर घेऊन गेला.
इमिग्रेशनपाशी पोचलो. बाप रे ... आधीच्या लाऊंजला भव्य म्हणायचे, तर याला काय म्हणायचे असा प्रश्न पडला. तिथून पुढे आलो तर ... तिथला लाऊंज आधीहून भव्य!! तिथून विमानतळाचे इतर मजलेपण दिसत होते. आमच्या डोक्यावर २-३ मजले सोडून मग वरच्या मजल्यांवरून गाड्यांची वाहतूक सुरू होती - पहावं ते नवलच!!! आमची बस यायला अवकाश होता. आता मात्र अजयला दोन दिवसांत प्रथमच काहीतरी खावंसं वाटलं. पहाटे कोलंबोला मिळालेला केक त्याने तिथे बसून खाल्ला. दरम्यान मी डॉलर्स देऊन थाई बाथ घेतले. बाथ आणि आपल्या रुपयाची किंमत साधारण सारखी आहे. त्या अनोळखी चलनाच्या नोटा निरखण्यात थोडा वेळ गेला. 'बस आली' असा निरोप मिळाला आणि आमची बसच्या दिशेने 'मध्यान्ह फेरी' सुरु झाली. वाटेत खालच्या मजल्यांवर नेणारे सरकते पट्टे लागले. आदित्य लगेच खूष!!
बाहेर पडलो .... मागे वळून पाहिले - विमानतळाचा पसारा नजरेत मावत नव्हता. एक बस आणि एक छोटी व्हॅन - अशी व्यवस्था होती. बस सुरू झाल्यावर सौ. शिंदेनी आमच्या गाईडची ओळख करून दिली - अनंता रुकसानसुक ऊर्फ ऍना. आता पुढचे पाच दिवस पट्टाया-बॅंकॉक सहलीत ती आमच्या सोबत राहणार होती.

'सव्वा दीखा, सव्वा दीख्रब' ... तिनं थाई भाषेत आमचं स्वागत केलं. पाठोपाठ 'नमस्ते' म्हणायला पण विसरली नाही. थाई भाषेत एखाद्या बाईला 'हॅलो' म्हणायचं असेल तर 'सव्वा दीखा' म्हणतात आणि एखाद्या पुरुषाला 'हॅलो' म्हणायचं असेल तर 'सव्वा दीख्रब' म्हणतात.
या ऍनाने पुढच्या पाच दिवसात आम्हाला आपलंसं करून टाकलं. गेली दहा वर्षे ती शिंदेना थायलंडमध्ये मदत करतीये. काही हिंदी, काही मराठी शब्द तिने आत्मसात केले होते. अर्थात, तो तिच्या कामाचाच एक भाग असणार म्हणा. आपल्या कामात ती एकदम चोख होती पण व्यावसायिक कमी, घरगुती जास्त होती. कुठल्याही ठिकाणी चुकामूक हो‍ऊ नये आणि तिला शोधणे आम्हाला सोपे जावे म्हणून तिने जवळ एक निळ्या रंगाची छत्री ठेवली होती. त्याला ती 'नीदी छत्ली' म्हणायची. एखाद्या ठिकाणाहून निघायची वेळ झाली की 'तला, तला' असं ओरडून आम्हाला बोलवायची ... म्हणजे 'चला, चला'!!! एकदोन दिवसांतच आम्ही सगळे तिच्यासारखे बोलायला लागलो होतो.
आम्हाला प्रथम जायचे होते पट्टायाला. 'पाटीया' हा त्याचा खरा उच्चार आम्हाला ऍनामुळेच कळला.
बॅंकॉकहून बसने पट्टायाला जायला अडीच-तीन तास लागतात. बाहेर कडक ऊन होतं. बसपण खूप तापली होती. ऍनाने सांगितले की थायलंडमध्ये उन्हाळा हा एकच ऋतु!!! बाप रे ... कल्पनाच करवली नाही. मग त्यापेक्षा आपली वापीची थंडीही परवडली!!

बॅंकॉकमधले रस्ते, उड्डाणपूल, रस्त्यांवरची स्वच्छता सगळंच पाहण्यासारखं होतं. शहरातून बाहेर पडल्यावर हमरस्त्यावर एका ठिकाणी चहापाण्यासाठी आम्ही थांबलो. 'सेवन-इलेवन' नावाच्या दुकानातून मी पाणी, केळ्याचे गोड चिप्स, बिस्किट्स असं काही-बाही विकत घेतलं. मध, साखर असलेले ते चिप्स पाहून समस्त छत्रे पुरूष खूष झाले. 'सेवन-इलेवन' हे तिथले 'चितळे बंधू मिठाईवाले' असावेत. त्या भागात 'सेवन-इलेवन'च्या दुकानांची साखळी आहे. तशीच दुकाने आम्हाला सिंगापूर, मलेशिया मध्ये पण दिसली.
थाई पोरींची वेशभूषा पूर्णपणे पाश्चात्य शिवाय अंगावरच्या कपड्यांची संख्या आपल्या देशापेक्षा कमी ... त्यामुळे काऊंटरवर पैसे देताना साहजिकच माझं लक्ष त्यांनी वेधून घेतलं!!! त्यात नोटा-नाणी परिचयाची नव्हती. मी त्या काऊंटरवरच्या माणसापुढे जवळचे काही बाथ मांडून ठेवले. त्याच्या लक्षात आलं. त्याने इमानदारीत जेवढं बिल झालं होतं तेवढी नाणी त्यातून उचलून घेतली आणि 'थॅन्क यू, मादाऽऽऽम' म्हणाला. थाई माणसं वाक्यातला शेवटचा शब्द लांब ओढतात; निदान इंग्रजी बोलताना तरी. थाई भाषेत काय करतात ते कळणं अशक्यच होतं. दक्षिण भारतीय भाषेचं आपण 'यंडु-गुंडु' असं वर्णन करतो, थाई भाषेला काय म्हणायचं काही कळलं नाही.
तिथून निघालो. वाटेत 'मिनी सयाम' पहायला थांबलो - ('मीऽऽनीऽऽ सायाम' - ऍनाच्या भाषेत). प्रवेशद्वारापाशी पुन्हा दोन 'डीमन गॉड'चे मोठेच्यामोठे पुतळे दिसले. थायलंडचं जुनं नाव सयाम होतं - त्यामुळे 'मिनी सयाम' म्हणजे पुरातन थायलंडमधल्या काही गोष्टी छोट्या स्वरूपात पहायला मिळतील असं वाटलं होतं. पण तिथे जगभरातल्या महत्वाच्या वास्तुरचना छोट्या स्वरूपात उभ्या केलेल्या होत्या - अगदी हुबेहूब आणि अप्रतिम. आयफ़ेल टॉवर, पिसाचा झुकता मनोरा ते सिडनी ऑपेरा हाऊस पर्यन्त सगळ्या. तिथे आम्हाला साधारण तासभर थांबायचं होतं पण तेवढा वेळही कमी पडला.

तिथून पुढे तासाभराच्या अंतरावर पट्टाया. 'एक जगप्रसिध्द पर्यटनस्थळ' हे बीरुद सोडलं तर पट्टाया हे तसं अगदी छोटंसं शहर आहे. समुद्रकिनाऱ्याच्या कडेकडेने थोडा वेळ रस्ता होता. लांबून समुद्रकिनारा खूपच सुंदर दिसत होता ... शिवाय रस्ता आणि लगेच समुद्राचं पाणी होतं. मधला वाळू हा प्रकार अगदीच नगण्य होता. तिथून आमचं The Golden Beach Hotel ५-१० मि.च्या अंतरावरच होतं.
तिसऱ्या मजल्यावर आमच्या खोल्या होत्या. १५-२० लोकांना घेऊन जाणारी, दरवाजे आपोआप बंद होणारी मोठी लिफ़्ट पाहून आदित्यचे डोळे पुन्हा चमकले. मुलांना किती छोट्याछोट्या गोष्टींत उत्सुकता असते!! पण त्याहीपूर्वी, प्रवेशद्वाराचे मोठे काचेचे दरवाजे जे त्यांच्या समोर उभं राहिल्यावर आपोआप उघडणारे होते- ते पाहून पण तो खूष झाला होता. पुढच्या दोन दिवसांत खाली आलं की त्याचा एकच खेळ होता - थोडं पुढेमागे करून ते दरवाजे उघड-बंद करायचे पण पूर्ण उघडू द्यायचे नाहीत किंवा पूर्ण बंदही हो‍ऊ द्यायचे नाहीत.
हॉटेलच्या खोल्या कोलंबोपेक्षाही प्रशस्त आणि मोठ्या होत्या. बाल्कनीतून समुद्र मात्र दिसत नव्हता. चहा-कॉफ़ी पिऊन लगेच आम्हाला 'अल्काझार शो' पाहण्यासाठी बाहेर पडायचं होतं.

संध्याकाळी सहा वाजता पुन्हा आमची बस निघाली. अतिशय अरुंद अश्या ४-६ गल्लीबोळातून वळणं घेत आम्ही त्या शोच्या प्रेक्षागृहापाशी पोचलो. आमचा बसचालक भलताच कुशल होता. अरुंद रस्ते, पदपथावरचे विक्रेते - या सगळ्यांतून एक बस जेमतेम जाईल इतकीच जागा होती. पण तो फारच सफाईने चालवत होता.

'अल्काझार शो'विषयी मी पूर्वी कधीतरी एकदा पेपरमध्ये वाचलेलं होतं. त्यामुळे मला त्याबद्दल थोडी कल्पना होती. मुळात तो संगीत आणि प्रकाशयोजनेच्या सहाय्याने सादर होणारा एक अतिशय देखणा नृत्याविष्कार आहे. थायलंडमध्ये तृतीयपंथीयांची समस्या खूप जटील आहे. म्हणून सरकारने त्यांना या शोच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ७०-८० कलाकार तास-दीड तास दिव्यांच्या झगमगाटात, लेसर किरणांच्या चकचकाटात गायन आणि नृत्याचे कार्यक्रम सादर करतात. १-२ अपवाद सोडले तर कुठेही हिडीस, अचकटविचकट हावभाव नव्हते किंवा अश्लीलता नव्हती. त्या अपवादांकडेसुध्दा माझं लक्ष गेलं ते तीन म्हातारी माणसं आणि एक शाळकरी मुलगा बरोबर होता म्हणून. नाहीतर त्यापेक्षा कितीतरी हिडीस नृत्यं आपल्या हिंदी चित्रपटात असतात. एकूणएक कलाकार तृतीयपंथी आहेत यावर विश्वास बसणार नाही इतकी सफाई होती त्यांच्या हालचालींत. नंतर त्यांच्या नृत्यांपेक्षा रंगमंचावरचा तो लखलखाट जास्त लक्षात राहिला. ८.३० ला शो सुटला. बाहेर प्रचंड गर्दी आणि गर्दीत ९९% भारतीय लोक!! ऍना आणि तिची 'नीदी छत्ली' नसती तर आमची चुकामूक अगदी हमखास झाली असती.
पुन्हा हॉटेलवर आलो, जेवलो.

थायलंडमधला पहिला दिवस खूप धावपळीचा पण अविस्मरणीय गेला होता. दुसऱ्या दिवशी आम्हाला समुद्रावर जायचं होतं.
२३ ऑक्टोबर संपत आला होता. २० तारखेनंतर आज आम्ही रात्रीची पूर्ण झोप घेणार होतो ज्याची आम्हाला सगळ्यांनाच अतिशय गरज होती ...

पहिला दिवस - पुढे चालू ...आयुबोवान !!


विमान सुटलं तेव्हा ३ वाजून गेले होते म्हणजे दुसरा दिवस केव्हाच सुरू झाला होता. पण ते मेंदूला कसं कळणार झोप काढल्याशिवाय !!!

वैमानिकाने सूचना दिली आणि एकदम विमानाने वेग घेतला ... आजपर्यंत जास्तीतजास्त ताशी १२० कि.मी. वेगाची सवय ... हा वेग म्हणजे त्याहून 'कै-च्या-कै' होता. थोडा वेळ डोळे मिटून दीर्घ श्वसन करत बसले. साध्या अर्ध्या-एक तासाच्या बस प्रवासातही मला मळमळतं ... त्यामुळे मी मनाची तयारी करुन गेले होते. खिश्यात अव्हॉमिन होती. विमानात टेक-ऑफ़ आणि लॅंडिंगच्या वेळेसच त्रास होतो असं अजयनेच सांगितलं होतं. आश्चर्य म्हणजे मला काहीही त्रास झाला नाही. फक्त टेक-ऑफ़ केल्यावर डोकं एकदम जड झालं आणि दुखायला लागलं. पण त्यात जागरणाचा पण सहभाग होता असं आता मला वाटतंय. आदित्य खिडकीतून खाली पाहत 'आई हे बघ, ते बघ' करत होता. पण मी ते टाळलं. म्हटलं उगीच अजून त्रास नको व्हायला. आजी-आजोबांना काही त्रास झाला नाही. अजयला होणार हे अपेक्षितच होतं. आईला पण झाला थोडा. खूप पोट दुखून उलटी होईल की काय असं तिला वाटलं थोडा वेळ - पण तेवढंच.

श्रीलंकेच्या स्थानिक वेळेनुसार आम्ही पहाटे ५ वाजता पोचणार होतो. म्हणजे साधारण अडीच तासांचा प्रवास होता. 'आता जरा झोप काढूया' असा विचार करेपर्यंत खाणं-पिणं यायला सुरूवात झाली. पहाटे पावणेचारला कॉलिफ़्लॉवर मांचुरिअन खाईल का कुणी ??? बऱ्याच जणांनी खाल्लं; ऍपल ज्यूस प्यावंसं वाटेल का कुणाला? आदित्यला वाटलं !!! अर्थात, विमानप्रवासात काळवेळेचा विचार करायचा नसतो हे आम्ही पुढच्या १५ दिवसांत शिकलो आणि जे जेव्हा समोर ये‍ईल, ते तेव्हा निमूटपणे खायलाही शिकलो ... घड्याळाकडे न बघता !!!

जेमतेम डुलकी लागत होती तोपर्यन्त लॅंडिंगची सूचना ऐकू आली. पाण्यात भिजलेली कार्टून्स कशी मान हलवून पाणी झटकतात, अक्षरशः तशी मान झटकावी लागली डोळे उघडण्यासाठी ... आपण आपल्या देशाची हद्द ओलांडून आलोय याची जाणीव झाली, उत्सुकतेने पुन्हा उचल खाल्ली आणि २४ तासाच्या जागरणाला मागे ढकलले. श्रीलंकन क्षितीजावर फटफटत होतं, आमचं विमान उतरत होतं.

आपापलं सामान घेऊन निघालो. दारात हवाई सुंदरी होतीच 'आयुबोवान' करायला ... हा सिंहली भाषेतला 'राम-राम' !! (आणि हो, सिंहली भाषेत 'धन्यवाद'ला 'स्तुती' म्हणतात - ही माहितीत पडलेली अजून एक भर !) दरम्यान, कॉकपिटमध्ये दोन्ही वैमानिक गप्पा मारत बसलेले आदित्यने पाहून घेतले.


२२ ऑक्टो. - दुसरा दिवस.

बंदारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ - श्रीलंकेचा एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ. नकळत तुलना झाली. हा जास्त उजवा वाटला. पर्यटनाच्या दृष्टीने केलेले प्रयत्न लक्षात आले लगेच. श्रीलंकेच्या चार महत्त्वाच्या उद्योगधंद्यांपैकी पर्यटन हा एक आहे.
Arrival Forms भरले. Visa on Arrival च्या रांगेत उभे राहिलो. पुन्हा एकदा, अतिशय आत्मविश्वासाने वावरणारा एक ११ वर्षांचा मुलगा माझ्या पुढे रांगेत उभा होता !!! त्याच्या नावाची हॅन्डबॅग एका हातात, दुसऱ्या हातात पासपोर्ट आणि फ़ॉर्म ... कुठल्याही प्रश्नोत्तरांना तोंड द्यायच्या तयारीत ... जणू या गोष्टी तो लहान असल्यापासून करत आलाय !!!
व्हिसा, सिक्युरिटी - सगळं पार पडलं. तिथून पुढे आलो. २४ तासांच्या आत पुन्हा इथेच यायचंय याची तेव्हा जाणीव झालेली नव्हती !!! आता डोळे आणि डोकं दोन्ही झोप, झापड, पेंग या सगळ्याच्या पलिकडे पोचले होते. सर्वांनी आपापली घड्याळं तिथल्या वेळेनुसार लावली. 'विमानात बसणे' या पाठोपाठ आदित्य या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता !!! त्याला त्याच्या घड्याळातली वेळ पुढे-मागे करण्यातली मजा अनुभवायची होती.

परकीय चलन - मला आणि आदित्यला जाम उत्सुकता असलेली अजून एक गोष्ट !!! 'आत्ता किती अमेरिकन डॉलर्स बदलून घ्यायचे' यावर एक चर्चासत्र झालं. १ श्रीलंकन रुपया म्हणजे आपले ५० पैसे. त्यामुळे चलन बदलल्यावर एकदम 'मालदार पार्टी' असल्यासारखं वाटायला लागलं. २०-२५ मि. नंतर आमची बस आली. कोलम्बोजवळच निगम्बो म्हणून एक गाव आहे तिथे आमचं हॉटेल होतं. १५-२० कि.मी. अंतर असावं. 'असावं' अश्यासाठी लिहीलं की बस हलताक्षणी मला मळमळायला लागलं होतं ... खिडकीतून बाहेर 'गम्मत' वगैरे बघण्याचं त्राण नव्हतं. वाऱ्यावर डोलणारी श्रीलंकेची शेतं पाहण्याची संधी हुकली आणि पुन्हा तसंच ... जरा डुलकी लागेपर्यंत हॉटेल आलं. २२ ऑक्टोबरच्या आमच्या दिवसभराच्या कहाणीचं हेच शीर्षक होतं - 'जरा डुलकी लागेपर्यंत ...'


साडेसहाच्या सुमाराला हॉटेल वर पोचलो. सामान आणि खोल्यांच्या किल्ल्या मिळेपर्यंत अजून थोडा वेळ गेला. १० वाजता पुन्हा खाली जमायचं होतं. १५ दिवस भटकायला म्हणून बाहेर पडलेले आम्ही पण त्या क्षणी 'नको आज कुठे जायला' असं वाटत होतं. खोल्या मस्त होत्या, शिवाय प्रशस्त बाल्कनी आणि समोर समुद्र - क्या बात है !!! अगदी समुद्रकाठावरच हॉटेल उभं होतं. फक्त आत्ता त्या सगळ्याचं रसग्रहण करण्याचा कुणालाही उत्साह नव्हता.
अजयची तर पुरती वाट लागली होती. (ती त्याची तशी अवस्था अजून २-३ दिवस राहणार होती.) त्याने जे गादीवर अंग झोकून दिलं, थोड्याच वेळात तो घोरायला लागला. बसमध्ये एक झोप काढून आदित्य पुन्हा टुणटुणीत झाला होता. आमच्या तीनही खोल्यांमध्ये तो मोकाट वावरत होता. मी पण झोपायचा एक अयशस्वी प्रयत्न केला ...

९ च्या सुमाराला उठून आंघोळ केली, जरा ताजंतवानं वाटलं. खाली जाऊन नाश्ता केला. मी उठवलं नसतं तर अजय तसाच दिवसभर झोपून राहिला असता !!!! पण मी त्याला चलण्याचा आग्रह केला. १०.३० वाजता कोलंबो शहराच्या भटकंतीला निघालो. बसमध्ये पण तो पूर्णवेळ मान खाली घालून, डोळे मिटूनच बसला होता.
बस छान होती - ए/सीत गार वाटत होतं. १५ दिवस उकाडा, घाम, धूळमाती - सगळं विसरायला झालं होतं. आमचा त्यादिवशीचा गाईड - मि. देवा - मोडक्यातोडक्या इंग्रजीमध्ये पण छान, व्यवस्थित माहिती देत होता. मुख्य म्हणजे फालतू चर्पटपंजरी नव्हती. मी त्याला श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजाबद्दल विचारले. सिंहली, तामिळ, ख्रिश्चन आणि बौध्द हे चार प्रमुख वंश आहेत तिथे. त्यांचे प्रतिनिधित्व करणारे चार रंग झेंड्यावर आहेत. लोकांनी साहजिकच 'रावण' हा विषय काढला. रावण हा तिथे फारसा लोकप्रिय नाही. अशोकवनाची जागा पहायची अनेकांची इच्छा होती. पण रावणाची आठवण म्हणून तिथे कुठलंही स्मारक नव्हतं - निदान कोलम्बोत तरी नव्ह्तं. (तिथे 'कोलम्बो'चा उच्चार 'क्लांबो' असा करतात.) रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांचे क्रमांक ३-४ वेगवेगळ्या रंगांत रंगवलेले दिसले. म्हणून मी त्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ विचारला. तर एक आश्चर्यकारक माहिती मिळाली. २-३ वर्षांपूर्वीपर्यंत तिथे वाहनांच्या क्रमांकांबद्दल कुठलाही नियम नव्हता. ज्याला ज्या रंगाची जशी पाटी हवी तशी तो लावू शकत होता. पण आता नाही. आता त्याचे नियम ठरवले गेले आहेत.
वाटेत २-३ ठिकाणं दाखवली गेली पण बसमधूनच. दुपारी 'स्वातंत्र्य स्मारका'पाशी जेवायला थांबलो. अजय बसमधून खाली उतरून जेवायलाही तयार नव्हता. पण नंतर आला. तिथे आम्ही पाण्याच्या तीन बाटल्या विकत घेतल्या. ३३ श्रीलंकन रुपयांना ३ बाटल्या. परदेशी चलनाने केलेली पहिली खरेदी !!! लगेच मनातल्यामनात हिशोब केला - म्हणजे आपले साडेसोळा रुपये ... फक्त !!! सुटे पैसे परत घेताना कळलं की '१०' ला सिंहली भाषेत 'दहाय' म्हणतात. मी त्या माणसाला लगेच सांगितलं की आमच्या मातृभाषेत पण याला आम्ही 'दहा' म्हणतो. त्याला कितपत कळलं कोण जाणे पण मला सांगताना खूप मजा आली !!!
जेवणानंतर पुन्हा बस निघाली. 'द हाउस ऑफ़ फ़ॅशन'मध्ये खरेदीचा कार्यक्रम होता. आधीच खरेदी माझी आवडीची गोष्ट, त्यात कपड्यांची खरेदी त्याहून आवडीची. तास-दीड तास कसा गेला कळलं नाही. तिथून निघालो, पुन्हा वाटेत बसमधूनच २-३ ठिकाणं पाहिली आणि संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला हॉटेलवर परत आलो. वाटेत जोरदार पाऊस लागला. हॉटेलवर पोचलो तेव्हा पण पाऊस सुरूच होता. माझा आणि आदित्यचा पोहोण्याचा बेत ओम-फस्स झाला. शिवाय मला समुद्राचे फ़ोटो काढायचे होते ते पण जमलं नाही.
चहा-कॉफ़ी पिऊन सगळेजण आडवे झाले. कधी झोप लागली कळलंही नाही. ७.३० नंतर रात्रीचं जेवण सुरू होणार होतं. ८-८.३० ला जाग आल्यावर उठून जेवून आलो.
जेवण झाल्यावर सौ. शिंदेनी सांगितलं की पहाटे ३ वाजता फ़ोनवरून गजर होईल. गजर झाल्याझाल्या सर्वांनी कार्गो सामान खोलीच्या बाहेर आणून ठेवायचं - म्हणजे सगळं सामान आवरूनच झोपायचं होतं. मनात म्हटलं की 'अरे बाप रे! कसं काय जमायचं !!!' खोलीवर परत आल्यावर अपुऱ्या झोपेपायी सामान आवरायचं उलगडेना. त्यात अजय साफ आडवा होता. त्याच्या मदतीची शक्यता नव्हती. कसंतरी करून १० वाजता झोपलो.

जाग ये‍ईल की नाही याची चिंता होती, त्यात त्या फ़ोनचा आवाज इतका मंजूळ होता की त्याने निदान मला तरी जाग येणं कठीणच होतं.

सहलीचा पहिला दिवस अतिशय धावपळीचा गेला होता. दुसऱ्या दिवशी उठून बॅंकॉकला जायचं होतं. पहाटे ३ वाजता उठायचं होतं ...

अपुरी झोप पूर्ण करायला आम्हाला अजून २४ तास वेळ मिळणार नव्हता ...

२१ ऑक्टोबर - पहिला दिवसआईच्या बॅगेत नेलकटर ...


२१ ऑक्टोबरला निघालो. संध्याकाळी वापी रेल्वे स्टेशनहून शताब्दीत बसलो.. बोरिवलीहून मुंबई विमानतळावर पोचलो. लांबूनच आजी-आजोबा आणि नीला आजी दिसल्यावर आदित्य तर पळतच सुटला. आता १५ दिवस त्याच्या डोक्याशी आईची कटकट होणार नव्हती ना...!!!

आपल्या देशातला सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळ ... मी आणि आदित्य तर डोळे फाडफाडून सगळ्या गोष्टी पाहत होतो. सगळं खूप भव्य-दिव्य वाटत होतं ... (हा आमचा समज लवकरच खोटा ठरणार होता ... ) आपण नवीन काहीतरी करायला निघालोय याची उत्सुकता होती !!!! रात्री ११ वाजता चेक-इन होतं...त्यावेळी पोचवणारी योग्य गाडी नसल्याने आम्ही ९.३० लाच पोचलो होतो तिथे (विमानतळ झाडायला !!!) मुंबई बाहेरून येणारे सगळेच लवकर पोचले होते. त्यांच्याशी ओळखी करून घेण्यात, प्राथमिक गप्पा मारण्यात वेळ मस्त गेला. खरं म्हणजे, इथून पुढे १५ दिवस वेळ मस्त जाणार आहे हे आत कुठेतरी माहीत होतं !! कल्याण-डोंबिवलीच्या सहप्रवाश्यांना घेऊन येणारी बस थोडी उशिरा म्हणजे ११.३० ला आली. तोपर्यंत इकडे आदित्यचा जीव वर-खाली व्हायला सुरुवात झाली होती. '११ वाजता चेक-इन' हे त्याच्या डोक्यात होतं - पण म्हणजे नक्की काय ते माहीत नव्हतं. '११ ची वेळ टळून गेली म्हणजे आता आपल्याला आपलं विमान मिळतंय की नाही' या विचाराने तो जाम अस्वस्थ झाला होता !!!
शेवटी रात्री पावणे-बाराच्या सुमाराला आमची ४९ जणांची वरात विमानतळाच्या आत शिरली. त्यातले बहुतेक जण प्रथमच परदेश प्रवासाला निघालेले - एखाद्या शाळेच्या सहलीला नेताना जसे शिक्षक पोरांना सूचना देत असतात तसेच आमचे सहल आयोजक - श्री. व सौ. शिंदे - ओरडून आम्हाला निरनिराळ्या सूचना देत होते.

कार्गो सामानात काय-काय ठेवायचं, केबिन बॅगमध्ये काय ठेवायचं, पर्स वेगळी हातात धरली तर चालेल का - अनेक शंका आजुबाजूने ऐकू येत होत्या. सगळ्यांचा जाम गोंधळ उडाला होता...काही जणांची टूथपेस्ट पर्समध्ये होती, काही जणांचं कोल्ड क्रीम, काही जणांनी थोडे खाद्यपदार्थ केबिन बॅगमध्ये ठेवले होते...लोकांच्या आपापसातल्या चर्चा कानावर आल्या की ऐकणारे घाईघाईने असलं सगळं सामान इकडून तिकडे हलवत होते. त्यांत मी पण होते म्हणा !! मग अजय खास सल्ला द्यायला पुढे यायचा. ३०-४० मि. ओळीत उभं राहिल्यावर आदित्य कंटाळला. खाण्यापिण्याची दुकानं समोरच दिसत होती - मग साहजिकच, त्याला भूक लागली. एक पिझ्झा, एक बर्गर चापून झाला - तो सुध्दा रात्री १२ वाजता. सगळी मजा वाटत होती.

शेवटी एकदा काऊंटर्स सुरू झाले - श्रीलंकन एअरवेजच्या लोकांनी नव्याच सूचना आणि नियम सांगायला सुरूवात केली. मग लिपस्टिक, टूथपेस्ट, कोल्ड क्रीम गटातल्या वस्तू सगळ्या कार्गो बॅगेत सरकवल्या. बॅग बनवताना बाहेरच्या बाजूला एक कप्पा करण्याचे ज्या कुणाला सर्वात आधी सुचले असेल तो महानच म्हणायला हवा. ज्यांच्या बॅगला असे कप्पे नव्हते, त्यांनी वस्तू सहप्रवाश्यांच्या बॅगमध्ये सरकवल्या. तिथे थोडी मंडळींची तारांबळ उडली खरी पण ही तर सुरूवात होती. पुढच्या १५ दिवसांत सर्वजण 'तय्यार' हो‍ऊन इथून बाहेर पडणार होते. यथावकाश पुढचे सगळे सोपस्कार पार पडले ... इमिग्रेशन, बोर्डिंग पासेस वगैरे ... प्रत्येक काऊंटरपाशी सर्वात आत्मविश्वासाने कोण उभं रहात होतं तर आदित्य !! मान लिया उसको ... एकदम अनोळखी गोष्टी होत्या त्याच्यासाठी खरंतर ह्या, पण कुठेही गांगरला नाही, आमच्या मदतीची गरज लागली नाही ...

इमिग्रेशन काऊंटर पार करून समोरच्या मोठ्या काचेतून एकदम जवळून विमान दिसल्यावर मात्र त्याच्यातलं लहान मूल जागं झालं आणि त्यावेळची त्याची जी उस्फूर्त प्रतिक्रिया होती आणि चेहेऱ्यावरचे जे भाव होते त्याचं वर्णन इथे लिहिणं केवळ अशक्य !!!

विमान समोर दिसत होतं तरी त्यात चढायला अजून खूप वेळ होता. रात्रीचा १ वाजत होता. वेटिंग लाऊंजमध्ये जरा ऐसपैस खुर्च्या मिळाल्यावर मात्र डोळ्यावर झापड यायला लागली. पण तरीही लाऊंजमधले इतर देशी-विदेशी प्रवासी निरखण्याची संधी सोडाविशी वाटली नाही. मला आणि आईला एका टोकाला जागा मिळाली होती आणि अजय, आजी-आजोबांना दुसऱ्या टोकाला. आणि या दोन जागांच्या दरम्यान आदित्य नुसता बोकाळला होता !! असा सराईतासारखा इकडेतिकडे वावरत होता की जणू ते त्याचं घरच असावं !!!
दोन वाजायच्या सुमाराला 'सिक्युरिटी चेक' सुरु झाला. आईच्या बॅगेत नेलकटर होतं आणि सूचना वाचून कळलं की ते केबिन बॅगेत चालत नाही. मग 'घेतलं कशाला, १५ दिवसांत काय तुझी नखं वाढणार आहेत का तिथे' वगैरे वगैरे खास मायलेकींचे संवाद झाले, सापडलं तर इथेच टाकून द्यायचं ठरलं आणि गम्मत म्हणजे बॅगेज स्कॅनिंगमध्ये सापडलंच नाही !!! याला सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी म्हणायचं का?

सिक्युरिटी चेक नंतर पुन्हा एकदा ३०-४० मि.ची प्रतिक्षा आणि शेवटी आदित्य ज्याची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आला - श्रीलंकन एअरलाईन्सच्या फ़्लाईट नं. यू एल-१४२ मध्ये आम्ही चढलो ... आमच्यापैकी बहुतेक जण आजी-आजोबा वयोगटातले होते ... सीट बेल्टपाशी बऱ्याच जणांचं गाडं अडलं ... मग आसपासच्या आजी-आजोबांना मी त्याचं प्रात्यक्षिक दिलं. ३+३ अश्या सीट्स होत्या , आदित्यने खिडकीची जागा पकडली. वैमानिकाने सूचना दिली. ती सूचना देण्याची पध्दत, फ़्लाईट अटेंडंटचे लाईफ़ जॅकेटचे प्रात्यक्षिक हे सगळं बघायला पण खूप मजा आली ... शेवटी तीन-सव्वातीनच्या सुमाराला 'इमान फलाटावरून हाललं'.

गेले ६-८ महिने ज्याची चर्चा, नियोजन, फोनाफोनी, नेट-सर्फ़िंग इ. इ. सुरू होतं ती आमची सहल सुरू झाली होती ....