५ नोव्हेंबर - सोळावा दिवस


वास्तवाची चपराक.

दोन वाजत आले होते. म्हणजे पुढचा दिवस सुरू झाला होता. पण ते शरीराला कळणार कसं झोप काढल्याशिवाय !!

हवाई सुंदरीची प्रात्यक्षिकं वगैरे सुरू झाली. चेहेऱ्यावर तेच ते मुद्दामून आणलेले स्वागतोत्सुक भाव; कसलं ते काळ, वेळ, झोप, जागरण सगळ्याच्या पलिकडे गेलेलं त्यांचं आयुष्य!! ... माझं डोकं आता अजिबात चालत नव्हतं. एकीकडे लंच किंवा डिनर यापैकी काहीही नसणाऱ्या अश्या खाण्याच्या तिसऱ्या प्रकाराचं वाटप सुरू झालेलं होतं. काट्या-चमच्यांचे, पाण्याच्या ग्लासेसचे आवाज कानावर पडत होते पण मेंदूपर्यंत काहीही पोचत नव्हतं. मी सीटवर ठेवलेलं पांघरूण पूर्ण डोक्यावरून ओढून घेतलं आणि झोपायचा माझा मनसुबा जाहीर केला. बघता बघता माझा डोळा लागला सुध्दा ...
जराशी डुलकी लागणार इतक्यात एका हवाई सुंदरीनं मला अक्षरशः हलवून जागं केलं आणि 'काही खायला नको का?' अशी अगदी प्रेमानं चौकशी केली! आता तिला काय सांगायचं की अगं बाई तुझी सकाळ, संध्याकाळ, रात्र काय चालू आहे माहीत नाही पण माझी मध्यरात्र झाली आहे, झोपेची वेळ टळून सुध्दा २-३ तास झालेत...खाण्यापेक्षा जरा झोप काढू दिलीस तर अनंत उपकार होतील!! पण तिचीही चूक नव्हती. ती यांत्रिकपणे, इमाने-इतबारे तिचं काम करत होती. शक्य तेवढा सौम्य चेहेरा ठेवून मी तिला नकार दिला. आदित्यकडे एक नजर टाकली तर तो केव्हाच गाढ झोपी गेलेला होता. म्हणजे त्यादिवशी त्यालाही ऍपल ज्यूस प्यावसं वाटलं नव्हतं ...

... अर्धवट झोपेत अर्धा-एक तास गेला असेल. सगळे दिवे पुन्हा सुरू झाले, वैमानिकाच्या सूचनेनं जाग आली. पाण्यात भिजलेली कार्टून्स कशी मान हलवून पाणी झटकतात, अक्षरशः तशी मान झटकावी लागली डोळे उघडण्यासाठी!! दहा-पंधरा मिनिटांत विमानानं भारतभूमीवर टायर्स टेकवले होते.
पंधरा दिवसांत तिसऱ्यांदा 'आयुबोवान' कानी पडलं, आम्ही एकएक करून बाहेर पडायला लागलो. विमानातून बाहेर पाऊल ठेवल्याक्षणी एक अत्यंत कुबट वास नाकात शिरला. तो खास आपल्या देशाचा वास होता - मुंबईचा म्हणता ये‍ईल फारफार तर! त्या 'खास' वासाबद्दल पूर्वी अजयकडून ऐकलं होतं. तेव्हा मनातल्या मनात त्याला 'अतिशयोक्ती' म्हणून नावं देखील ठेवली होती. पण ते खरं होतं. तो वास आल्याआल्या त्याचे ते उद्गार मला आठवले. 'जावे त्याच्या वंशा...' दुसरं काय!!

सामान घेऊन थोड्याच वेळात आम्ही विमानतळाच्या बाहेर आलो होतो. सामानाची तपासणी वगैरे काहीच झालं नाही. चार वेगवेगळ्या विमानतळांवरच्या अनुभवानंतर ही गोष्ट चांगलीच खटकली! अगदी थोड्याश्या अवधीत सुरक्षाव्यवस्थेतल्या खंडीभर तृटी आढळल्या! जाताना जे-जे भव्य-दिव्य, जगावेगळं वाटलं होतं ते-ते सगळं आता दुय्यम, निकृष्ट दर्जाचं वाटायला लागलं - अगदी सामानाच्या ट्रॉलीज पासून पायाखालच्या फरश्यांपर्यंत सगळं!
बाहेर तर अक्षरशः भाजीबाजाराची अवकळा आलेली होती. पाण्याची डबकी, कचरा, धूळ आणि त्या कुप्रसिध्द पानाच्या पिचकाऱ्या!!! हातातली बॅग खाली फ़ूटपाथवर टेकवताना क्षणभर हात अडखळला - इथे आपली बॅग ठेवायची? या घाणीत?? पेंगुळलेले डोळे खाडकन उघडले होते, सार्वजनिक स्वच्छतेसारख्या साध्या गोष्टींत आपल्याला अजून किती मोठा पल्ला गाठायचाय या जाणीवेची जोरदार चपराक पुन्हा एकदा बसली होती! त्याच फ़ूटपाथवर पंधरा दिवसांपूर्वी डोंबिवलीहून येणाऱ्या बसची वाट पाहत आम्ही मजेत गप्पा मारत 'बसलो होतो' हे आता खरं वाटेना!! पण हेच वास्तव होतं, ते स्वप्न होतं ज्यानं आम्हाला गेल्या पंधरा दिवसांत अनोख्या जगाची सफर घडवून आणली होती. चकली-चिवडा खायचा तर हे वास्तव स्वीकारणं भाग होतं!!
पुण्याला जाणाऱ्या मंडळींनी बसची व्यवस्था केली. कल्याण-डोंबिवलीला जायलाही बस होतीच. आम्ही टॅक्सी ठरवली. साडेसहाला जे तिथून सुटलो ते दोन तासांत वापीच्या घरी पोचलो सुध्दा.

दूधवाले, पेपरवाले सकाळच्या लगबगीत होते, ऑफ़िसला जाणारे आपापल्या घाईत होते, दिवाळीची सुट्टी संपायला एक दिवस अवकाश होता त्यामुळे शाळकरी मुलं साखरझोपेत होती ... इथे काहीही बदललेलं नव्हतं ... बदललं होतं ते आमचं अनुभवविश्व!

दुपारी मस्त गरमागरम वरण भात खाल्ला आणि आडवी झाले. संध्याकाळी सहा वाजता झोप पूर्ण झाली. डोळे उघडल्यावर थोडा वेळ काही कळेचना - आपण कुठे आहोत, ही खोली कुठली - काही उलगडेना ........


(समाप्त)

४ नोव्हेंबर - पंधरावा दिवसविमानंही लेट होतात ... !!

आता घरी परतायला फक्त चोवीस तास शिल्लक राहिले होते. असं वाटलं होतं की सामान आवरताना उदास-उदास वाटेल, नको परत जायला असं वाटेल .... पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही - निदान मला तरी नाही. याचाच अर्थ पंधरा दिवसांच्या त्या सहलीचा आम्ही पुरेपूर आनंद उपभोगला होता, पूर्ण समाधान मिळवलं होतं, घरी परतून पुन्हा आपापल्या कामाला लागायला आम्ही तयार होतो.
सगळं आवरून सामान घेऊन खाली आलो. निघण्यापूर्वी शेवटचं फ़ोटो काढणं सुरू होतं लोकांचं. त्यातल्यात्यात ज्यांच्याशी जास्त ओळखी झाल्या त्यांच्याबरोबर फ़ोटोंरूपी आठवणी जतन करायची सर्वांचीच इच्छा होती. पत्ते, फ़ोन नंबर, ई-मेल यांची देवाण-घेवाण सुरू होती. उत्साहाच्या भरात सुरूवातीचे काही महिने नियमित संपर्क ठेवला जातो, नंतर हळूहळू ते मागे पडत जातं हे सर्वजण मनातल्यामनात जाणून होते, तरीही सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

नेहेमीप्रमाणे बस विमानतळाच्या दिशेनं निघाली, तेव्हा लक्षात आलं की क्वालालंपूरचा विमानतळ आम्ही अजून पाहिलेलाच नव्हता. चला, म्हणजे निघायच्या दिवशी पण काहीतरी नवीन पहायचं होतंच!! अर्थात, हे सुध्दा मानण्यावर असतं. मला अजून एक नवीन विमानतळ बघण्याची उत्सुकता होती. अजून कुणाचीतरी वेगळी प्रतिक्रिया झाली असेल - इमिग्रेशन इ.ची कंटाळवाणी पध्दत आठवून कुणाचीतरी दिवसाची सुरूवातच बेकार झाली असेल.

विमानतळावर पोहोचायला ४०-५० मिनिटं लागणार होती. बसमध्ये गाणी, स्तोत्र, भजन, अभंग इ. झालं. गेल्या पंधरा दिवसांत काय-काय वाटलं ते सांगायला सौ. शिंदेंनी आदित्यच्या हातात माईक दिला. जसं निघायच्या दिवशी आदित्यनं आम्हाला आश्चर्यचकित केलं होतं तसंच परतायच्या दिवशीपण केलं. तो बोलला नेहेमीचंच, म्हणजे 'मजा आली' वगैरे पण ते ज्या पध्दतीनं बोलला त्याचं आम्हाला विशेष कौतुक वाटलं. पन्नासएक लोकांसमोर उभं राहून ४-२ वाक्यं आत्मविश्वासानं आणि सहजतेनं बोलणं हेच महत्वाचं असतं. इतरही अश्याच गप्पा-टप्पा होईपर्यंत उतरायची वेळ आली.

इमिग्रेशनचे सगळे सोपस्कार पाचव्या मजल्यावर पार पाडायचे होते. बॅंकॉकला पण चौथ्या मजल्यावर इमिग्रेशन होतं पण रस्त्यानेच तिथपर्यंत नेऊन सोडलं होतं सगळ्यांना. इथे त्यासाठी लिफ़्ट होती. आधीच विमानतळावरची लिफ़्ट, त्यातही पारदर्शक भिंती असलेली लिफ़्ट पाहून आदित्य मूडमध्ये आला. लिफ़्टनं पाचव्या मजल्यावरच्या अवाढव्य लाऊंजमध्ये पोचलो आणि आपापल्या सामानासकट 'रांगेचा फायदा सर्वांना' या वचनाला जागत रांगा लावून उभे राहिलो. पुन्हा एकदा नकळत आपल्या विमानतळाशी तिथली तुलना सुरू झाली. आम्ही पाहिलेले हे चारही देश आकारानं भारतापेक्षा कितीतरी लहान, पण पर्यटनाला सगळीकडेच महत्व दिलेलं दिसलं. परदेशी पर्यटकांना आकर्षित करायचं तर विमानतळाकडे प्रथम लक्ष द्यायला हवं. आपण सणासुदीला दारात रांगोळ्या काढतो, गुढ्या-तोरणं उभी करतो, मांडव टाकतो .... त्याचा उद्देश हाच असतो की येणाऱ्या पाहुण्यांना घरात शिरतानाच प्रसन्न वाटलं पाहिजे. तसंच बाहेरच्या देशातून येणाऱ्या पर्यटकांना सर्वप्रथम विमानतळ पाहूनच प्रसन्न वाटलं पाहिजे, त्या शितावरून ते जो देश पहायला आले आहेत त्या भाताची योग्य ती परिक्षा करता आली पाहिजे. आपल्याकडे याच्या बरोबर उलटं होत असणार यात शंका नाही. इतक्या विविधतेनं आणि नैसर्गिक सौंदर्यानं नटलेला आपला देश, पण विमानतळाच्या भिंती आणि कोपरेच पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले पाहिल्यावर तशीच घाण या देशात सगळीकडे असणार अशी शंका जर एखाद्या परदेशी माणसाला आली तर त्यात त्याची काय चूक? नंतर तो काश्मिररूपी नंदनवनात जरी गेला तरी प्रथमदर्शनी बनलेलं मत सहजासहजी थोडंच बदलणार? आपल्या आणि तिथल्या विमानतळांची अंतर्गत सजावट आणि स्वच्छता यात इतकी तफावत आढळण्याचं मला जाणवलेलं मुख्य कारण म्हणजे आपले विमानतळ अजून सरकारच्या हातात आहेत आणि आम्ही पाहिलेले सगळे खाजगीकरण झालेले आहेत. कितीही नाकारायचं ठरवलं तरी फरक हा पडतोच! मुंबई-दिल्ली विमानतळांच्या खाजगीकरणाबद्दलच्या बातम्या अधूनमधून कानावर येत असतात. 'त्याच्याशी आपला काय संबंध?' असं इतके दिवस वाटायचं. पण आता त्या नियोजित खाजगीकरणाला माझा जोरदार पाठिंबा आहे. 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' हे अगदी खरं आहे .... जसं 'इकॉनॉमी क्लास'च्या वंशा गेल्यावर मला त्यातला फोलपणा जाणवला होता!!! पण पुन्हा त्याच 'इकॉनॉमी क्लास'मध्ये बसून परतीचा कोलंबो पर्यंतचा पाच तासांचा प्रवास करायचा होता ज्याची पूर्वतयारी म्हणून आम्ही तिथे रांगेत उभे होतो, क्वालालंपूरचा विमानतळ निरखत होतो. इतर आजी-आजोबांची ट्रॉलीज, बोर्डिंग पास, बॅगेज टॅग्ज, इ. साठी चाललेली धावपळ पाहत होतो. आमचे आजी-आजोबा मात्र निवांत खुर्च्यांवर गप्पा मारत बसलेले होते. कारण धावपळ करायला आम्ही दोघं होतो.

मलेशियाचं 'रिंगीट' हे चलन बदलून पुन्हा आपले रुपये घ्यायच्या निमित्तानं मी त्या सगळ्या लाऊंजभर फिरून आले. ते ऑफ़िस कुठल्याकुठे लांबवर होतं. वाटेत 'चौकशी'चा काऊंटर दिसला. तिथे खरंच चौकशी करता येत होती. विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरं मिळत होती. दोनशे-अडीचशे रिंगीट देऊन अडीच-तीन हजार रुपये हातात मिळाले. पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हातात रुपये खेळायला लागले होते. पूर्वापार ओळखीच्या त्या नोटा पाहून मला भरतं आलं. घरी परततोय याचा नव्यानं आनंद झाला. शेवटी कितीही झालं तरी आपलं घर ते आपलं घर आणि आपला देश तो आपला देश!!! त्या बाबतीत मी पक्की देशप्रेमी वगैरे आहे. तुलनात्मक ज्या वाईट गोष्टी आहेत त्या आहेतच पण म्हणून उद्या जर कुणी मला सिंगापूरला कायमची जाऊन रहा म्हटलं तर मला नाही वाटत मी त्याला सहजासहजी तयार होईन! पंधरा दिवसांत मी फक्त दिखाऊ गोष्टींची तुलना केलेली होती. पण अश्या वरवरच्या गोष्टींनी दोन संस्कृतींतली खरीखुरी तुलना होत नाही. जेव्हा दुसऱ्या देशात जाऊन राहण्याची वेळ येते तेव्हा आपल्या देशाशी जन्माच्यावेळेलाच जोडले गेलेले धागे काही प्रमाणात तोडूनच जावं लागतं. तरच माणूस त्या परक्या देशाला थोड्याफार प्रमाणात आपलंसं करू शकतो. इथे तर साध्या सवयीच्या चलनी नोटा पंधरा दिवसांनी समोर आल्यावर मला आनंद झाला होता, मी कुठली ते तसे धागे तोडून वगैरे जाणार!! त्यापेक्षा हे बरं - आठ-पंधरा दिवस जा, खा, प्या, हिंडा, मजा करा, अनुभवाने समृध्द व्हा पण परतल्यावर त्या नव्या अनुभवांचा तुमच्या देशाला कसा उपयोग होईल ते बघा!! .... पण त्या क्षणी तरी आपापल्या बॅगांना नीट टॅग्ज वगैरे लावून त्या व्यवस्थित पुढे जाताहेत ना ते बघायचं होतं.

सगळं सामान गेल्यावर बोर्डिंग पासेस घेऊन आम्ही पुढे निघालो. वाटेत एका ठिकाणी चक्क भारतीय पध्दतीची, संस्कारभारतीची असते तसली मोठीच्यामोठी रांगोळी काढलेली दिसली. आपल्या चलनी नोटांपाठोपाठ ती रांगोळी पाहूनही छान वाटलं. इमिग्रेशनमधून पुढे आलो. कागदोपत्री आता आम्ही मलेशिया सोडलेलं होतं. तिथून बोर्डिंग गेटपाशी एका ट्रेननं जायचं होतं. तिथली सगळी बोर्डिंग गेट्स एकमेकांपासून इतकी लांबलांब होती की तिथे जायला
वेगवेगळ्या ट्रेन्स होत्या. विमानतळाच्या आत इकडे-तिकडे फिरायला ट्रेन!! नवलाई पंधरा दिवसांनंतरही संपलेली नव्हती तर!!

पुन्हा एकदा सगळे 'प्याशिंजर' फलाटावर जाऊन उभे राहिले. आम्हाला 'सी-४' बोर्डिंग गेटला घेऊन जाणारी ट्रेन लगेच आलीच. २-३ मिनिटांत ट्रेनमधून तिथल्या लाऊंजपर्यंत पोचलो. आता तास-दीड तास वेळ काढायचा होता. पण फारसा प्रश्न आला नाही कारण तिथे वेगवेगळ्या प्रकारची भरपूर दुकानं होती. चलन बदलून घेताना ५-६ चिल्लर नाणी जवळ शिल्लक राहिली होती. ती खर्च करायच्या मोहिमेवर आता मी आणि आदित्य निघालो. चणे-शेंगदाणे गटातलं मूठभर काहीतरी मिळालं तेवढ्याचं. पण त्यातही आनंद झाला - हवी असलेली वस्तू हव्या त्या किंमतीला मिळाल्यावर होतो तसा!!! ते दाणे सगळ्यांनी वाटून खाल्ले. मग इतर दुकानांतून इकडे-तिकडे फिरत थोडा वेळ काढला. एक पुस्तकांचं दुकानही होतं. नेहेमीप्रमाणे ते मला सर्वात शेवटी दिसलं. तरीही त्यातल्या त्यात अर्धा-पाऊण तास तिथे घालवलाच! आंतरराष्ट्रीय विमानतळावरचं पुस्तकांचं दुकान, तिथली पुस्तकंही आंतरराष्ट्रीय होती .... आणि त्यांच्या किंमतीही!!

आमच्यापैकी एका आजींनी घरातून निघताना बरोबर घेतलेले उरलेसुरले फराळाचे पदार्थ सगळ्यांत वाटून टाकले. त्यांपैकी भाजणीच्या चकलीचा एक तुकडा माझ्या वाट्याला आला. तेवढ्या एका तुकड्याने असं तोंड चाळवलं ना की विचारता सोय नाही. लगेच जाणवलं की यंदा या सहलीच्या तयारीच्या नादात फराळाचे कुठलेही पदार्थ केले अथवा खाल्ले गेले नाहीत. असेल सिंगापूर सुंदर आणि स्वच्छ पण तिथे खमंग चिवडा कुठे मिळाला आम्हाला खायला? असेल बॅंकॉकचा विमानतळ भव्य पण तिथे कुरकुरीत चविष्ट भाजणीची चकली म्हणजे काय ते कुठे कुणाला माहितीये? 'चॉकोलेट गॅलरी'त असतील भरपूर प्रकारची उंची चॉकोलेट्स पण करंजीचं गोड सारण नुसतं खातानाची मजा कुठे त्यांत ... आता तर मला घरी परतायची फारच ओढ लागली ....

दुपारी एकच्या सुमाराला प्रत्यक्ष बोर्डिंग गेटपाशी सगळे जाऊन पोचलो. समोरच्या मोठ्या काचांच्या खिडकीतून उडणारी-उतरणारी विमानं दिसत होती. पुढ्यातच आमच्या विमानात सामान चढवण्याचं काम चालू होतं. तिथली काम करणारी माणसं प्रवाश्यांच्या मोठाल्या बॅगा आत अक्षरशः दणादण फेकत होती. परदेश प्रवास, विमान प्रवास म्हणून त्या खास चाकं लावलेल्या मोठ्या बॅगांचं आम्हाला केवढं अप्रूप होतं. पण त्यांच्या दृष्टीनं ती नित्याचीच बाब होती. एकीकडे प्रवाश्यांचे सिक्युरिटी, इमिग्रेशन इ. सोपस्कार पार पडत असताना पडद्यामागे काय चाललेलं असतं ते त्या दिवशी तिथे पहायला मिळालं. वेळ मस्त गेला हे सांगायला नकोच!
'श्रीलंकन फ़्लाईट नं. यू. एल. ३१२'साठीची सूचना झळकली आणि सगळे उठलो. क्वालालंपूर खुर्दहून कोलंबो बुद्रुक मार्गे मुंबई गावठाणाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला होता.

आता विमानातल्या कुठल्याही अंतर्गत गोष्टी निरखण्यात फारसा रस नव्हता, त्यामुळे जेवणखाण झाल्यावर पाच तास काय करायचं हा प्रश्नच होता. समोर छोट्याश्या टी.व्ही.च्या एका चॅनेलवर कुठलातरी हिंदी सिनेमा सुरू झाला होता. म्हटलं चला हा टाईमपास काही वाईट नाही. पण कसलं काय ... एक-दोन मिनिटं त्या स्क्रीनकडे पाहिलं आणि मला मळमळायला लागलं! आता तर पाच तास कसे काढायचे हा अजूनच मोठा प्रश्न होता. शेवटी टाईमपासचा हुकमी मार्गच कामी आला - ऍव्हॉमिन घेतली आणि झोपायचं ठरवलं. गाढ झोप लागणं शक्यच नव्हतं पण एक-दोन डुलक्या काढल्या.
पाच तासांनी कोलंबो विमानतळावर उतरलो. घड्याळ्याचे काटे पुन्हा मागे सरकवले. पण शारिरीक घड्याळ कसं पुढे मागे करणार? पोट म्हणत होतं जेवणाची वेळ झालीये ... पण कोलंबोचं घड्याळ सांगत होतं अजून दोन तास थांबा!! ते तर थांबायचं होतंच शिवाय आमचं पुढचं विमान रात्री बारा वाजता होतं. ती प्रतिक्षा होतीच. पुन्हा त्यात तिथले रात्रीचे बारा म्हणजे आमच्या शारिरीक घड्याळांची मध्यरात्र!! एकंदर कठीण काम होतं पण मजाही वाटत होती. म्हटलं तर आम्ही त्याक्षणी कोलंबोच्या विमानतळावर होतो, पण व्हिसा नसल्यामुळे श्रीलंकेत अधिकृतरीत्या प्रवेश करू शकत नव्हतो. म्हणजे ना या देशात ना त्या देशात असे आम्ही मध्येच कुठेतरी होतो!! 'व्हिसा' वरून आठवलं - दहा दिवसांपूर्वी जेव्हा आम्ही कोलंबोला उतरून व्हिसा घेतला तेव्हा बहुतेकांना २-३ दिवसांचाच व्हिसा मिळाला होता ... आदित्यला मात्र ३० दिवसांचा मिळाला होता. म्हणजे त्या रात्री आमच्यापैकी फक्त आदित्य कोलंबो शहरात अधिकृतरीत्या प्रवेश करू शकणार होता पण नाईलाजास्तव त्याला आमच्या बरोबर थांबणं भाग होतं ....

पुन्हा एकदा तिथल्या दुकानांतून चक्कर मारून आलो, गरमागरम कॉफ़ी प्यायली, गप्पा मारल्या, पत्ते खेळलो, गाणी म्हटली आणि कसेबसे दोन तास काढले. पहिल्या २-३ दिवसांचा अनुभव लक्षात घेता अजयनं मात्र झोप काढणं पसंत केलं. आमच्यामुळे त्या लाऊंजला एखाद्या गप्पा रंगलेल्या कट्ट्याचं स्वरूप आलं होतं! अनेक दिवस परदेशात फिरतीवर असलेला एक पुण्याचा रहिवासी आमचा सहप्रवासी होता. तिथे त्यावेळी असं अनपेक्षितपणे आणि घाऊक भावात मराठी कानावर पडल्यामुळे तो फारच खूष झाला. मराठी गप्पा ऐकून फार बरं वाटलं असं त्यानं मुद्दाम येऊन सांगितलं.

तिथल्याच एका रेस्तरॉंमध्ये जेवण होतं. पूर्ण पंधरा दिवसांतलं ते सर्वात वाईट जेवण ठरलं. पण करणार काय - 'श्रीलंकन'च्या फुकट पॅकेजमधलाच तो एक भाग होता. 'फुकट' हवंय ना मग चावा चिवट पोळ्या, गिळा टचटचीत भात, तिखटजाळ आमटी ... भरल्या ताटावरून अर्धपोटी उठणं म्हणजे काय त्याची शब्दशः प्रचिती त्यादिवशी आली!!

अकरा वाजता पुन्हा सिक्युरिटीसाठी रांगा लावल्या. पुढे जाऊन अर्धपोटी, पेंगुळल्या डोळ्यांनी, जडावलेल्या डोक्यांनी आमच्या विमानाचा नंबर कधी येतोय त्याची वाट पाहत बसून राहिलो. बरोबर अकरा दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी पहाटेपहाटे आम्ही बॅंकॉकच्या विमानाची वाट पाहत बसलो होतो. त्यादिवशीपण झोप अपुरी झाली होती पण सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता, तेव्हापण भूक लागली होती पण 'बॅंकॉकला जायचंय' या विचारापुढे तो मुद्दा गौण वाटत होता. नवीन देश पहायच्या उत्सुकतेनं जडावलेलं डोकं हलकं झालं होतं. त्याक्षणी मात्र एक-एक मिनिट म्हणजे एक-एक तास वाटत होता. वेळ जाता जात नव्हता. पावणेबारा वाजता 'फ़्लाईट नं. यू. एल. १४१' ही अक्षरं नजरेस पडली आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला .... पण हे काय...! त्याच्यापुढे नेहेमीचे 'Now Boarding' हे शब्द दिसलेच नाहीत - त्याऐवजी 'Delayed' हा नको असलेला शब्द येऊन डोळ्यात घुसला!!! हा मात्र सहनशक्तीचा अंतच होता. अजून एक तास??? 'अनुभवाने समृध्द' म्हणता म्हणता इतकं की आजवर फक्त बस-ट्रेन उशीरा येण्याची सवय असलेल्यांना 'विमान लेट' असण्याचा अनुभव आला होता....

तो एक तास कसा काढला ते ज्याचं तोच जाणे. मात्र बरोबर एक वाजता विमानापाशी घेऊन जाणारी बस आली. विमानात आपापल्या जागांवर स्थानापन्न झालो. आता कधी एकदा घरी जाऊन पडतोय असं झालं होतं ....

३ नोव्हेंबर - चौदावा दिवसतीन दिवसांत तिसरं हॉटेल ...


मलेशियातला तो आमचा तिसरा दिवस होता. आधीच्या दोन दिवसांत मलाय शब्दसंग्रहात थोडी भर पडली होती. Pintu म्हणजे 'दरवाजा', Masuk म्हणजे 'प्रवेश', Keluar म्हणजे 'बाहेर जायचा रस्ता', Dilarang Masuk म्हणजे 'प्रवेश निषिध्द' वगैरे, वगैरे. अर्थात हे ज्ञान हॉटेलमधल्या निरनिराळ्या पाट्या वाचून आलेलं होतं. कानावर पडणाऱ्या शब्दांतून मात्र कुठलाही बोध होणं कठीणंच होतं.

परतायला दोनच दिवस अवकाश होता आणि एक अप्रिय गोष्ट घडली. आमच्या गृपमधल्या एक आजी हॉटेलच्या लॉबीत पाय घसरून पडल्या आणि त्यांच्या कंबरेला जबर दुखापत झाली. त्यांना ताबडतोब तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. एक रात्र तिथेच रहावं लागलं. त्यांच्या कंबरेचं हाड एका ठिकाणी मोडलं होतं असं कळलं. पुढचे दोन दिवस त्यांना हॉटेलच्या खोलीतच पडून रहावं लागलं. चौदाव्या दिवसाची सुरूवात या गालबोटानंच झाली होती....

जसं गेंटींग हायलंडला एक दिवस थीम-पार्क मध्ये घालवला, तसंच त्या दिवशी 'सन-वे लगून' रिसॉर्टच्या 'वॉटर पार्क' मध्ये दिवसभर धम्माल करायची होती. पण त्यापूर्वी ते आवडलेलं हॉटेल आणि ती सतराव्या मजल्यावरची आवडलेली खोली सोडायची होती. दर एक-दोन दिवसांनी सामान उचकायचं, पुन्हा भरायचं हे सगळं आता अंगवळणी पडलं होतं. सामानसकट तिथून बसनं निघालो आणि थोड्याच वेळात त्या रिसॉर्टला पोचलो.
त्या परिसरात वेगवेगळ्या दर्जांची ४-५ हॉटेल्स होती. आमचा मुक्काम 'सन-वे पिरॅमिड' नामक हॉटेलमध्ये होता - तो ही फक्त २४ तासांसाठी.... मलेशियात आल्यापासून तीन दिवसांत आम्ही तीन हॉटेल्सचं मीठ खाल्लं होतं!!

'सन-वे लगून' हा परिसर म्हणजे दक्षिण आफ़्रिकेतल्या 'सन सिटी'ची हुबेहूब प्रतिकृति आहे असं समजलं ... तेच सन सिटी जिथे काही वर्षांपूर्वी 'मिस वर्ल्ड' स्पर्धा झाली होती, ज्याच्या विरोधात खूप निदर्शनं झाली होती आणि ज्या स्पर्धेत आपली ऐश्वर्या जिंकली होती ... असं ते शहर फक्त ऐकूनच माहीत होतं. आता मूळ कलाकृतीच पाहिलेली नसल्यामुळे तिची ही प्रतिकृति हुबेहूब आहे की नाही ते कळणार कसं? आणि तसंही, ते न कळल्यानं काही फरकही पडणार नव्हता. किमान प्रत्यक्ष त्या 'सन सिटी'ला भेट दे‍ईपर्यंत तरी!! ही नक्कल सही-सही होती किंवा कसं ते तिथे गेल्यावर ठरवता आलं असतं ... त्या क्षणी तरी 'वॉटर पार्क' वर लक्ष केंद्रित करायचं ठरवून निघालो.
'वॉटर पार्क'ला जायची वाट आमच्या हॉटेलच्या मागच्या बाजूनं, एका ५-६ मजली चकाचक 'शॉपिंग मॉल'च्या तिसऱ्या मजल्यावरून जात होती. पूर्वीचे चौकोनी वाडे असायचे तशी काहीशी त्या मॉलची रचना होती - म्हणजे, मध्ये मोकळी जागा आणि चहूबाजूंनी दुकानं. तळमजल्यावरच्या मोकळ्या जागेत 'फ़िगर स्केटिंग' आणि 'आईस हॉकी' खेळण्याची सोय होती. अगदी लहान-लहान मुलंसुध्दा तिथल्या गुळगुळीत बर्फाच्या पृष्ठभागावरून सहज इकडे-तिकडे करावं तशी फिरत होती, सराव करत होती. तिथला दिव्यांचा लखलखाट, झगमग, ती छानछान दुकानं, ते स्केटिंग - हे सगळं पाहून आम्ही थोडा वेळ 'वॉटर पार्क' वगैरे विसरूनच गेलो. संध्याकाळी त्या दुकानांतून एक-एक चक्कर टाकायचीच असं मनोमन ठरवून टाकलं.
त्या मॉलमधून पुढे गेल्यावर एका लिफ़्टनं सहा-सात मजले वर जाऊन मग वॉटर पार्कच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचता यायचं. वाटेत ठिकठिकाणी 'काम चालू, गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत' अश्या पाट्या दिसत होत्या. पण त्या इंग्रजीतच होत्या ... त्यामुळे मलाय भाषेत दिलगिरी कशी व्यक्त करतात ते समजण्याची एक मोलाची संधी हुकली. त्या वॉटर पार्कचं आधुनिकीकरण चालू होतं. म्हणजे, 'इथे अजून काहीतरी नवीन बनतंय जे आपल्याला पहायला मिळणार नाहीये' याचीच रुखरूख तिथे शिरण्यापूर्वी !!! ... 'अजून ४-६ महिन्यांनी आलो असतो तर नव्या स्वरूपातलं वॉटर पार्क बघायला मिळालं असतं' असा विचार हटकून आलाच मनात !! जे मिळतंय त्यात आनंद मानायच्याआधीच जे हुकणार आहे त्याबद्दल हळहळ का वाटते आपल्याला?

गेंटिंग हायलंडच्या थीम-पार्कप्रमाणेच इथेही दिवसभर सगळेजण आपापली वयं विसरून चिक्कार हुंदडले. दुपारच्या जेवणानंतर आम्ही थोडे ढेपाळलो पण आदित्यचा उत्साह कायम होता. त्याला पुन्हा पाण्यात डुंबायचं होतं, उड्या मारायच्या होत्या. त्याच्या उत्साहावर पाणी पडू नये म्हणून त्याला पाण्यात सोडलं आणि आम्ही काठावर बसून राहिलो आरामात. पण अर्ध्या-एक तासात आभाळ भरून आलं आणि गडगडाटासह पाऊस सुरू झाला. सर्वांना लवकरात लवकर तिथून बाहेर पडायला सांगण्यात आलं.परतताना वाटेत एके ठिकाणी Sandstone Exhibition होतं ते पाहिलं. फ़्लॉवरच्या गड्ड्यांसारखे किंवा मश्रूमसारखे दिसणारे निरनिराळ्या रंगांचे आणि आकारांचे दगड मांडून ठेवले होते आणि जोडीला आकर्षक प्रकाशयोजना केलेली होती. दगडांचे ते नैसर्गिक आकार केवळ अप्रतिम होते!!

संध्याकाळी मॉलमधून फेरफटका मारायचा निश्चय काही मजल्यांपुरता पूर्णत्वाला नेता आला. पाण्यात खेळून पाय खूप दुखायला लागले होते, त्यात तो ५-६ मजल्यांवरचा अगणित दुकानांचा पसारा ... उत्साह खूप होता पण २-३ मजले फिरून होईपर्यंत पायांनी असहकार आंदोलन सुरू केलंच!! मग हॉटेलवर परत येऊन थोडा वेळ निवांत गप्पा-टप्पा केल्या, पत्ते खेळलो. आमच्या खोलीच्या खिडकीतून खालच्या कॉफ़ी-शॉपमधला मोठा टी.व्ही.चा पडदा दिसत होता. कुठलातरी फ़ुटबॉलचा सामना चालू होता, तो पाहिला थोडा वेळ.

जेवणं झाल्यावर हॉटेलच्या बाहेर एक फेरी मारून आलो. सगळीकडे दिवाळी-ईद निमित्त अतिशय सुंदर रोषणाई केलेली दिसली. त्या असंख्य नाजूक दिव्यांच्या सोबतीनं निवांत फिरायला फारच छान वाटलं. सण आणि दिव्यांचा झगमगाट यांचं जगभर अतूट नातं आहे. आपल्याकडेही नवरात्रात, गणेशोत्सवात त्याच तोडीची रोषणाई असते, फक्त त्याच्या जोडीनं कर्कश्य आवाजातली गाणीही असतात जी त्यातली मजा पार घालवून टाकतात ...

हॉटेलवर परतल्यावर पुन्हा सामानाची आवराआवर करायची होती ... दुसऱ्या दिवशी परतीचा विमान-प्रवास होता. मलेशिया सोडताना थोडी रुखरुख जाणवली की थीम-पार्क, वॉटर-पार्कच्या नादात तिथल्या साध्या-साध्या गोष्टी निरखायला मिळाल्या नाहीत. पण २-३ दिवसांच्या धावत्या भेटीत दुसरं काय होणार? तसं बघितलं तर फक्त सिंगापूरच का, प्रत्येक देशात, प्रत्येक ठिकाणीच किमान आठवडाभर तरी राहता आलं पाहिजे ... जे कुणालाच शक्य नाही. मग ती दुधाची तहान अशी ताकावर भागवावी लागते ... पण निदान तेवढं तरी करायलाच हवं आणि ते आम्ही केलं होतं....
खरं म्हणजे 'दुधाची तहान ताकावर ...' असं म्हणून पंधरा दिवसांच्या अभूतपूर्व आणि अनेक अर्थांनी आनंददायी घटनांवर बोळा फिरवायची कुणाचीच इच्छा नव्हती ... !!!

२ नोव्हेंबर - तेरावा दिवस


ट्विन टॉवर्सची दिवसभर सोबत ...

दिवसाची सुरूवात प्रसन्न झाली की सबंध दिवस छान जातो असं म्हणतात. सलग तेरा दिवस प्रसन्न सुरूवात आणि छान दिवस - ही म्हणजे एक जंगी मेजवानीच होती. बरं, रोज त्या प्रसन्नतेचे वेगवेगळे प्रकार! आता त्यादिवशीचंच बघा ना... आदल्या दिवशी खिडकीतून दिसलेल्या विहंगम दृश्यानं समाधान झालं नव्हतं जणू, म्हणून त्या दिवशी सुध्दा उठल्याउठल्या पुन्हा पडदे सारून बाहेर नजर टाकली. धुकं खूप कमी दिसलं. पण त्यामुळे आधी न दिसलेली एक गोष्ट अचानक समोर आली!! चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं आणि आदल्या दिवशी धुक्यात लपलेलं क्वालालंपूर शहर!! साताऱ्याहून येताना कात्रजचा बोगदा ओलांडला की कसं अचानक पुणे शहर समोर लुकलुकायला लागतं - अगदी तसंच! मग आम्ही निरनिराळ्या खिडक्यांतून डोकावून बघण्याचा सपाटाच लावला. हॉटेल-लॉबीच्या एका खिडकीतून पूर्वानं लांबवर 'पेट्रोनास ट्विन टॉवर्स' आणि 'के. एल. टॉवर' पण शोधून काढले. पुढचा अर्धा तास मग त्या खिडकीतून फ़ोटो काढण्यासाठी सगळ्यांची रांगच लागली.

त्या दिवशीची पहिली आकर्षणाची गोष्ट होती ती म्हणजे 'दिवसाचा 'केबल कार'चा प्रवास'. आदल्या दिवशी करकरीत तिन्हीसांजेला त्या काळ्याकुट्ट जंगलानं मनावर जे दडपण आणलं होतं ना ते मला झुगारून द्यायचं होतं. त्या जंगलाची ती तशी आठवण मला पुसून टाकायची होती आणि झालंही तसंच.
ते घनदाट पर्जन्यवन आता सकाळच्या कोवळ्या, प्रसन्न उन्हात फारच देखणं वाटत होतं. 'अचानक होणाऱ्या बिघाडा'चा विचारही शिवला नाही मनाला ... कारण कुठल्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी वाटेत ठिकठिकाणी अतिशय उत्कृष्ट यंत्रणा उभी केलेली दिसत होती आणि निसर्गदृश्याचं वर्णन काय करावं...!! 'हिरव्या रंगाची मुक्त उधळण' वगैरे शब्द थिटे पडले असते!! जोपर्यंत निसर्गाशी केवळ अश्या रसग्रहणापुरता संबंध ये‍ईल तोपर्यंत असेनात का सगळी माणसं त्याच्यादृष्टीनं किडा-मुंग्यांसारखी!!
.... परतीचा तो प्रवास आदल्या दिवशीपेक्षा फारच पटकन झाल्यासारखा वाटला. आदित्यच्या दृष्टीनं मात्र थीम-पार्क, केबल-कार वगैरे सगळं केव्हाच भूतकाळात जमा झालं होतं कारण आमची बस आता 'चॉकोलेट फ़ॅक्टरी'च्या दिशेनं निघाली होती!

त्या चॉकोलेट फ़ॅक्टरीचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे केवळ शाकाहारी चॉकोलेट्स बनवली आणि विकली जातात. 'चॉकोलेट फ़ॅक्टरी' नावावरून वाटलं होतं की चॉकोलेट्स बनवण्याची प्रक्रिया पहायला मिळेल. पण प्रत्यक्षात आम्ही गेलो ते चॉकोलेट्सच्या दुकानात. सुरूवातीलाच, तिथल्या एका विक्रेत्याने सगळ्यांना खूष करून टाकलं - मलेशियन उच्चारांच्या इंग्रजीत माहिती देताना आम्हाला चक्क २-३ हिंदी वाक्यं ऐकवली. ती सुध्दा उगीच इकडची तिकडची नाहीत तर कुठली चॉकोलेट्स स्वस्त पडतील ते मुद्दाम हिंदीत सांगितलं. आधीच शाकाहारी चॉकोलेट्स म्हटल्यावर तमाम जोशी, परांजपे, छत्रे मंडळी सरसावली होती; त्यात आता स्वस्त चॉकोलेट्स कुठली ते ही कळलं. मग आदित्यची काय कथा... सगळ्या मोठ्या माणसांनासुध्दा 'हे घेऊ की ते घेऊ' असं झालं होतं. एकदा त्या चॉकोलेट्सची खरेदी झाल्यावर आदित्यच्या दृष्टीनं सहल 'सुफळ संपूर्ण' झालेली होती. त्यानंतरचे दोन दिवस तो 'आता उरलो उपकारापुरता' अश्या अविर्भावातच वावरत होता.
अर्ध्या-पाऊण तासानं, त्या दुकानाचा भरपूर फायदा करून दिल्यावर तिथून निघालो. गेंटिंग हायलंड परिसराला टा-टा करून आमची बस आता क्वालालंपूरच्या दिशेनं निघाली. उरलेला दिवस 'क्वालालंपूर दर्शना'चा कार्यक्रम होता.

प्रथम घड्याळांच्या एका मोठ्या दुकानात गेलो. Window Shopping आणि खरंखुरं shopping यात तासभर घालवून मग प्रसिध्द Batu Caves पहायला गेलो.
वर्षानुवर्षं पाऊसपाणी झेलत उभ्या असलेल्या डोंगरांत नैसर्गिकरीत्या त्या क्षारांच्या गुहा तयार झालेल्या आहेत. काही-शे वर्षांपूर्वी त्यांचा शोध लागला. मग तिथे कार्तिकस्वामींचं देऊळ बांधण्यात आलं. जगातलं ते एकमेव असं कार्तिकस्वामींचं देऊळ आहे की जिथे स्त्रियांनाही प्रवेश आहे म्हणे. २७० पायऱ्या चढून गेल्यावरच ते दुर्लभ दर्शन होणार होतं. खरंतर असल्या भेदभावांची मला मनस्वी चीड आहे. पण पुन्हा एकदा मी स्वतःलाच समजावलं की 'देऊळ बघायला' म्हणून जायचंच नाही. त्या‍ऐवजी 'निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार' पहायला म्हणूनच जायचं.
ती पायऱ्यांची संख्या ऐकूनच अर्ध्याअधिक आजी-आजोबांनी माघार घेतली. बाकीच्यांनी गिर्यारोहण सुरू केलं. आमच्या सहाजणांपैकीही दोनच गडी होते त्यांत - मी आणि आदित्य. पायथ्यापाशी कार्तिकस्वामीचा अतिभव्य आणि उंचच्या उंच, उन्हात लखलखणारा सोनेरी रंगाचा पुतळा उभा होता. पुतळ्याच्या शेजारूनच पायऱ्या वर जात होत्या. २७० ही संख्या आधीच कळली असल्यामुळे मारे अगदी उत्साहात मी पायऱ्या मोजायला सुरूवात केली होती आणि पाचच मिनिटांनी दमून, घामेघूम हो‍ऊन जेव्हा पाणी पिण्यासाठी थांबले तेव्हा काही मिनिटांपूर्वी आपण कशाचीतरी मोजदाद करत होतो हे विसरूनही गेले होते! पायऱ्या उंच असल्यामुळे खूप दम लागत होता शिवाय ऊनही खूप होतं.
.... पण, १५ मिनिटांनी जेव्हा वर पोचले आणि त्या गुहांचा दर्शनी भाग जेव्हा दृष्टीस पडला तेव्हा इतके कष्ट घेतल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं ... अनंत काळापासून जमत आलेले क्षार आणि त्यांपासून बनलेले तिथले चित्रविचित्र आकार खरंच थक्क करणारे होते. दोन दिवसांत दुसऱ्यांदा निसर्गापुढे नतमस्तक होण्याची वेळ आलेली होती. प्रत्यक्ष देवळापाशी पोचायला पुढे थोडं चालत जायचं होतं. 'गुहा' म्हटल्यावर जे डोळ्यांसमोर ये‍ईल त्यापेक्षा तो अंतर्भाग खूपच मोठा होता - जवळजवळ ३-४ मजली उंचीचा आणि ४०-५० फ़ूट रुंदीचा!! देवळांच्या गाभाऱ्याबाहेर एखादा सभामंडप असतो. तिथे त्याची गरजच नव्हती कारण एवढा प्रचंड नैसर्गिक सभामंडप आपणहूनच तिथे हजर होता. काही ठिकाणी तर डोंगरांना लहानमोठी आरपार भगदाडं पडलेली होती. म्हणजे उजेडाचा प्रश्नही मिटला. कडेकपारींमधून साचलेलं पाणी तिथून खाली सांडत होतं. कडक उन्हाच्या आणि काळ्या डोंगरांच्या पार्श्वभूमीवर ते पाण्याचे थेंब अक्षरशः मोत्यांसारखे भासत होते. इतरांना देवदर्शनानं जेवढं समाधान मिळालं त्याहूनही कणभर अधिकच मला मिळालं तिथले हे असे निसर्गाचे सगळे चमत्कार बघून!!! नाईलाजास्तव खालीच थांबलेल्या आमच्या म्हाताऱ्या मंडळींसाठी म्हणून मी भरपूर फ़ोटो काढले की दुधाची तहान निदान त्यांना ताकावर तरी भागवता यावी ...

अर्ध्या तासानं उन्हातून थकून-भागून खाली उतरलेल्या मंडळींची क्षुधाशांती करायला एक शहाळंवाला हजर होताच आणि तो ही आदित्यनंच शोधून काढलेला ... त्याच्याकडचे नारळही बॅंकॉकसारखेच - मोठे, जड, पसरट आणि बाहेरून पांढऱ्या रंगाचे.

तिथून जायचं होतं के. एल. टॉवर पहायला ... किंबहुना के. एल. टॉवरवरून संपूर्ण क्वालालंपूर शहर पहायला. निसर्गनिर्मित चमत्कार पहायला २७० मानवनिर्मित पायऱ्या चढून झाल्या, आता मानवनिर्मित चमत्कार पहायला 'लिफ़्ट' सारख्या अजून एका मानवनिर्मित चमत्काराच्याच मदतीने हजार-बाराशे फ़ूट उंची गाठायची होती. के. एल. टॉवरच्या Observation Deck वर आम्ही जाणार होतो. दूरसंचारासाठी वापरल्या जाणाऱ्या जगातल्या पाच सर्वात उंच टॉवर्समध्ये तो गणला जातो. हजार फ़ूट उंचीवरच्या Observation Deck वर नेण्यासाठी चार मोठ्या लिफ़्ट्स होत्या. आम्ही घड्याळ लावून पाहिलं - अक्षरशः एका मिनिटाच्या अवधीत आम्ही ती उंची गाठली होती!!
नावाप्रमाणेच आसपासचा परिसर न्याहाळण्याची ती जागा होती. चहूबाजूंना काचेच्याच भिंती होत्या. खाली विस्तीर्ण पसरलेलं शहर दिसत होतं.... आणि समोरच जणू एखादी शेजारची इमारत दिसावी तसे 'पेट्रोनास ट्विन टॉवर्स' दिसत होते. अगदी जवळ - शंभर पट Zoom-in केल्यासारखे!!! त्यांचं धातूचं बाह्य चंदेरी आवरण उन्हात चमचम करत होतं. त्यांच्यासमोर इतर उत्तुंग इमारती खुज्या वाटत होत्या.
अर्धा तास तिथे होतो, बरंच काही डोळ्यांत साठवायचा प्रयत्न केला. पण हळुहळू, त्या हजार फ़ूट उंचीवरसुध्दा पोटात भुकेमुळे तेवढाच खोल खड्डा पडायला सुरूवात झाली होती. तुम्ही हजार फ़ूट उंचीवर असा किंवा जमिनीखालच्या एखाद्या खोल खाणीत असा ... शरीराचं घड्याळ टिकटिक करत भुकेच्या, झोपेच्या वेळांची जाणीव करून देण्याचं थांबवत नाही!

त्या टॉवरच्या तळमजल्यावरच्या रेस्तरॉंमध्ये जेवण होतं. मिनिटभराच्या आत लिफ़्टनं पुन्हा 'जमिनीवर' आलो. रेस्तरॉ रिकामं होतं आणि गरमागरम जेवण आमची वाट बघत होतं. जोडीला कांदा-भजी, गोडाचा शिरा आणि मुख्य म्हणजे दही होतं मस्तपैकी!! सगळ्यांनी आडवा हात मारला ते सांगायला नकोच - विशेषतः शिऱ्याचं भांडं तर पटापट रिकामं होत होतं.

जेवणानंतर निघालो. पेट्रोनास टॉवर्सपाशी फक्त फ़ोटो काढायला थांबायचं होतं. दरम्यान ढग भरून आले होते आणि भुरभूर पाऊस पडायला सुरूवात झाली होती ..... चुटपुट क्र. तीन!! पावसात फ़ोटो काढायला बसमधून उतरावं की नाही ते ठरेना थोडा वेळ. मी आणि अजय उतरलोच शेवटी आणि तेच बरं झालं, नाहीतर इतर उतरलेल्या लोकांनी काढलेले फ़ोटो नंतर पाहून 'चुटपुट क्र. चार' व्हायला वेळ लागला नसता.... कसेबसे १-२ फ़ोटो काढले घाईघाईत आणि फार भिजायच्या आत पळत पुन्हा बसमध्ये चढलो. निरनिराळ्या कोनांतून त्या टॉवर्सची उंची टिपायची इच्छा मात्र अपूर्णच राहिली....
त्या दोन्ही टॉवर्सच्या ४१व्या आणि ४२व्या मजल्यांना जोडणारा एक पूल आहे. पर्यटकांना तिकीट काढून त्या पुलापर्यंत जाता येतं आणि त्यासाठी पहाटेपासून लोकांच्या रांगा लागतात असं कळलं. सांगायचा मुद्दा म्हणजे काही मिनिटांपूर्वी 'चुटपुट क्र. चार' टाळल्याच्या माझ्या आनंदावर ताबडतोब विरजण पडलं होतं....

भुरभुरणाऱ्या पावसातून बसमधूनच गाईडनं 'हायकोर्ट, ब्रिटीशकालीन फ़ुटबॉल मैदान' इ. २-३ ठिकाणं दाखवली. बस जसजशी वळणं घेत होती तसतसे ते ट्विन टॉवर्स कधी उजवीकडे, कधी डावीकडे, कधी मागे, कधी समोर असे दिसतच राहिले.

आता पाऊस थांबला होता. आम्हाला उतरायचं होतं एक चिनी देऊळ पहायला. पुन्हा एकदा, त्या देवळाची रंगसंगती, वास्तुरचना सगळंच वेगळं आणि बघण्यासारखं होतं. चिनी-जपानी घरांची छपरं, देवळांचे कळस दोन्ही टोकांना कुत्र्याच्या शेपटीसारखे गुंडाळलेले दिसतात. ते आकार मला फार आवडतात.... आणि त्यात वापरलेला भगवा आणि हिरवा रंग सुध्दा. आपल्या देवळांत देवाच्या पायाशी तुळशीपत्रं, बिल्वपत्रांच्या रुपात हिरवा रंग असतो, डोक्यावर शेंदराचा भगवा रंग असतो - तिथे देवळाच्या कळसावरच हे दोन्ही रंग विराजमान झालेले होते.
लांबवर पुन्हा ट्विन टॉवर्स नजरेस पडले. आयफ़ेल टॉवरचं वर्णन करताना पु. लं. नी 'अपूर्वाई'त लिहिलंय की पुण्यात जशी पर्वती कुठूनही दिसते तसाच आयफ़ेल टॉवर पॅरिसमध्ये कुठूनही दिसतो. त्याप्रमाणेच पेट्रोनास ट्विन टॉवर्स क्वालालंपूरमध्ये कुठूनही दिसतात!
चिनी देवदर्शनानंतर मलाय राजप्रासाददर्शन होतं... पण फक्त बाहेरूनच. राजवाडा म्हटला की तो भव्य, सुंदर, स्वच्छ असायचाच - तसाच तो ही होता. आत प्रवेश नसल्यामुळे यापलिकडे त्याबद्दल काही कळू शकलं नाही.

.... 'क्वालालंपूर दर्शन' संपलेलं होतं. आता हॉटेलवर परतायची वेळ झालेली होती. पण 'हॉटेलवर परतायचं' म्हणायला आम्ही अजून आमचं तिथलं हॉटेल कुठे पाहिलं होतं. लगेच उत्सुकता जागी झाली - इथलं हॉटेल कसं असेल, आधीच्या सगळ्या हॉटेल्ससारखंच की त्यांपेक्षा जास्त चांगलं असेल वगैरे, वगैरे. जास्त विचार करावा लागला नाही, ५-१० मिनिटांत बस Hotel Pearl International च्या आवारात शिरलीच.

प्रथमदर्शनी हॉटेल एकदम झकास वाटलं. खोल्या ताब्यात मिळायला जवळजवळ अर्धा-पाऊण तास लागला. दिवसभराच्या दगदगीपायी तो वेळ थोडा कंटाळवाणा गेला, शिवाय 'अजून फक्त २ दिवस, मग परतायचंय' याचीही प्रथमच जाणीव झाली पण 'खोल्या १७ व्या मजल्यावर आहेत' हे कळल्यावर पुन्हा एकदा अंगात उत्साह संचारला. लिफ़्टनं वर जाताना कळलं की पाचव्या मजल्यावर पोहण्याचा तलाव होता. आदित्यला एकदम आठवलं की गेल्या ४-५ दिवसांत त्यानं पाण्यात डुबक्या मारल्याच नव्हत्या. लगेच त्याची भुणभुण सुरू झाली. वर जाऊन सामान ठेवलं आणि आधी साहजिकच खिडक्यांचे पडदे सारले. हिरवे डोंगर, उत्तुंग इमारती, वाहनांनी भरून वाहणारे रस्ते, मावळतीला आलेला सूर्य अशी सगळी सरमिसळ दिसली. त्यात वेगळं काही नव्हतं, फक्त Bird's Eye View मिळाला सगळ्याचा आणि खरं नाविन्य त्यातच होतं. शिवाय उजवीकडे लांबवर दोन बारीक रेषांप्रमाणे भासणारे ट्विन टॉवर्स होतेच सोबतीला!! मी त्या खिडकीत बसून माझी आवडती वाफाळती कॉफ़ी प्यायले. सतराव्या मजल्यावरची खिडकी आणि हातात कॉफ़ीचा कप ... त्यादिवशी त्या कॉफ़ीनं काही निराळीच मजा आणली!!
इकडे आदित्यला खाली पाचव्या मजल्यावरचा पोहोण्याचा तलाव खिडकीतून जास्तच खुणावायला लागला होता. आता त्याच्याबरोबर जाणं भाग होतं.
तासभर पाण्यात डुबक्या मारून झाल्यावर त्याला बाहेर काढलं. तसंही संध्याकाळचे सात म्हणजे तलाव बंद होण्याची वेळ झालेलीच होती. रात्रीच्या जेवणाचं ठिकाण हॉटेलपासून थोडं लांब होतं. त्यामुळे आम्ही साडेसातलाच निघालो. त्यादिवशी प्रथमच जेवणाबरोबर ग्लासभर ताक मिळालं. त्यामुळे मजा आली जेवायला. चारही देशांपैकी फक्त मलेशियातच आम्हाला ताकदह्याचं दर्शन घडलं....

साडेदहा वाजून गेले होते. हॉटेलवर परतलो. आता रात्रीच्या अंधारात ट्विन टॉवर्सच्या त्या दोन रेषा पिवळ्या दिव्यांनी झगमगत होत्या. रस्ते अजूनही वाहतच होते. ते वाहणारे रस्ते त्या खिडकीतून बघायला इतके का छान वाटत होते ते तेव्हा माझ्या लक्षात आलं - धावणारी वाहनं दिसत होती, त्यांचे लाल-पिवळे दिवे दिसत होते पण कर्णकर्कश्श हॉर्न्स कानावर आदळत नव्हते की पेट्रोलचा, धुराचा वास नाकात शिरत नव्हता. सतरा मजल्यांच्या उंचीनं ट्रॅफ़िकसारख्या एका डोकं उठवणाऱ्या गोष्टीचं एका मनमोहक दृश्यात रुपांतर केलं होतं. तो तसा मनमोहक(!) ट्रॅफ़िक मी बराच वेळ न्याहाळत बसले होते.

.... पण त्या सगळ्यावर बोळा फिरवणारी गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळीच ते हॉटेल आम्हाला सोडायचं होतं!!! सर्वात आवडलेल्या हॉटेलमध्ये आमचं सर्वात कमी वास्तव्य होतं. एकाच दिवसात चुटपुटींचा आकडा तीननं वाढला होता ....!!!

१ नोव्हेंबर - बारावा दिवसथीम-पार्कमध्ये एक दिवस ...


आदल्या दिवशी आम्ही 'गेंटींग हायलंड'ला पोचलो तोवर रात्र झालेली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी उठल्यावर आधी खिडकीतून बाहेरचं दृश्य बघितल्याशिवाय मला करमलंच नसतं. सकाळची वेळ, सूर्याची कोवळी किरणं, थंडी, धुकं, हिरव्या डोंगरदऱ्या यांच्या मिश्रणातून जे तयार होतं ना त्याला केवळ 'लाजवाब' हाच एक शब्द योग्य आहे - मग जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा! त्यावेळची ती गार, ताजी-ताजी हवा नाकात भरून घ्यायला मला फार आवडते.
आमच्या खोलीच्या खिडकीतून हॉटेलचा परिसर दिसत होता. तिथली बाग, रस्ते काही अंतरानंतर धुक्यात हरवून गेलेले होते. लांबवर तर डोंगरसुध्दा धुक्यामुळे पांघरूणात गुरफटून झोपल्यासारखे वाटत होते.आमच्यापैकी एक-दोन काका बागेतल्या रस्त्यावरून फिरायला निघालेले दिसले. मला हे कसं सुचलं नाही कोण जाणे. खरंतर मला पहाटे लवकर उठणं अजिबात जमत नाही आणि आवडतही नाही. पण अश्या काही मोजक्या कारणांसाठी मात्र मी पहाटे उठायला सुध्दा एका पायावर तयार असते. सकाळी फिरायला जाण्याचा बेत दुसऱ्या दिवशी अमलात आणायचा ठरवला आणि तो आईला सांगायला घाईघाईने तिच्या खोलीत गेले. ती माझी वाटच पाहत होती कारण तिच्या खोलीच्या खिडकीतून दिसणारं दृश्य तिला मला दाखवायचं होतं. मी सुध्दा अगदी जोरात 'हो, मी पण पाहिलं सकाळी उठल्याउठल्या ...' असा भाव मारत पडदे सारले और मेरी तो बोलती ही बंद हो गयी कारण मी जे आधी पाहिलं होतं ते यापुढे काहीच नव्हतं!! इथे हॉटेलचा परिसर, रस्ते-बिस्ते काही नाही .... नजर जाईल तिकडे पामवृक्षांच्या काळपट-हिरव्या रंगात रंगलेल्या डोंगररांगा आणि सूर्याच्या कोवळ्या उन्हात विलक्षण रंगसंगती साधत तरंगणारा धुक्याचा शुभ्र कापूस .... बस्स!! त्याच धुक्याच्या मागे आदल्या दिवशी भयाण वाटलेलं ते जंगल पसरलेलं होतं हे सांगूनही कुणाला खरं वाटलं नसतं. बऱ्याच वर्षांनी दिवसाची अशी अप्रतिम सुरूवात झाली होती. कारण, इथे वापीत राहून असं धुकं-बिकं सगळं विसरायलाच झालंय आता....

पण आदित्यच्या दृष्टीने मात्र दिवसाची सुरूवात 'डोकं पकवणारी' झाली होती. तो सबंध दिवस आम्हाला तिथल्या थीम-पार्क मध्ये घालवायचा होता. साहजिकच त्यादिवशी सकाळी उठल्यावर सर्वात पहिलं कोण तयार झालं असेल तर आदित्य. कधी एकदा त्या थीम-पार्कचे दरवाजे उघडताहेत आणि आत घुसून तो तिथल्या वेगवेगळ्या राईड्सवर उलटापालटा, वरखाली, गोलगोल फिरायला सुरूवात करतोय असं त्याला झालं होतं. नेहेमीप्रमाणे नाश्त्याच्या ठिकाणी तो आमच्याआधी पोचला होता. जरा वेळाने मी तिथे गेले तर याचा चेहेरा पडलेला! समोर सगळे आवडीचे पदार्थ असताना आता हे काय नवीन ते मला कळेना. विचारल्यावर 'पाऊस पडतोय बाहेर' म्हणून माझ्यावरच डाफरला - . मग मला उलगडा झाला. बाहेर पाऊस म्हणजे तो थांबेपर्यंत तरी त्याला तसं उलटंपालटं होता येणार नव्हतं. वर डोकं-खाली पाय अश्याच वर्षानुवर्षांच्या अवस्थेत जमिनीवरच चालावं लागणार होतं. आता ती काही माझी चूक नव्हती. पण त्यानं त्याचा सगळा राग माझ्यावर काढला!!
... हवा किती झपाट्यानं बदलली होती! बोचरा गारवा होता म्हणून, नाहीतर मी आदित्यला घेऊन पावसात भिजायला नक्की गेले असते. पण आता नाईलाजास्तव इकडेतिकडे वेळ काढावा लागणार होता. मग आम्ही सगळेजण त्या रिसॉर्टच्या ४-५ मजल्यांवरून फेरफटका मारून आलो. सगळीकडे शॉपिंग मॉल्स, प्रदर्शनं, तरतऱ्हेच्या वस्तूंची दुकानं, उपहारगृहं अशी सरमिसळ होती. तिथे सुध्दा कुठून आलो, कुठे वळलो, किती मजले चढलो-उतरलो - काही म्हणता काही कळलं नाही. जमिनीच्या वर होतो की खाली ते ही लक्षात आलं नाही. 'तिथून पुन्हा आपापल्या खोल्यांपाशी परत जा' असं सांगितलं असतं तर कुणालाही ते जमलं नसतं. आमचा गाईड - झॅक - त्याच्यावरच आमची सगळी मदार होती. त्याच्या मागेमागे तिथे तसं फिरण्यात वेळ मात्र मस्त गेला आमचा .... आदित्य सोडून! त्याला एव्हाना 'आयुष्य व्यर्थ' वगैरे वाटायला लागलं होतं!! 'काही अर्थ नाही मलेशियाला येण्यात ...' इतपत विरक्ती पण आलेली होती....उरलासुरला राग काढायला आई होतीच!!! तासाभरानंतर मात्र पावसाला त्याची दया आली. लगेच त्याची कळी खुलली.

थीम-पार्कच्या प्रवेशद्वारापाशी प्रत्येकाच्या मनगटावर एकएक कागदाचा, barcode असलेला पट्टा गुंडाळला गेला. तो त्या पार्कचा Multiple Entry Visa होता. त्याचा अर्थ आदित्यला सांगितल्यावर तो तर नाचायचाच बाकी राहिला होता. कितीही वेळा आतबाहेर करा, कुठल्याही राईड्सवर कितीही वेळा बसा - आता त्याला कुणीही अडवणार नव्हतं - अगदी आईसुध्दा!! बॅंकॉकपासूनच तो जोशी काका-काकू आणि पूर्वाताईबरोबरच असायचा बहुतेकवेळा. त्याची आणि पूर्वाताईची एव्हाना भलतीच गट्टी जमली होती. त्यामुळे त्यादिवशीसुध्दा एकदा त्या थीमपार्कमध्ये शिरल्यावर तो त्यांच्याबरोबर जो गायब झाला माझ्यासमोरून तो थेट रात्री जेवायच्यावेळी पुन्हा भेटला मला. दिवसभर फक्त अधूनमधून कुठेतरी माझ्या दृष्टीस पडायचा, मध्येच कधीतरी त्याची हाक ऐकू यायची नाहीतर आवाज कानावर पडायचा इतकंच!

उच्च रक्तदाबवाल्यांना कुठल्याही राईड्सवर बसायला बंदी होती. त्यामुळे आईची इच्छा असूनही तिला कशात बसता आलं नाही. सासूबाईंना तिथला गारठा सहन झाला नाही. त्यांना थंडी वाजून ताप भरला. त्यामुळे त्या गोळी घेऊन खोलीत झोपून राहिल्या. बाबा मात्र अर्धा दिवस होते आमच्याबरोबर. तो दिवस माझ्या विशेष लक्षात राहिला त्याचं कारण म्हणजे त्या दिवशी मी आयुष्यात प्रथमच 'रोलर कोस्टर' नामक प्रकारात बसले. रोलर कोस्टरचं लहान रूप म्हणता ये‍ईल अशी एक राईड आधी दिसली, त्याच्यापासून सुरूवात करायचं ठरवलं. त्यात बसल्यावर आपल्याला मळमळलं नाही, पोटात ढवळलं नाही हे पाहून माझा उत्साह वाढला. मग मोठ्या रोलर कोस्टरवर बसायचं धाडस केलं. तिथे दोन ठिकाणी ३६० अंशात गिरकी घ्यायची होती. आधी २५-३० फ़ूट उंची गाठेपर्यंत मजा वाटली. पण खालच्या दिशेने जोरात निघाल्यावर मात्र वाट लागली. त्या वेगाचा, अचानक वळणांचा त्रास कमी करायचा असेल तर बेंबीच्या देठापासून जोरजोरात ओरडावं असं मी एकदा कुठेतरी वाचलं होतं. पण हा गृहपाठ न करता जरी मी गेले असते तरी चाललं असतं कारण ऊर्ध्व दिशा बदलून अचानक एका क्षणी जेव्हा आपण खालच्या दिशेनं वजनविरहित अवस्थेत तुफान वेगात निघतो तेव्हा ओरडण्याशिवाय गत्यंतरच नसतं!! त्यात पुन्हा मी माझे डोळेही घट्ट मिटून घेतले होते. मधली ती ३६० अंशाची दोन वळणं येऊन गेलेली आता अंधूक आठवताहेत मला... पण काही सेकंदांनंतर थांबल्यावर मात्र मेंदूत प्रचंड वावटळ येऊन गेल्यासारखं वाटत होतं थोडा वेळ!! पण मी खूष होते. कारण, इतके दिवस ज्या राईड्सकडे नुसतं पाहून मला पोटात ढवळायचं त्यांपैकी एका रोलर कोस्टरसारख्या महारथी राईडमध्ये त्या दिवशी मी चक्क बसले होते, ओरडले होते, हवेत गटांगळ्या खाल्या होत्या, गिरक्या घेतल्या होत्या .... मजा आली, त्रास झाला नाही पण का कोण जाणे, पुन्हा त्यात बसावंसंही वाटलं नाही. मात्र आधी द्विगुणित झालेला माझा उत्साह आता दशगुणित झाला होता. आता जरा आव्हानात्मक, उच्च्पदस्थ राईड्सकडेच माझं लक्ष जायला लागलं. एक Space Shot नामक राईड होती. एका ४०-५० फ़ूट उंच खांबावरून आपण बसलेला पाळणा खूप वेगाने वर खाली होतो. क्षणार्धात २५-३० फ़ूट वर, क्षणार्धात खाली .... बाकी काही नाही तरी दुपारनंतर त्या राईडमध्ये बसायचंच असं मी ठरवून टाकलं.

मी आणि बाबांनी आदित्यला आग्रह करून Go Carting ला पण नेलं. तो आधी तयार नव्हता - कदाचित चार चाकी गाडी चालवायची होती म्हणून असेल. तिथल्या त्या बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या म्हणजे खऱ्या गाड्यांच्या अगदी हुबेहूब प्रतिकृती होत्या. मारे अगदी F-1 च्या थाटात आम्ही हेलमेट घालून गाडीत बसलो, सीट-बेल्ट्स लावले ... आदित्यसाठी तर ते सगळं एकदमच रोमांचकारी होतं. सगळ्यांची पूर्वतयारी होईपर्यंत अगदी शिस्तीत सिग्नलचा लाल दिवा वगैरे चालू होता. तो हिरवा झाल्यावर सगळ्यांच्या अंगात अचानक 'शूमाकर' संचारला. पण त्या भ्रमाचा भोपळाही लगेच फुटला कारण कितीही केलं तरी त्या गाड्यांचा वेग १०-१५ च्या पुढे जातच नव्हता. सुरक्षेच्या दृष्टीनंच तशी तजवीज केलेली असणार म्हणा. १-२ फेऱ्या मारल्यावर मला आणि बाबांना तर कंटाळाच आला पण अर्ध्यातच थांबायला परवानगी नव्हती ... झक्कत त्या ४-५ फेऱ्या पूर्ण कराव्या लागल्या. आदित्यला मात्र खूपच मजा आली....

अर्धा दिवस संपत आला होता. आम्ही इकडेतिकडे भटकत होतो, मध्येच मनात आलं की एखाद्या राईडमध्ये बसत होतो .... त्या राईड्सप्रमाणेच, किंबहुना त्यापेक्षाही जास्त, ते तसं वयाचं, वेळेचं बंधन नसणं त्यादिवशी जास्त भावलं मला. दुपारी दोन वाजता इतरांबरोबर जेवायला जाणं मात्र अपरिहार्य होतं - ते सुध्दा वेळेचं बंधन म्हणून नव्हे तर नंतर एकट्याने गेलो असतो तर रस्ता सापडला नसता म्हणून...!!

जेवणानंतर सगळ्या आजी-आजोबांनी वामकुक्षीला प्राधान्य दिलं आणि आमच्यासारखे मात्र निघाले पुन्हा हुंदडायला. सकाळच्या त्या कोवळ्या किरणांनंतर दिवसभर सूर्य काही दिसला नाही. खूप धुकं होतं, गारठा होता पण तेच बरं होतं. स्वच्छ आकाश आणि कडक ऊन असतं तर मला वाटतं मी पण खोलीत बसून राहणं पसंत केलं असतं. लांबून Space Shot खुणावत होतं पण भरल्यापोटी लगेच कसं काय बसणार त्यात! मग एका निवांत ट्रेनमधून एक मोठी फेरी मारली, तिथल्या 'ग्रीन हाऊस'मध्ये पानं-फुलं बघत थोडा वेळ काढला. एका दुकानातून कॉफ़ीचा वास दरवळत आला. मग मस्त वाफाळती कॉफ़ी प्यायलो. तिथेच मक्याचे उकडलेले दाणे पण मिळाले गरमागरम. मजा आली ते पण खायला ...
अचानक वारा खूप जोरात वाहायला लागला, धुकं अजून दाटदाट व्हायला लागलं, गारठ्याचा बोचरेपणा अजूनच वाढला आणि एकएक करत सगळ्या राईड्स अपुऱ्या प्रकाशामुळे आणि धुक्यामुळे बंद झाल्या!!! नंतर सहा वाजेपर्यंत वाट पाहिली पण एकदोन अपवाद वगळता त्या पुन्हा सुरू नाही झाल्या. Space Shot मध्ये बसण्यासाठी एकवटलेला धीर सरळसरळ वाया गेला...!! पण आता त्याला काही इलाज नव्हता.

संध्याकाळनंतर तिथला 'कॅसिनो' बघायला जायचं होतं. वयोमर्यादा आणि वेशभूषा मर्यादा यांमुळे आदित्य आणि अजय दोघंही तिथे येऊ शकले नाहीत. पुरुषांसाठी लांब बाह्यांचा शर्ट आणि पॅंट घालणं आवश्यक होतं. तसा शर्ट नव्हता म्हणून अजय आणि १२ वर्षांखालील मुलांना आत प्रवेश नव्हता म्हणून आदित्य...!! वयोमर्यादा समजण्यासारखी होती पण जुगारच खेळायचा तर लांब बाह्या काय आणि अर्धी चड्डी काय - काय फरक पडणार होता कोण जाणे!! त्या दोन अटींत बसणारे इतर सगळे मग त्या कॅसिनोतून फिरून आलो. मला स्वतःला सुध्दा त्यात विशेष स्वारस्य होतं अशातला भाग नाही पण 'नाहीतर अश्याठिकाणी आपण जायची वेळ तरी कधी येणार' या शुध्द हेतूनं मी तिथे गेले होते.
तो जगातला सर्वात मोठा कॅसिनो आहे. दूरदेशातले लोक गेटींग हायलंडला केवळ त्या कॅसिनोसाठी येतात असं कळलं. तीन मजल्यांवरच्या मोठमोठ्या दालनांत निरनिराळ्या प्रकारांचे जुगार अगदी रंगात आले होते. छतावर लटकणारी प्रचंड झुंबरं आणि एकूणच प्रकाशयोजना अप्रतिम होती. उंची दारूचे ग्लास, सिगारेटी, लोकांचे वेष - सगळ्यांतून श्रीमंती नुसती ओसंडून वाहत होती. काहीही शारिरीक कष्ट न करता, बसल्याजागी, केवळ नशिबावर हवाला ठेवून पैसे कमवण्याची माणसाची वृत्ती अजबच म्हणायला हवी. आपल्यासारख्या नोकरी-धंदा करून, दिवसभर खपून भविष्याची चिंता करणाऱ्या मध्यमवर्गीयांना तिथली ती गर्दी पाहून 'आपण मूर्खपणा तर करत नाही आहोत' अशी शंका सुध्दा ये‍ईल कदाचित!! जुगार खेळणाऱ्यांच्यात स्त्रियांची संख्याही लक्षणीय होती. मी एक-दोन टेबलांपाशी थोडा वेळ थांबून इमानदारीत समोर काय चाललंय ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण ओ की ठो कळलं नाही. बरं, सगळे व्यवहार शांतपणे चाललेले. त्यामुळे कानावर पडणाऱ्या शब्दांतून काही आकलन व्हावं तर ते ही नाही!! मला तिथली सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे तिथल्या त्या खोट्या नाण्यांची वर्गवारी करणारी यंत्रं!! त्या यंत्रात नाणी टाकली की क्षणार्धात दुसऱ्या बाजूने त्या-त्या नाण्यांच्या किंमतींप्रमाणे त्यांचे वेगवेगळे गट बनून बाहेर यायचे. तेच पहायला नंतर मला जास्त मजा आली. थोड्या वेळानं मात्र त्या सिगारेटचा धूर भरून राहिलेल्या खोल्यांमध्ये गुदमरल्यासारखं व्हायला लागलं.... 'उंची वातावरणात मध्यमवर्गीयांचा जीव गुदमरतो' हे विधान शब्दशः खरं ठरलेलं पाहून मला हसू आलं!!

रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. पुन्हा एकदा अनेक सरकत्या जिन्यांवरून वर-खाली सरकून रेस्तरॉंपाशी पोचलो. प्रवेशद्वारापाशीच एका भिंतीला लागून अनेक उंच, पारदर्शक बाटल्यांमध्ये मसाल्यांचे निरनिराळे जिन्नस भरून ठेवलेले होते - नुसते देखाव्याला. आदल्या दिवशी जेवायला गेलो तेव्हा तिकडे लक्ष गेलं नव्हतं. एखाद्या रेस्तरॉंच्या अंतर्गत सजावटीचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. बघायला खरंच छान वाटलं.

... मलेशियात येऊनसुध्दा चोवीस तास उलटून गेले होते. प्रामाणिकपणे सांगायचं तर 'एक दिवस थीम पार्कमध्ये' या गोष्टीबद्दल आधी मी म्हणावी तेवढी उत्सुक नव्हते. दिवसभर आदित्य मजा करेल आणि आपल्याला फक्त त्याच्या मागेमागे फिरावं लागेल अशी काहीशी माझी कल्पना होती. पण चोवीस तासांनंतर माझं मत पूर्णपणे बदललेलं होतं. आदित्यच्या बरोबरीनं आम्ही पण तेवढीच धम्माल केली होती....आणि एक गोष्ट नक्की होती - जसा पॅरासेलिंगचा दिवस माझ्या कायम स्मरणात राहणार होता तसाच हा थीम पार्कमधला एक दिवस आदित्य कधीही विसरणार नव्हता....!!!

३१ ऑक्टोबर - अकरावा दिवससेलामत दातांग ... !!!

निघताना हुरहूर लागावी इतकं कोलंबोत राहिलोच नाही. थायलंडमध्ये खरं तर सर्वात जास्त मुक्काम होता. पण थायलंड सोडतानाही तसं काही वाटलं नाही ... एक तर पॅरासेलिंगच्या प्रभावातून मन अजून बाहेर आलं नव्हतं, शिवाय सिंगापूरची उत्सुकता होती. पण त्यादिवशी सिंगापूर सोडताना मात्र प्रथमच मनाला थोडीशी हुरहूर जाणवली. अजून २-३ दिवस तिथे रहायला सगळ्यांना आवडलं असतं. बॅंकॉकच्या रस्त्यांवरची गर्दी, खाद्यपदार्थांचे कसेतरीच, उग्र वास - काहीतरी होतं टीका करण्यासारखं ... पण या देशाने मात्र नावं ठेवायला जागाच सोडली नव्हती!! दोन दिवसांत मुख्य ठिकाणं पाहून झाली तरी इतर ठिकाणं पाहण्याच्या निमित्तानं अजून तिथला वाढीव मुक्काम चालला असता. शिवाय आपल्या सहलीचा अंतिम टप्पा आता जवळ आलाय हे सुध्दा आत कुठेतरी सतत जाणवत होतं.

तरी त्यातल्यात्यात काहीतरी नाविन्य शोधायचं म्हटलं तर होतंच - त्यादिवशी आम्ही मलेशियाला जाणार होतो पण ते विमानानं नाही, तर बसनंच. अकरा-साडेअकराला आवरून खाली आलो. सामान आधीच खाली त्या छोट्या सरकत्या पट्ट्याजवळ जमा झालेलं होतं. सरहद्द ओलांडायची असल्यामुळे त्यादिवशी आमची रोजची बस नव्हती. त्याऐवजी सिंगापूरच्या दोन सरकारी बसेस दिमतीला होत्या. 'सरकारी बसेस असल्यामुळे थोडं जमवून घ्या' असा सौ.शिंदेंचा सबुरीचा सल्ला होता. मनात म्हटलं - जास्तीतजास्त काय होईल? बसच्या खिडक्यांचे पडदे साधे असतील, सीट्स कमी गुबगुबीत असतील, ए.सी. वगैरे विशेष नसेल ....'सिंगापूरची सरकारी बस' ही काय चीज आहे ते सेंटोसाला पाहिलं होतं. त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. आणि तसंच झालं - आपल्या आराम बसच्या पुन्हा एकदा तोंडात मारतील अश्या त्या दोन सरकारी बसेस आल्या. थोडं इकडे आणि थोडं तिकडे असं दोन्ही बसेसमध्ये सगळं सामान चढलं. तितक्यात, चेहेऱ्यावरून मराठी वाटणारे एक गृहस्थ शिंदे पतिपत्नींशी 'काय, कसं काय' करून पूर्वीची ओळख असल्यासारखे गप्पा मारत उभे असलेले दिसले. जरा आश्चर्य वाटलं. मग शिंदेंनी त्यांची ओळख करून दिली. आदल्या दिवशी आम्हाला मस्त पुणेरी, घरगुती जेवण पुरवणारे ते हेच - श्री. आपटे. आदल्या दिवशीचं जेवण कसं वाटलं हे विचारायला ते मुदाम आम्ही निघायच्यावेळी हॉटेलवर आले होते. मूळचे पुण्याचेच, पण गेली ८-१० वर्षं सिंगापूरमध्येच वास्तव्याला असलेले. त्यांचा तिथे तोच व्यवसाय आहे. साधं जेवण, सणासुदीचं जेवण, पूजेचं-मुंजीचं-होम हवनाचं साहित्य ते तिथे राहत असलेल्या भारतीय माणसांना पुरवतात. अगदी चौरंग, जानवी-जोड पासून भटजीपर्यंत सगळं. मनात आलं - एकतर यांनी एखादा भटजी नोकरीला ठेवला असेल किंवा स्वतःच भटजी बनून जात असतील ठिकठिकाणी! कारण चेहेऱ्यावरून पक्के 'ए'कारांत पुणेकर होते पण पक्के व्यावसायिकपण वाटत होते. सिंगापूरला येऊन हा व्यवसाय करावा हे त्यांच्या मनात आलं यातच सगळं आलं. तो त्यांचा व्यवसाय तिथे इतका जोरदार चालण्यामागे सुध्दा मानवी स्वभावधर्मच आहे. आपल्या मूळ घरापासून, गावापासून, प्रदेशापासून लांब राहणाऱ्या लोकांना आपले धार्मिक कुळाचार पाळण्याची जास्त गरज वाटते नेहेमीच. तसं करून ते त्या परमुलखात, वेगळ्या वातावरणात आपला भारतीयपणा, मराठीपणा जपण्याचा प्रयत्न करतात किंवा आपण आपला भारतीयपणा, मराठीपणा जपतोय हे तिथल्या इतर लोकांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करतात .......
तर, त्यादिवशीसुध्दा प्रवासात आम्हाला जेवणाचे डबे मिळणार होते ते त्यांच्याकडूनच. ८-१० दिवस एकाच चवीचं मसालेदार पंजाबी जेवण जेवल्यानंतर दोन दिवस ते घरगुती जेवण म्हणजे खरंच एक सुखद आश्चर्याचा धक्का होता. तसंही, केवळ दोन दिवसांच्या वास्तव्यातच सिंगापूरने तरी दुसरं काय केलं होतं? निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या पध्दतीने आम्हाला सुखद आश्चर्याचे धक्केच तर दिले होते. 'जीवन में एक बार आना सिंगापूर ...' हे अगदी खरं होतं!!! फक्त, ती ओळ अजून थोडी सुधारावीशी वाटली - 'जीवन में किमान आठवडाभर आना सिंगापूर'!!!
दोन दिवस तिथे सूर्यदर्शन झालेलं नव्हतं पण निघायच्या दिवशी मात्र सिंगापूरचा सूर्य पण आला निरोप द्यायला. निघाल्यावर साधारण अर्ध्या तासाने सिंगापूरच्या सीमेजवळ उतरलो. आमच्याबरोबरच आमचं सामानपण खाली उतरवण्यात आलं. आपापलं सामान घेऊन इमिग्रेशनच्या ऑफ़िसमध्ये जायचं होतं. म्हणजे प्रक्रिया सगळी विमानतळासारखीच, प्रवास फक्त बसचा होता. सुदैवाने गर्दी वगैरे काही नव्हती. शिवाय 'चार तास आधी चेक-इन' ही भानगड नव्हती. आमच्या गृपपैकी एका काकूंचा 'मलेशिया व्हिसा' मिळाला नव्हता. ते काम होतं. पण सगळंच पटापट आणि थोडक्यात उरकलं. त्या ऑफ़िसमधून सगळे बाहेर आलो. आता पुढच्या प्रवासासाठी मलेशियाच्या दोन बसेस उभ्या होत्या. त्या बसेसही एखाद्या विमानाच्या 'बिझिनेस क्लास'च्या तोंडात मारतील अश्या होत्या - एकदम ऐसपैस आणि मस्त!! चला, म्हणजे आता पुढचा ४-६ तासांचा प्रवास एकदम आरामात होणार होता.

पुण्याहून मुंबईला जावं इतक्या सहजतेने आम्ही सिंगापूरहून मलेशियाला चाललो होतो. सिंगापूर, मलेशिया हे पूर्व आशियातले देश आहेत यापलिकडे त्यांच्या भौगोलिक स्थितीकडे आपण विशेष लक्ष देत नाही. नकाशा नीट बघितला तर लक्षात येतं की हे दोन्ही शेजारी देश आहेत. मध्ये एक खाडी आहे म्हणून नाहीतर त्यांचे भूभाग पण एकमेकांना जोडले गेले असते. खाडीवरचा एक-दीड कि.मी. लांबीचा पूल हा त्यांच्यातला एकमेव दुवा आहे. तो भलाथोरला पूल म्हणजे स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना होता पण त्याचं नाव मात्र अगदी साधं - नुसतं 'कॉज-वे'!!! बांधकाम सुरू असलेल्या आपल्या 'वरळी-वांद्रे सागरी मार्गा'चं मला कोण कौतुक, नाव पण किती छान, घसघशीत - वरळी-वांद्रे सागरी मार्ग! आणि हा पूल त्याच्या कितीतरी आधी बनलेला, तेव्हा कदाचित सामान्य माणसाला जास्त नवलाईचा वाटला असणार. त्याला एखादं भारदस्त नाव शोभून दिसलं असतं!! 'कॉज-वे' म्हणजे माझ्या डोळ्यासमोर एखादा अरुंद, अगदी पाण्याजवळून नेणारा रस्ता आला होता.
असा तो 'कॉज-वे' ओलांडून आता आम्ही अजून एका नव्या देशात प्रवेश केला होता. मलेशियात प्रवेश केल्यावर आणि 'क्वालालंपूर - १७० कि.मी.' अश्या प्रकारच्या पाट्या दिसायला लागल्यावर मात्र सकाळची ती हुरहूर केव्हा मागे पडली ते कळलंही नाही. इथे घड्याळांतली वेळ बदलायचा वगैरे प्रश्न नव्हता - साधारण एकाच रेखावृत्तावर दोन्ही देश आहेत. मग रस्त्यावरच्या पाट्या वाचायला सुरूवात केली. पाट्यांवरची लिपी इंग्रजी पण भाषा मलाय होती. पण ते जरा बरं वाटलं. अर्थ नाही कळला तरी निदान शब्द तरी कळत होते; अगदीच थायलंडसारखी निरक्षराची गत नव्हती. ज्या ठिकाणी त्या पाट्या असायच्या त्यावरून अर्थाचा साधारण अंदाज बांधता यायचा.रस्ता एकदम निर्मनुष्य होता. मध्येच एखाददुसरी गाडी दिसत होती. विशेष म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मैलोगणती पामच्या झाडांची लागवड होती. मलेशियात प्रवेश केल्याकेल्या लगेचच त्या देशाचं वैशिष्ट्य म्हणून असलेली एक गोष्ट पहायला मिळाली आणि सिंगापूरप्रमाणेच मी मलेशियाच्या प्रथमदर्शनी प्रेमात पडले. रस्त्याला लागून पामची झाडं, थोड्या दूरवरपण पामची झाडं आणि लांबवर दिसणाऱ्या उंच डोंगरांवर पण पामचीच झाडं!! ते बघायला फारच छान वाटत होतं - अगदी डोळ्यांचं पारणं फिटावं इतकं! काही वेळापूर्वी ती ऐसपैस बस पाहिल्यावर खरंतर मी एक मस्तपैकी झोप काढायचं ठरवलं होतं. पण त्या सुंदर पामच्या बागांनी माझी झोप कुठल्याकुठे पळवून लावली. तासाभरानंतर मुख्य रस्त्यावरून बस डावीकडे वळली. एके ठिकाणी १०-१५ मिनिटं थांबायचं होतं पाय मोकळे करायला. पामने मढलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्याश्या हॉटेलपाशी उतरलो. तिथे नुकताच पाऊस पडून गेला होता. ढगाळ, दमट हवा होती. तिथल्या स्वच्छतागृहांवर 'lelaki' आणि 'wanita' अश्या पाट्या दिसल्या. लगेच लक्षात आलं की मलाय भाषेत 'पुरुष' आणि 'स्त्री' साठी अनुक्रमे 'lelaki' आणि 'wanita' हे शब्द आहेत. अर्थ कळल्यामुळे जाम आनंद झाला. पुढच्या दोन दिवसात मग मला तो नादच लागला - पाट्या वाचायच्या आणि त्याचा अर्थ काय असेल त्याचा अंदाज बांधत बसायचं. १५-२० मिनिटांत सगळे ’लेलाकी’ आणि ’वनिता’ पुन्हा बसमध्ये चढले आणि तिथून निघाले.
पुन्हा तासभर प्रवास आणि पुन्हा एका ठिकाणी जेवणासाठी थांबलो. आपापले डबे घेऊन तिथल्या रेस्तरॉंमध्ये शिरलो. आत शिरताक्षणी एक अत्यंत उग्र, कसातरीच वास नाकात शिरला. इतरवेळी अश्या वासाच्या ठिकाणी जेवणाची कल्पनाही सहन झाली नसती. पण त्या दिवशी नाईलाज होता. पामच्या झाडांप्रमाणेच या वासानेही पुढे दोन दिवस आमची पाठ सोडली नाही ... कारण तो वास पाम तेलाचाच होता!! इतक्या सुंदर झाडांच्या बियांपासून इतक्या घाणेरड्या वासाचं तेल निघतं?? अर्थात हा सवयीचा भाग होता. ज्या तेलाच्या वासाला मी नाकं मुरडत होते त्याच तेलात बनवलेले कसलेकसले पदार्थ तिथले लोक मिटक्या मारत खात होते. त्या लोकांच्या ताटांत आणि एकूणच तिथल्या काचेच्या कपाटांत जे-जे काही मांडून, टांगून, पसरून ठेवलेलं होतं ना ते शिसारी आणणारं होतं. नंतरच्या दोन दिवसांत मलाय पदार्थ चाखून पाहण्याची माझी इच्छा केव्हाच मेली होती. या सगळ्या पूर्व आशियाई राष्ट्रांत शाकाहारी माणसं फारच थोडी सापडतात आणि त्यांचा मांसाहार हा आपल्या कल्पनेपलिकडचा असतो. ते तसले पदार्थ तोंडात घालणं तर सोडाच, नुसते बघण्यासाठी पण मनाची बरीच तयारी करावी लागते.
आमचं जेवण चालू असतानाच तिथे एक मलाय कुटुंब आलं. त्यांतल्या ८-१० वर्षांच्या एका खट्याळ पोरानं आमच्या डब्यांत वाकून पाहिलं आणि जसं मी नाक मुरडलं होतं तसंच त्यानं आमच्या पुरी-भाजी, गुलाबजाम, दही-भात या जेवणाकडे बघून तोंड वाकडं केलं. तिथल्या तिथे फिट्टमफाट!! इतरही अनेक लोक आमच्या जेवणाकडे वळूनवळून पाहत होते. कदाचित मस्त, सुग्रास खेकड्याचं कालवण खाताना गोडेतेलाचा 'घाणेरडा वास' त्यांच्या नाकात शिरला असेल आणि त्यांच्या जेवणाची मजाच गेली असेल ...
दुसऱ्या बसमध्ये एक टूरिस्ट गाईड होती. तिने दिलेली प्राथमिक माहिती आमच्या सहप्रवाश्यांकडून कळली. मलाय भाषेत स्वागत करायचे असेल तर 'selamat datang' असं म्हणतात. ही अक्षरं तिथे हॉटेलमध्येही दिसली होती.
सकाळच्या प्रवासात मंडळींची एकएक डुलकी झालेली होती, आता जेवणंही झाली होती. तिथून निघाल्यावर मग बसमध्ये गाणी, गप्पा, जोक्स, नकला सुरू झाल्या. तो तास-दीड तास मजेत गेला.
संध्याकाळी क्वालालंपूर शहरात पोहोचलो. डावीकडच्या खिडकीतून लांबवर पेट्रोनास ट्विन टॉवर्स दिसले. मलेशियातली तेवढी एकच गोष्ट फक्त माहित होती, त्यामुळे सगळे 'बघू, बघू' करत डाव्या बाजूच्या खिडक्यांतून डोकावून पहायला लागले आणि एखादी नवलाईची गोष्ट सापडावी तसे खूष झाले. ते टॉवर्स पुढच्या दोन दिवसांत सतत दिसतच राहिले. जरा इकडे-तिकडे नजर वळवली की कुठेनाकुठेतरी दिसायचेच. पण त्या क्षणी ते माहिती नव्हतं. त्यामुळे आयुष्यातली ती जणू एक मोलाची संधी दवडण्याची कुणाची तयारी नव्हती.
त्यादिवशी आम्हाला क्वालालंपूरहून पुढे 'गेंटींग हायलंड'ला जायचं होतं. 'गेंटींग हायलंड' - तिथलं एक प्रसिध्द थंड हवेचं ठिकाण - मलेशियाचं महाबळेश्वर!! क्वालालंपूर शहरात न शिरता बसने घाटरस्ता पकडला. जसजशी हवा गार-गार होत गेली, ढग-धुकं वाढायला लागलं, तसतसे ते पाम पांघरून बसलेले डोंगर अजूनच छान दिसायला लागले. वळणावळणाचा रस्ता पोटातल्या पाण्यात ढवळाढवळ करणार अशी लक्षणं दिसायला लागली होती. माझं पाट्या वाचण्याचं काम सुरूच होतं. त्या रस्त्यावर सतत 'ikut kiri' अशी एक पाटी दिसत होती. २-३ दिवसांच्या संशोधना‍अंती त्याचा अर्थ 'Keep left' आहे असं लक्षात आलं. रंगरूप बदललं, देश-वेष बदलला तरी रहदारीच्या नियमांसारख्या काही गोष्टी लोकांच्या मनावर सतत बिंबवाव्याच लागतात. त्या बाबतीत जगभर एकवाक्यता दिसून येईल ... आणि त्या सतत बिंबवल्या जाणाऱ्या नियमांकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीतही!!
'गेंटींग हायलंड'च्या पायथ्यापाशी उतरलो तेव्हा दिवस पूर्णपणे बुडालेला होता. हवेत बोचरा गारवा होता. काहीजणांनी आपापले स्वेटर्स वगैरे बाहेर काढले. पुणेकरांचा गुलाबी थंडीबद्दलचा 'जाज्वल्य अभिमान' लगेच उफाळून आला. 'स्वेटर घातलेले सगळे मुंबईकर, न घातलेले सगळे पुणेकर' अशी थट्टा सुरू झाली. मुंबईकरांना नावं ठेवण्याची अशी नामी संधी पुणेकर थोडीच सोडणार होते ....
त्या पायथ्यापासून आम्हाला केबल कारने वर 'गेंटींग हायलंड'ला जायचं होतं. ती आशिया खंडातली सर्वात मोठी केबल कार समजली जाते. गुडुप अंधारात, त्या एकमेव केबलच्या भरवश्यावर आमच्या निरनिराळ्या केबिन्सची वरात २००० मी. उंचीवरच्या त्या डोंगराच्या दिशेने निघाली. खाली उंचच्या उंच पर्जन्यवृक्षांचं निबिड अरण्य मिट्ट काळोखात एकदम भयाण वाटत होतं. 'Rain-forests of Malaysia ...' हे शब्द डिस्कवरीवरच्या कार्यक्रमांत अनेकदा ऐकले होते - तेच हे मलेशियातलं जगप्रसिध्द, घनदाट पर्जन्यवन. केबलला आधार देणाऱ्या मोठ्या खांबांजवळ तेवढा एखादा मिणमिणता दिवा असायचा. बाकी संपूर्ण अंधाराचं साम्राज्य होतं. अश्या ठिकाणी 'अचानक वीज गेली तर ...', 'काही बिघाड झाला तर ...' असल्या शंका हटकून मनात येतातच. केबिन्सच्या आतल्या बाजूला सुरक्षाविषयक सगळे नियम आणि सूचना लिहिलेल्या होत्या त्या आधी वाचून काढल्या. आदित्यला समजावून सांगितल्या. भीती अशी वाटत नव्हती पण नाही म्हटलं तरी अंधाराचा मनावर थोडा परिणाम झालेलाच होता. पण त्याबरोबरच हा प्रवास दिवसाउजेडी करायला तितकीच मजा येईल हे ही कळत होतं.
निसर्गावर मात करणं माणसाला कदापि शक्य नाही हे अश्या वेळेला पटतं. घनदाट जंगलातून उंच डोंगरावर सहजगत्या पोचण्यासाठी एक अत्याधुनिक वाहतुकीचं साधन उपलब्ध करणं म्हणजे कौशल्याचं काम होतं हे खरंच! माणसाच्या मेंदूला तिथे दाद ही दिलीच पाहिजे. पण म्हणून केवळ त्या बुध्दीच्या जोरावर निसर्गावर कुरघोडी करायचा कुणी आव आणत असेल तर निसर्ग त्याला अश्या ठिकाणी बरोब्बर त्याची जागा दाखवून देतो. शारीरिक इजा पोहोचू नये म्हणून खबरदारीचे अनेक उपाय योजता येतात पण त्या जीवघेण्या शांततेत, काळोखात बुडलेल्या दाट जंगलात हे पण कळून चुकतं की माणूस हा त्या सर्वशक्तिमान निसर्गाच्या दृष्टीने इतर किडा-मुंग्यांसारखाच!!
त्या अर्ध्या तासात मध्ये काही काळ तर असा होता की मागचं दिसेनासं झालं होतं आणि पुढची लोकवस्तीची चिन्हं दिसायला अजून वेळ होता. त्या अंधाराच्या साम्राज्याच्या दोन्ही टोकांना मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे हे सांगूनही कुणाला पटलं नसतं. थोड्या वेळानंतर वर लांबवर दिवे लुकलुकायला लागले. ३०-३५ मिनिटं ती तशी लटकत मार्गक्रमणा केल्यावर आम्ही उतरलो.
एखाद्या पर्यटनस्थळी जशी संध्याकाळच्या वेळी माणसांची गजबज, दिव्यांची रोषणाई वगैरे असते तशीच तिथे होती. हॉटेलच्या खोल्या ताब्यात घेतल्या, सामान टाकलं आणि जेवणासाठी पुन्हा बाहेर एकत्र जमलो. जेवणाचं ठिकाण तिथून थोडं लांब होतं. म्हणजे त्याच परिसरात होतं पण चालत जायला १५-२० मि. लागायची. आणि ते चालत जाणं म्हणजे सुध्दा प्रत्यक्ष चालणं कमी आणि सरकत्या जिन्यांवरून वर-खाली करणं जास्त होतं. त्या रिसॉर्टचे जमिनीखाली आणि वर मिळून जवळजवळ १२-१५ मजले होते. जेवणाचं ठिकाण सातव्या मजल्यावर होतं. आता तो सातवा मजला म्हणजे सुध्दा एकूणातला सातवा की जमिनीवरचा सातवा की जमिनीखालचा सातवा हे शेवटपर्यंत कळलं नाही. पण जवळजवळ ६-७ सरकत्या जिन्यांवरून सरकून (वर की खाली ते ही आता आठवत नाहीये!!) गेल्यावर आम्ही त्या जेवायच्या ठिकाणी पोहोचायचो. माझी तर दरवेळी त्या सरकत्या जिन्यांची मोजदाद चुकायची. पु.लं.च्या 'वाऱ्यावरची वरात' मध्ये कसा तो 'गरूडछाप तपकीर'वाला पु.लं.ना सांगतो - 'दोन डोंगर चढायचे, दोन उतरायचे - पायथ्याशी गावडेवाडी' तसंच काहीसं होतं तिथे - ४-६ सरकते जिने चढायचे, ७-८ उतरायचे, पायथ्याशी जेवण!! काय गंमत आहे ना ... कुठल्याही प्रसंगाचं वर्णन करताना पु.लं.ची आठवण हमखास येतेच. त्यांची कुठली ना कुठली तरी शाब्दिक कोटी, कुठला ना कुठला तरी विनोद त्या प्रसंगात चपखल बसतोच. मलेशिया हा जेव्हा अजून मलेशिया झालेला नव्हता तेव्हाचाही - पु.लं.च्या 'पूर्वरंग'तून माहिती होताच की!! म्हणजे मलाय देश आणि पु.ल. ही जोडी अगदीच विजोड नव्हती ...

रात्री १० च्या सुमाराला हॉटेलवर परतलो. घरातून निघाल्यापासून प्रथमच जरा सुखद थंडी अनुभवायला मिळत होती. ट्रीपला जायचं ठरल्यावर ती ठिकाणं थंड हवेची नाहीत म्हणून आदित्य सुरूवातीला थोडा खजील झाला होता. तो त्या थंडीमुळे जरा खूष झाला. त्याला आता दुसऱ्या दिवसाची उत्सुकता लागून राहिली होती कारण तिथला दुसरा दिवस हा त्याच्या वयाच्या मुलांच्या खास आकर्षणाचा असणार होता.
चार भिंतींतल्या सुरक्षित अंधारात सगळे झोपेच्या अधीन झाले. हा अंधार आणि काही तासांपूर्वीचा तो जंगलातला भयाण अंधार - दोन्हीत किती फरक होता .... !!!

३० ऑक्टोबर - दहावा दिवस


तिसऱ्या रानडुकराची आरोळी.


रोज सकाळी नाश्त्याच्या हॉलमध्ये शिरताना दारात आपला 'रूम नं.' सांगावा लागायचा. कोलंबो, पट्टाया आणि बॅंकॉक नंतरचं हे चौथं हॉटेल होतं. दर दोन दिवसांनी त्या-त्या ठिकाणचे नवीन क्रमांक लक्षात ठेवायचे म्हणजे भलतंच कठीण काम होतं. त्यादिवशी पण मी नाश्त्याला एकटीच खाली आले आणि नंबर विचारला गेल्यावर एकदम गडबडले. तिथला रूम नंबर सोडून आधीचे सगळे आठवले पण जो हवा होता तो आठवेचना !! बरं, 'कार्ड की' असल्यामुळे त्याच्यावरही लिहिलेला नव्हता ... पण अनपेक्षितपणे आदित्य माझ्या मदतीला आला. तो माझ्याआधीच आवरून खाली आला होता आणि त्या हॉलमधे दारासमोरच्याच टेबलवर बसला होता. नेमकं त्याचवेळी त्याचं माझ्याकडे लक्षं गेलं, काय गोंधळ झालाय ते तिथूनच त्याच्या लक्षात आलं आणि बसल्या जागेवरूनच तो ओरडला - 'आईऽऽऽ, ९७८' .... मी एकदम चमकून आत पाहिलं. तोपर्यंत मला पत्ताच नव्हता की तो तिथे आहे आणि आपल्याकडेच पाहतोय. '९७८' हे शब्द मेंदूपर्यंत पोचायला जरा वेळ लागला आणि मग माझी ट्यूब पेटली. हे सगळं अक्षरशः काही सेकंदांतच घडलं पण नंतर आम्हाला दोघांनाही आठवून हसू येत होतं.

नाश्ता उरकून खाली लॉबीत आलो. लिफ़्ट्सच्या समोरच एक अतिशय सुंदर लँडस्केप बनवलेलं होतं. आपले नर्मदेतले गोटे असतात तसे लहानमोठ्या आकाराचे गुळगुळीत दगड आणि त्यातून झुळझूळ वाहणारं कारंजं .... नेहेमीच्या लँडस्केप्सपेक्षा उंची एकदम कमी - जेमतेम ७-८ इंच. पण त्यामुळेच आल्यापासून ते लक्ष वेधून घेत होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यादिवशी तिथल्या त्या पाण्याचं परिक्षण चालू होतं!!! 'कारंज्यातलं पाणी दूषित तर नाही ना' याची तिथल्या लोकांना चिंता पडली होती!! तसंही ते योग्यच होतं म्हणा. कारण तिथे प्रत्येक नळांतून प्यायचं पाणीच वाहत असतं. त्यामुळे तिथे फिरताना जवळ पाण्याच्या बाटल्या बाळगण्याची कटकट नव्हती. तहान लागली की बागेतला एखादा नळ सोडा आणि पाणी प्या इतकं सोपं होतं. म्हणजेच त्या तिथल्या कारंज्यातही प्यायचं पाणीच वाहत असणार ... मला वाटतं ते लोक आपल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये नुसते डोकावले ना, तरी बेशुध्द पडतील बहुतेक!!!

सगळे निघायच्या तयारीत होतो पण आमची गाईड आलेली नव्हती अजून. मग हॉटेलच्या आवारात जरा इकडे-तिकडे करायला सुरूवात केली. प्रवासी येत होते, जात होते, बॅगांचे ढीग चढत होते, उतरत होते; कर्मचाऱ्यांची लगबग चालू होती. कोण सिंगापूरला प्रथमच आलंय, कोण अनेकदा येऊन गेलंय याच्याशी त्यांना काहीही देणं-घेणं नव्हतं. मी पायऱ्या उतरून खाली आले. आवारात रस्त्याच्या कडेला झाडं लावलेली होती आणि त्यांच्या कडेने ३-४ फ़ूट उंचीचे संरक्षक कठडे लावलेले होते. खरं म्हणजे, थोडा वेळ 'टेकायला' ती जागा एकदम मस्त होती - आसपास इतकी छान झाडंबिडं ... मला मोह आवरला नाही. जरा तिथे बसतीये न बसतीये तोच कुठूनतरी हॉटेलचा एक माणूस आला आणि मला त्याने तिथून उठायला लावलं. कारण काय - तर तसं तिथे बसल्याने झाडांची नासधूस होते. ऐकताक्षणी मला थोडा रागच आला, कारण आपल्यामुळे झाडांना काही त्रास होत नाहीये याची खात्री करूनच मी बसले होते. त्यात पुन्हा सार्वजनिक ठिकाणी असं हटकलं जाण्याची आपल्या देशात आपल्यावर क्वचितच वेळ येते. उठले मग तिथून - करणार काय? पण माझ्यासारखेच इतर काहीजण जे बसले होते त्यांना मात्र खरंच त्या झाडांची पर्वा नव्हती असं लक्षात आलं. तसं होतं तर मग त्या माणसाने सगळ्यांनाच तिथून उठवलं त्यात त्याची काहीच चूक नव्हती!!! अजयच्या मते ते पाण्याचं परिक्षण काय, हे असं लोकांना बसल्या जागचं उठवणं काय, हे सगळे तारांकित हॉटेलचे नखरे होते. पण मला नाही तसं वाटलं कारण शिस्त, स्वच्छता आणि नियमांचं पालन या गोष्टी तिथल्या लोकांच्या दैनंदिन आयुष्याचाच भाग होत्या. आपल्या देशात जर असं प्रत्येक ठिकाणी नियमावर बोट ठेवायचं म्हटलं तर रोजची कामं सोडून दिवसभर तेच करत बसावं लागेल आणि तरीही शेवटी 'जनजागृती' वगैरे साध्य होणार नाही ती नाहीच!!! पण परदेश प्रवास हा अश्या विरोधाभासांमुळेच तर लक्षात राहतो ...

१० वाजत आले होते. धावत-पळत आमची गाईड आली. आमची रोजची बस बिघडली होती. दुसऱ्या बसची व्यवस्था करण्याच्या नादात तिला उशीर झाला होता. सिंगापूरमध्ये वेळेचं बंधन पाळणं किती महत्वाचं आहे, तसं केलं नाही तर कसा भरमसाठ दंड भरावा लागतो इ. गोष्टींची तिनं आम्हाला आल्या-आल्या, पहिल्या दिवशीच भीती घातली होती. आता तिलाच उशीर झाला म्हटल्यावर मंडळींची तिला दंड ठोठावण्याची फार इच्छा होती. नुसत्या कल्पनेनंच सगळे खूष झाले. ५-१० मिनिटांत सगळे निघालो. बसमध्ये ड्रायव्हरच्या सीटसमोर आपल्याकडे असतो त्याच्या चौपट मोठा आरसा लावलेला होता. त्यातून त्याला संपूर्ण बस व्यवस्थित दिसत असणार. आमचा मलेशियन ड्रायव्हर - मि. मलिक - बस चालवता-चालवता सुध्दा सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवून असायचा. बस निघाल्यावर वर ठेवलेल्या बॅगमधून काहीतरी काढण्यासाठी मी उभी राहिले तर त्याने माझ्याकडे त्या आरश्यातून असलं रोखून पाहिलं ना की मी बॅग उघडून त्यात हात घालून हवी ती वस्तू काढण्या‍ऐवजी पटकन ती बॅगच खाली घेऊन बसले. चालत्या गाडीत उभं राहणं हा पण तिथे गुन्हा मानला जातो ... म्हटलं उगीच झंझट नको कसलं!! कारण आमची गाईड सुध्दा बहुतेक वेळा बसूनच आमच्याशी बोलायची.

त्या दिवशी आमचा दौरा होता 'ज्युरॉंग बर्ड पार्क' ला ... 'बर्ड पार्क' हे नावच मुळात मला फार आवडलं ... 'पक्षी अभयारण्य' पेक्षा 'पक्ष्यांची बाग' हे ऐकायलाही छान वाटतं. जगभरातले जवळजवळ ३००० प्रकारचे पक्षी तिथे पहायला मिळतात. सुरुवातीला निशाचर पक्ष्यांचं एक वेगळं दालन होतं. त्या दालनात जोरजोरात बोलायला किंवा कॅमेऱ्याचे फ़्लॅश मारायला मनाई होती. बहिरी ससाणे, अनेक प्रकारची घुबडं तिथे पाहिली.
बाहेर मात्र काही अपवाद सोडले तर सगळे पक्षी मुक्तपणे विहरत होते. पण त्यांची वावरण्याची ठिकाणं आणि माणसांना हिंडायला दिलेली पायवाट यांच्यात बऱ्यापैकी अंतर होतं. आपण केवळ निरिक्षणाशिवाय अन्य कुठल्याही प्रकारे त्या पक्षांच्या संपर्कात येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना हात लावायचा प्रयत्न करणं, त्यांना काहीतरी खायला घालणं असल्या प्रकारांना आपोआपच आळा बसतो. अश्या ठिकाणी ते प्राणी किंवा पक्षी हेच सर्वात महत्वाचे घटक असतात याचं तिथे सतत भान ठेवलेलं दिसलं. सकाळी फिरायला बाहेर पडलो आणि रस्त्यात किंवा झाडावर अचानक एखादा सुंदर पक्षी दिसला तर आपली कशी प्रतिक्रिया असेल तसंच होत होतं तिथे. मुळात त्या बागेचा आराखडाच असा होता की 'सहज दिसावा' असेच सगळे पक्षी समोर यायचे. 'पक्षी बघायला आलो आहोत' हे माहिती असूनही दर वेळेला तोंडातून आश्चर्योद्गारच बाहेर पडायचे.

छोटे चिमण्यांसारखे पक्षी, जे जमिनीवर कमी चालतात, असे मात्र काहीसे बंदिस्त होते. पण ते ही कसे ... तर मोठ्ठंच्यामोठ्ठं आवार आणि त्याला १५-२० फ़ूट उंचीवरून बारीक मच्छरदाणीसारखी जाळी लावलेली. म्हणजे ऊन, पाऊस, वारा याला कुठलाही अडसर नाही, पण ते पक्षीही इतरत्र कुठे उडून जाऊ शकणार नाहीत. कळस म्हणजे अश्या ह्या पक्ष्यांचं निरिक्षण करण्यासाठी त्या मच्छरदाणीच्या वरून फिरवून आणणारी एक छोटीशी लहान मुलांच्या बागेत असते तसली रेल्वेगाडी होती. त्या रेल्वेगाडीतून एक फेरी मारून आलो.

बॅंकॉकप्रमाणेच इथेही दोन 'शो' पाहिले - 'Birds for Pray Show' आणि 'Birds-N-Buddies Show'. पहिल्या शो मध्ये सगळे शिकारी पक्षी अगदी जवळून पहायला मिळाले. लांब अंतरावरून सावज टिपण्यासाठी त्यांनी घेतलेली झेप, त्यांची तीक्ष्ण नजर इ. ची प्रात्यक्षिकं फारच छान होती. दुसरा शो लहान मुलांना आवडेल असा होता. तिथेही अनेक नवखे पक्षी पहायला मजा आली.
नेहेमीप्रमाणेच, त्या बागेत घालवलेला तास-दीड तास आम्हाला कमी वाटला....

तिथून निघायची वेळ झाली होती. आदित्यला तेवढ्यात एक आईसक्रीमचं दुकान दिसलंच. पण सकाळपासूनच ढगाळ हवेमुळे इतकं उकडत होतं की त्यानं आईसक्रीमची मागणी करण्याची मी वाटच पाहत होते. आम्ही तिघांनी मारे अगदी 'डबल लार्ज स्कूप' वगैरे खाल्ले पण नंतर बिलाचा आकडा पाहून माझ्या आणि अजयच्या पोटात त्या 'डबल लार्ज स्कूप' पेक्षा मोठा गोळा आला!!! तेवढ्या किंमतीत इथे महिनाभर आम्हाला तिघांना भरपूर आईसक्रीम खाता आलं असतं!!! पण आता त्याचा विचार करून काय फायदा होता? गुपचूप पैसे दिले आणि आदित्यनं अजून कशाची मागणी करण्याच्या आत तिथून काढता पाय घेतला.

आता बसनं न जाता आम्ही मेट्रो ट्रेनने हॉटेलवर परतणार होतो. सिंगापूरची MRT Train ही लंडनच्या मेट्रो ट्रेनच्या तोडीस तोड समजली जाते. MRT म्हणजे Mass Rapid Transit. नावाप्रमाणेच ती माणसांची वेगानं वाहतूक करणारी व्यवस्था होती. साहजिकच काही विशिष्ट नियम पाळणं गरजेचं होतं. चुंबकीय तिकिटांनी उघडणारे स्वयंचलित दरवाजे, गाडीची आपोआप उघड-बंद होणारी दारं, त्यांचा कालावधी - या सगळ्यांबद्दल सौ. शिंदेनी खबरदारीचे उपाय सांगायला सुरूवात केल्यावर समस्त आजी-आजोबा मंडळी जरा चपापलीच होती. चुंबकीय तिकिटानं ओळख पटवून दार उघडल्यावर पट्कन त्या दारातून पुढे जावं लागतं नाहीतर मग एकदा दार बंद झालं की पुन्हा दुसरं तिकिट घ्यावं लागतं हे कळल्यावर तर बहुतेकांचं अवसानच गळालं. 'आम्ही आपले बसनं जातो ... आम्हाला नको ती ट्रेन राईड' असाही प्रस्ताव आला. मग आम्ही तरण्याताठ्यांनी त्यांना जरा धीर दिला आणि एकदा अनुभव घेतला पाहिजे असं म्हणून येण्याचा आग्रह केला.

बसनं आम्हाला 'ऑर्चर्ड' स्टेशनपाशी सोडलं. रस्त्यावरून स्टेशनमध्ये प्रवेश करायची इमारत अगदी सर्वसाधारण होती. तिच्याखाली इतका मोठा पसारा असेल याची कल्पनाच आली नाही. आत खाली उतरल्यावर सगळीकडे इतकं स्वच्छ आणि चकाचक होतं की त्या ठिकाणाला 'रेल्वे स्टेशन' म्हणणं जिवावर यावं!!! आमच्या गाईडनं सर्वांना तिकिटं दिली. अजूनही काही आजी-आजोबांची 'जावं की नको' अशी द्विधा मनस्थिती होती. तिकिटांची ओळख पटवायच्या ठिकाणी शेवटी एक आजी जरा जास्तच गांगरल्या आणि अडकल्या. पण त्यांना पुढे आणणं फारसं कठिण गेलं नाही.
तिथून खाली प्लॅटफ़ॉर्मवर आलो. एका बाजूला एक गाडी उभी होती. पण ती तिथून हलेपर्यंत कळलंच नाही की ती तिथे उभी होती. मोठमोठ्या फलकांवर गाड्यांचा मार्ग, वाटेतली स्टेशन्स इ. माहिती अतिशय आकर्षक पध्दतीने लिहून ठेवलेली होती. आम्हाला 'मरिना बे' या स्टेशनवर उतरायचं होतं. वाटेत ५-६ स्टेशन्स लागणार होती. त्यात एक 'धोबी घाट' नावाचं स्टेशन होतं. 'धोबी घाट' हा तद्दन भारतीय पण गटात न बसणारा शब्द तिथे वाचून हसू आलं. त्या स्टेशनचं ते तसं नाव का बरं पडलं असेल??
जरा इकडे-तिकडे बघेपर्यंत गाडी आली. सगळ्यांचा 'गृहपाठ' अगदी जय्यत तयार असल्यामुळे गाडीत चढताना मात्र काही गोंधळ झाला नाही. गाडीचा वेग अफाट होता. पुढचं स्टेशन कुठलं ते दाराजवळच्या 'इंडिकेटर'वर दिसत होतं. त्यामुळे 'माटुंगा आ गया?' असल्या प्रश्नांना थारा नव्हता. गाडीची दारं एकाच बाजूला असल्यामुळे 'कळवा कुठल्या बाजूला येणार?' हा ही प्रश्न नव्हता!! नवख्या माणसालाही सहजगत्या प्रवास करता यावा यासाठी असे साधे-सोपे उपाय पुरेसे असतात.
५-६ स्टेशन्स आणि काही कि.मी. अंतर पार करायला जेमतेम १०-१२ मिनिटं लागली. आम्ही 'मरिना बे' स्टेशनवर उतरलो, जमिनीच्या पोटातून वर रस्त्यावर आलो. तिथून अगदी समोरच आमचं हॉटेल दिसत होतं. अचानक लक्षात आलं की दोन दिवस हॉटेलच्या खिडकीतून उजव्या बाजूला एक जुन्या पध्दतीची इमारत मी पाहत होते, ते प्रत्यक्षात एक अत्याधुनिक मेट्रो स्टेशन होतं .... !!

जेवणाची वेळ झाली होती. त्या दिवशी आम्हाला चक्क घरगुती जेवणाचा डबा मिळणार होता. मस्त आमटी-भात, पोळी-भाजी, कोशिंबीर, गोडाचा शिरा .... मजा आली जेवायला. जेवणानंतरचा वेळ जरा निवांत होता. आजी-आजोबांनी विश्रांती घेतली, आम्ही चौघं 'मुस्तफ़ा मॉल' मध्ये फेरफटका मारून आलो. 'सिंगापूरच्या मॉल्समध्ये आम्हाला विसरू नका' असा आमच्या भगिनींचा निरोप होता. त्यामुळे त्यांना लक्षात ठेवण्यासाठी थोडा खिसा हलका केला....

दिवस बुडाल्यानंतर आम्हाला जायचं होतं 'नाईट सफ़ारी' पहायला. जगातलं एकमेव असं ठिकाण की जिथे रात्रीच्या वेळचा जंगली श्वापदांचा वावर पाहता येतो. तसं ते एक अभयारण्यच होतं. सगळीकडे मंद प्रकाशाचाच वापर केला गेलेला होता. एक अंधारमय गूढ वातावरण तिथे होतं. प्रथम Birds at Night Show पहायचा होता. तो शो सादर करणाऱ्या मुलीनं 'रात्रीच्या वेळी शिकार करणारे पक्षी' हा मूळ मुद्दा सोडून बाकीचीच इतकी आगाऊ बडबड केली ना की उगीच आलो इथे असं वाटलं.... त्यानंतर त्या जंगलातून एक फेरी मारायला जायचं होतं.
एक 'फुलराणी' सारखी गाडी आपल्याला सगळीकडे फिरवून आणते. चहूबाजूला किर्रर्र अंधार, रात्रीच्या वेळची जंगलातली जीवघेणी शांतता, आवाज हो‍ऊ नये म्हणून गाडीलाही रबराची चाकं लावलेली ... वाटेत अधे-मधे चांदण्याचा प्रकाश वाटावा इतपतच उजेड पाडणारे तुरळक, मंद दिवे ... प्राणी आणि गाडी यांच्यात कुठलाही अडसर नाही ... त्यात त्या गाडीला दारं-बिरं काही नाहीत ... वातावरण निर्मितीच असली झालेली होती ना ... गाडीच्या पुढच्या भागात एक मुलगी अगदी हळू, दबक्या आवाजात सगळी माहिती देत उभी होती. डावी-उजवीकडे जंगली प्राणी मोकळे-ढाकळे फिरत होते. मी गाडीच्या एका कडेला बसले होते. लांबवर एक रानडुकरांची जोडी दिसत होती. गाडीचा वेग अगदी कमी होता. ती मुलगी रानडुकरांची विशिष्ट आरोळी ऐकायला सांगत होती. म्हणून मी अगदी लक्षपूर्वक कानोसा घ्यायचा प्रयत्न करत होते. दरम्यान एक तिसरं रानडुक्कर रस्त्यावर अगदी माझ्या पायाशी येऊन उभं राहिलेलं मला कळलंच नाही. त्या दोन रानडुकरांच्या आरोळीला प्रत्युत्तर म्हणून हे तिसरं पण जोरात चित्कारलं आणि मी नखशिखांत शहारले.....
हत्ती हा प्राणी इतर वेळी अगदी गरीब आणि निरुपद्रवी वाटला तरी रात्रीच्या अंधारात मोठ्या हत्तींचा कळप किती भितीदायक दिसतो हे तिथे त्या दिवशी कळलं. किती प्राण्यांचं आणि काय-काय वर्णन करणार ... !!! गाडीच्या फेरीप्रमाणेच त्या जंगलातून पायी फिरण्याचीही सोय होती. मला त्या पायवाटांवरून फिरायलाही आवडलं असतं. ज्या कुणाच्या डोक्यातून ही कल्पना निघाली होती त्याला आधीच्या त्या शो मधल्या आगाऊ, बडबड्या मुलीला तिथून हाकलून द्यायचं का कधी सुचलं नसेल कोण जाणे!!! तो शो आम्ही आधीच पाहिला ते बरं झालं नाहीतर या रंगाचा अगदी बेरंग झाला असता....

नाईट सफ़ारीतून बाहेर पडायला नऊ वाजले. जेवून हॉटेलवर परतलो. सामान आवरायचं कंटाळवाणं काम पुन्हा एकदा करायचं होतं. आमचं सिंगापूरमधलं वास्तव्य संपलेलं होतं....
केवळ अठ्ठेचाळीस तासांच्या संगतीत या देशानं आम्हाला किती निरनिराळ्या अनुभवांनी समृध्द करून टाकलं होतं. मायदेशातल्या वास्तवाशी नकळत झालेल्या तुलनेने अंतर्मुख बनायला लावलेलं होतं ... या देशाकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे, अनुकरण फक्त युरोप-अमेरिकेचंच करावं असं काही नाही याची सत्यता पटवून दिलेली होती ... त्यांच्या तोडीस तोड एक देश आपल्या आशिया खंडातच आहे याची जाणीव करून दिलेली होती ...

कुठल्याही प्रसंगाचे अथवा गोष्टीचे ढोबळमानाने तीन भाग करता येतात - सुरूवात, मध्य आणि शेवट. सुरूवातीची उत्सुकता आणि शेवटाची हुरहूर सोडली तर मध्य हा त्या प्रसंगाचा गाभा असतो ... सिंगापूर हा माझ्या पहिल्याच अविस्मरणीय परदेश सहलीचा तेवढाच अविस्मरणीय गाभा ठरला होता....

२९ ऑक्टोबर - नववा दिवस


ऑर्किड्सचा उत्सव.

घरी रोज सकाळी कानाशी किमान अर्धा तास गजर वाजल्याशिवाय झोपेतून न उठणारी मी, गेले ७-८ दिवस मात्र फ़ोनवरून गजर वाजायच्या आत जागी होत होते.
त्यादिवशीपण अशीच सहा वाजताच जाग आली. बाहेर चांगलं उजाडलं होतं. जाग आल्यावर पहिलं काम काय तर खिडकीतून बाहेरचं दृश्य पहायचं. मी पडदे सारले आणि सिंगापूरनं पहिला सुखद आश्चर्याचा धक्का दिला. सकाळी सहा-सव्वासहालासुध्दा रस्त्यांवरचे सिग्नल्स सुरु होते आणि मुख्य म्हणजे ज्या काही एक-दोन तुरळक गाड्या येत-जात होत्या त्या ते इमानदारीत पाळत होत्या - अगदी दुचाकीवालेसुध्दा लाल दिव्याचा मान राखत होते. सक्काळी-सक्काळी, रस्ता रिकामा असताना, वाहतूक पोलीस आसपास दिसत नसताना मनावर एवढा ताबा ठेवायचा म्हणजे खायचं काम नाहीये!!! अशी महान कामं सहजासहजी जमत नाहीत - त्यासाठी अंगी शिस्त बाळगावी लागते!! सिंगापूरच्या प्रगतीचं तेच तर पहिलं मुख्य कारण आहे - वैयक्तिक पातळीवरची शिस्त!! त्याबाबत असलेल्या कडक नियमांची झलक आम्हाला आदल्या दिवशी ऐकायला मिळालीच होती. त्यांची अंमलबजावणी पण तितक्याच तत्परतेने आणि ताबडतोब होत असणार त्याशिवाय तो दुचाकीवाला तसा तिथे लाल दिवा पाहून थांबला नसता.
पण, 'परदेशात गेल्यावर तिथल्या प्रत्येक गोष्टीची आपल्या देशाशी तुलना करावी का?' असाही प्रश्न पडतो. दुसऱ्या देशात गेल्यावर आपल्याला मूठभर त्याच गोष्टी दाखवल्या जातात ज्या पाहून आपण यजमान देशाचे कौतुक करू. आपल्याकडे चार दिवस मुंबई बघायला आलेल्या परदेशी पाहुण्याला आपण दक्षिण मुंबईतच फिरवून आणणार ना!! धारावीला नाही नेणार ......
हे सगळे विचार तिथे उभ्याउभ्या एक-दोन मिनिटांत माझ्या मनात झळकून गेले......
सगळं आवरून, नाश्ता वगैरे करून हॉटेलच्या बाहेर आलो. लॉबीतून रस्त्यावर येण्यासाठी ८-१० पायऱ्या उतराव्या लागायच्या. त्या पायऱ्यांच्या एका बाजूला सामानासाठी एक छोटासा सरकता पट्टा होता. गरज असेल त्याप्रमाणे त्याची दिशा वर किंवा खाली अशी बदलता यायची. त्या पट्ट्यावरून घसरगुंडीसारखं किमान एकदातरी वरखाली करण्याची आदित्यची फार इच्छा होती.
नऊ-साडेनऊला निघालो. मुख्य रस्त्याला लागल्यावर गाईडच्या बडबडीपेक्षा आपसूकच बाहेरच्या दृश्याने जास्त लक्ष वेधून घेतलं. दिवसा सिंगापूर फारच देखणं आहे. टोलेजंग, आकर्षक इमारती, स्वच्छ आणि रुंद रस्ते, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला भरपूर झाडं, कुठेही तुंबलेली वाहतूक नाही की भकाभक धूर ओकणाऱ्या गाड्या नाहीत. वाहतूक पोलीस कुठेही दिसला नाही आणि तरी सकाळच्या गर्दीची वेळ असूनही सगळं सुरळीत चाललेलं होतं. पायी चालणारा एकही माणूस दिसला नाही. एकंदरच तिथे माणसं कमी आणि झाडं जास्त दिसली दोन दिवसांत!! ते सुंदर रस्ते बघावेत की माना उंचावून त्या छानछान इमारती बघाव्यात ते कळेना.
त्यादिवशी आम्हाला 'बोटॅनिकल गार्डन' आणि तिथली ऑर्किड्स पहायला जायचं होतं. 'ऑर्किड्स' आपल्याला तशी फारशी परिचयाची नाहीत. मी तर नैसर्गिक ऑर्किड्सपेक्षा कृत्रिमच जास्त पाहिली होती. पण तिथे त्यादिवशी डोळ्यांचं अक्षरशः पारणं फिटलं. 'बोटॅनिकल गार्डन' अश्या साध्यासुध्या नावाच्या त्या बागेत फुलांचा एक नितांत सुंदर उत्सवच होता. किती रंग आणि किती प्रकार .... काय पाहू, किती फ़ोटो काढू असं झालं होतं. तिथे 'सेलेब्रिटी ऑर्किड्स' असा एक विभाग होता. जेव्हा कुठलीही सुप्रसिध्द व्यक्ती सिंगापूरला आणि त्या बागेला भेट देते तेव्हा त्या-त्या व्यक्तीच्या हस्ते तिथे एक ऑर्किडचं रोप लावलं जातं, त्या व्यक्तीच्या नावाची पाटी तिथे रोवली जाते आणि त्या रोपाला त्याच नावाने पुढे ओळखलं जातं. जगातली अनेक सुपरिचित नावं तिथे निरनिराळ्या पाट्यांवर लिहिलेली दिसली. त्यांत एक 'इंदिरा गांधी ऑर्किड' अशीपण पाटी होती.
सुकलेल्या पाना-फुलांचा कुठेही कचरा नव्हता. पायवाटेवर एखाद्‍दुसरं वाळकं पान दिसलं रे दिसलं की कुठूनतरी झाडलोट करणारी एखादी बाई यायची आणि ते उचलायची.
त्या बागेत एक हरितगृह पण होतं जिथलं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा थोडं कमी ठेवलेलं होतं. खास पर्जन्यवृक्षांच्या अनेक दुर्मिळ जाती तिथे लावलेल्या होत्या. तिथेच Venus Fly Trap आणि Pitcher Plant ही दोन झाडं पहायला मिळाली. ते पाहून आदित्य तर आनंदाने ओरडलाच. या कीटकभक्षक झाडांबद्दल नुकताच तो शाळेत शिकला होता ना!! त्याने मला मुद्दाम त्या दोन झाडांचे फ़ोटो काढायला लावले. त्याला ते शाळेत नेऊन त्याच्या 'सायन्स टीचर'ला दाखवायचे होते. मला म्हणाला - "माझ्या वर्गात आता मी एकटाच आहे की ज्याने ही झाडं प्रत्यक्ष पाहिलीयेत." कुणाला कुठल्या गोष्टीत आणि कसा आनंद गवसेल काही सांगता येत नाही!!!
त्या हरितगृहातून बाहेर पडलो. मग गाईडनं आम्हाला सिंगापूरचं राष्ट्रीय फूल दाखवलं. मात्र आधीची सगळी फुलं पाहिल्यावर ते फूल अगदीच साधं वाटलं. त्याला राष्ट्रीय फुलाचा दर्जा का द्यावासा वाटला असेल काही कळलं नाही....
ऑर्किड गार्डन मधून निघायची वेळ झाली होती. एका तासात लगेच जायचं? तो आख्खा दिवस तिथेच घालवता आला असता तर किती बरं झालं असतं!!
तिथून आम्हाला अजून एक 'सिंगापूर स्पेश्यल' गोष्ट पहायला जायचं होतं ती म्हणजे Merlion - मासा आणि सिंह यांचं मिश्रण असलेलं एक शिल्प जे सिंगापूरच्या अनेक जाहिरातींत आपण पाहतो.

बोटॅनिकल गार्डनमधून बाहेर पडलो तेव्हा ढग दाटून आले होते आणि खूप उकडत होतं. पावसाची शक्यता वाटत होती. मनात म्हटलं - 'पावसापायी पुन्हा कोलंबोसारखी कुठली चुटपूट नको लागायला.' 'ऑर्चर्ड रोड' वरून आमची बस निघाली. हा म्हणजे सिंगापूरचा अगदी खास भाग. अनेक मोठ्यामोठ्या कंपन्यांची, बॅंकांची कार्यालयं तिथे आहेत. हल्ली अनेक हिंदी चित्रपटांतून सिंगापूरचं जे दर्शन घडतं ते याच भागातलं असतं. एका मोठ्या चौकाला फेरी मारून बस जात होती. त्या चौकात एक मोठं, वर्तुळाकार, दुमजली उंचीचं कारंजं संध्याकाळी सहा वाजल्यानंतर सुरू होतं आणि त्याचं दृश्य खूपच सुंदर असतं असं कळलं..... आम्ही फक्त ७-८ तास लवकर पोचलो होतो तिथे ... !!! आदित्यला अचानक शोध लागला की 'क्रिश' चित्रपटात ह्रितिक रोशन 'क्रिश'च्या वेशात तिथूनच उंच आकाशात झेप घेतो. चला...म्हणजे ऑर्चर्ड रोडवर त्यालाही लक्षात ठेवण्यासारखं काहीतरी सापडलं!! नाहीतर त्या छानछान इमारती आणि रस्ते पाहण्यात त्याला बिलकुल रस नव्हता.
.... दरम्यान पावसाची एक सर पडून गेली होती. ऑर्चर्ड रोडवरून बस 'सीन' नदीच्या काठी आली. तिथे आम्ही उतरलो. Merlion चा कुठे मागमूसही नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे तरी ते एक बऱ्यापैकी मोठ्या आकाराचं शिल्प होतं. बरं, इतकावेळ बसमधून लांबूनपण एकही झलक दिसली नव्हती.
नदीकाठी खाली जायला पायऱ्या होत्या...म्हणजे Merlion पहायला नदीकाठच्या सिंगापूरी घाटावर उतरायचं होतं तर!! पाऊस पडून गेल्यावर आपण आपल्या रस्त्यांवरून सहज चालूही शकत नाही. पण तिथे आम्हाला काहीही फरक पडला नाही. कुठेही पाणी साचलेलं नव्हतं, चिखलाचा तर प्रश्नच नव्हता. 'चिखल' हा शब्द तरी तिथे लोकांना माहीत असेल की नाही कोण जाणे! बागकामाच्या अभ्यासक्रमात शिकायला आलेल्या माळ्यांना आधी 'चिखल' म्हणजे काय तेच शिकवत असतील!!
खाली उतरून शंभरएक पावलं चालून गेलो, रस्ता उजवीकडे वळला आणि अचानक Merlion समोर उभा ठाकला. सुमारे २५-३० फ़ूट उंचीचं ते पांढरं शिल्प म्हणजे 'सिंगापूरची शान' समजलं जातं. त्याच्या सिंहाच्या आकाराच्या तोंडातून सतत पाण्याचा एक मोठा फवारा बाहेर उडत असतो. पाण्याचा सतत संपर्क असूनही कसलीही घाण नाही की शेवाळं नाही ... एकदम स्वच्छ!! उंच, आधुनिक इमारतींच्या पार्श्वभूमीवर छान वाटत होता पहायला. थोड्या वेळाने जाणवलं की माझ्या डोळ्यांसमोर हा Merlion नव्हता, थोडा मोठा होता .... मग तो कुठला?? गाईडला विचारलं तर ती म्हणाली की सिंगापूरला तसे दोन आहेत पण पाणी उडवणारा हाच. त्याक्षणी तरी तो आकार पाहून माझा थोडा विरसच झाला.
समोर 'सीन' नदीचं रुंद पात्र होतं. लोकांना उभं राहून निरीक्षण करायला लोखंडी कठडा होता. पलिकडच्या काठावरपण गगनचुंबी इमारती दिसत होत्या. त्यातल्या एका इमारतीकडे बोट दाखवून आदित्यनं मला सांगितलं की मगाचच्या त्या कारंज्यापासून उडलेला क्रिश त्या इमारतीवर उतरतो. चला, म्हणजे हे ही बरं झालं ... त्याचा मगाशी अर्धवट राहिलेला शोधही पूर्ण झाला.
तिथे २-३ फ़ोटो-बिटो काढले आणि निघालो. आदित्य भूकभूक करायला लागला होता ... पायऱ्या चढून पुन्हा रस्त्यावर येण्यापूर्वी वाटेत खाण्यापिण्याची दुकानं होती, ती त्याने जातानाच हेरून ठेवली होती!! पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. रस्त्यात फार वेळ बस उभी करायला परवानगी नव्हती. त्यामुळे गाईडने चलायची घाई केली.

तिथून मग जायचं होतं 'चायना टाऊन' आणि 'लिट्ल इंडिया' पहायला ... व्यापारासाठी म्हणून १९व्या शतकात तिथे येऊन राहिलेल्या अनुक्रमे चिनी आणि भारतीय लोकांच्या 'सिंगापूरचा जुना गावभाग' वाटतील अश्या त्या वसाहती होत्या. तिथे पोचेपर्यंत पुन्हा पावसाची एक सर येऊन गेली. 'लिट्ल इंडिया'त एक देऊळ पहायचं होतं. बाह्य रूपावरून ते देऊळ दक्षिण भारतीय धाटणीचं वाटलं. आदित्यला फारच भूक लागली होती त्यामुळे मी आणि अजय देवळात जाण्याऐवजी त्याच्यासाठी काही खायला मिळतंय का ते पाहायला लागलो. दरम्यान आदित्यला एक cold drinks चं दुकान दिसलं होतं. मग त्याने आपला 'काहीतरी खाण्या'ऐवजी 'काहीतरी पिण्या'चा मनसुबा जाहीर केला. एखाद्या टोपलीत उरलेसुरले कांदे-बटाटे ठेवावेत तसे त्या दुकानात cold coffee चे कॅन्स ठेवले होते विकायला. किंमत अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती - १.२५ सिं. डॉलर्स फक्त. त्यामुळे मला शंका आली. म्हणून मी तिथल्या विक्रेतीला "माल ताजा आहे ना?" असं विचारलं, तर तिला त्या प्रश्नाचा रागच आला. कदाचित ’जुना माल विकणे’ हा सुध्दा एक गुन्हाच असेल तिथे, कुणी विकताना सापडला तर काही शे किंवा काही हजार दंड असेल, पण ते मला कसं कळणार ना!! मी माझं शंकानिरसन नको का करून घ्यायला?? जरा घुश्श्यातच तिने सुटे पैसे (की डॉलर्स) परत केले. त्या सगळ्या अनोळखी नाण्यांच्या किमती शोधून हिशोब बरोबर आहे की नाही याची खात्री करून घे‍ईपर्यंत आदित्यची cold coffee पिऊन झाली सुध्दा!! त्या आघाडीवर आता थोडा वेळ शांतता राहणार होती.
बसच्या दिशेने चालायला सुरूवात केली. डावीकडून एक गल्लीवजा रस्ता मुख्य रस्त्याला येऊन मिळत होता. तो ओलांडण्यासाठी मी डावीकडे पाहिलं तर त्या दिशेने एक चकाचक कार येत होती. म्हणून मी थांबले. तर गंमत म्हणजे मला चालत रस्ता पार करायचा आहे म्हटल्यावर त्या कारवाल्यानं वेग कमी केला आणि मी निघून जाण्याची वाट पाहत चक्क तोच थांबला. दिवसात दुसऱ्यांदा मला सुखद आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या थांबण्याचं कारण मला जरा वेळाने कळलं. मनातल्या मनात त्याच्या सौजन्याचं कौतुक करत मग मी पुढे चालायला लागले.

दुपारचा एक-दीड वाजत आला होता. आदल्या दिवशीच्याच रेस्तरॉंमध्ये जेवण होतं. जेवणानंतर तासाभरात निघायचं होतं - सेन्टोसा आयलंडला भेट द्यायला.
पुन्हा तसेच बसनं छानछान रस्ते, झाडं बघत आम्ही 'माउंट फ़ेबर'च्या रस्त्याला लागलो. 'माउंट फ़ेबर' - सिंगापूर बेटावरची एकमेव टेकडी ... त्यामुळे त्याचं त्यांना केवढं अप्रूप!! एक छोटासा घाट चढून बस त्या टेकडीच्या माथ्यावर पोचली. तिथून 'केबल कार'ने सेन्टोसा आयलंडला जायचं होतं. त्याआधी आम्ही एकदाच केबलकारमध्ये बसलो होतो - रायगडावर जाताना. ही त्यापेक्षा थोडी वेगळी होती - म्हणजे तिथे मोठा डोंगर चढून गेलो होतो, इथे एक लांब-रुंद खाडी पार करून जायचं होतं. 'रविवार असल्यामुळे गर्दी असेल' अशी गाईडने पूर्वसूचना दिलेली होती. त्यामुळे रांगेत उभं राहण्याची तयारी करून गेलो तर तिथे अवघी २०-३० माणसं दिसली!! ही कसली गर्दी? हा तर शुकशुकाट झाला!! 'गर्दी' म्हणजे कशी किमान शे-सव्वाशे माणसं तरी पाहिजेत!! अक्षरशः ५-१० मि. रांगेत उभं रहावं लागलं ...
केबल कार मध्ये बसून 'माउंट फ़ेबर' स्टेशनमधून बाहेर पडलो आणि खाली सिंगापूर बंदराचं झकास दृश्य दिसलं. आमच्या बरोब्बर खाली मोठीच्यामोठी Star Cruise उभी होती. पर्यटनासंबंधीच्या अनेक लेखांत त्याच्याबद्दल वाचलं होतं. तिथल्या डेकवर उभी असलेली माणसं छोट्याछोट्या ठिपक्यांएवढी दिसत होती. वाटेत एक स्टेशन लागलं. काहीजण उतरले, काही चढले. आम्हाला पुढे जायचं होतं.....थोड्या वेळाने डाव्या हाताला अचानक त्या दुसऱ्या मोठ्ठ्या Merlion ची झलक दिसली. सकाळपासून माझ्या नजरेसमोरून जी आकृती हालत नव्हती ती हीच!! पुन्हा ५-१० मि. हवेत लटकत पुढे सरकल्यावर आमचं स्टेशन आलं.

सेंटोसा हे सिंगापूरचंच भावंड - तसंच स्वच्छ, तसंच हिरवंगाऽऽर !! प्रथम जायचं होतं Wax Museum पहायला. त्याच्या प्रवेशद्वारापाशीच एक पुरातन कार्यालयीन खोलीचा देखावा उभा केलेला होता. फार पूर्वी ब्रिटीश, भारतीय, चिनी आणि मलाय - अश्या चार वंशाचे दर्यावर्दी व्यापारी सर्वप्रथम सिंगापूरच्या बेटावर पोचले. सिंगापूरच्या जडणघडणीत या चारही वंशांचा महत्वाचा वाटा आहे. तर त्या काळी त्यांच्या वापरात असलेल्या टेबल-खुर्च्या, लेखन साहित्य अश्या सगळ्या वस्तूंचं ते एक छोटेखानी प्रदर्शनच होतं. तिथून आत गेल्यावर सर्वात आधी एक पाच मिनिटांचा त्याच काळाचं वर्णन करणारा माहितीपट दाखवला गेला. तिथून पुढे गेल्यावर मेणांच्या पुतळ्यांच्या वापर करून तेव्हाच्या लोकजीवनातले निरनिराळे देखावे उभे केलेले होते. तेव्हाच्या गोदी कामगारांचं जीवन, न्यायनिवाड्याच्या पध्दती, वेगवेगळे सणवार - हे सगळं तिथे पहायला मिळालं.
तिथून बाहेर आल्यावर 'मरीन वर्ल्ड' पहायला गेलो. कल्पना करा की खोल समुद्रातल्या एखाद्या काचेच्या पारदर्शक बोगद्यातून आपण चाललोय, भोवती लहान-मोठे असंख्य मासे फिरताहेत ... तर कसं वाटेल तसा तो एक अफलातून अनुभव होता!! एक ८६ मी. लांबीचा ऍक्रिलिकचा बोगदा होता. त्या बंदिस्त बोगद्यातून आपण चालत जायचं. बाहेर आपल्याभोवती संपूर्ण पाणी असतं आणि त्यात सगळे जलचर विहरत असतात. समुद्र, त्यातल्या वनस्पती, खडकाळ तळ याची इतकी हुबेहूब प्रतिकृती बनवलेली होती की मी बराच वेळ 'आपण खऱ्या समुद्रातच उतरलो आहोत' असंच समजत होते. तो माझा गैरसमज आदित्यनं दूर केला!!! बोगद्यातल्या रस्त्यावर अर्ध्या भागात सरकता पट्टा होता...चालायचा कंटाळा आला की त्याच्यावर जाऊन उभं रहायचं. The Crocodile Hunter - स्टीव्ह आयर्विनच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला 'स्टिंग रे' तिथे पाहिला. आमच्या डोक्यावरून तो जाताना लक्षात आलं की त्याच्या पंखांचा घेर एका मोठ्या छत्रीएवढा होता.
सरकता पट्टा आणि निरनिराळे मासे - या दोन आकर्षणांमुळे आदित्य त्या बोगद्यातून दोनदा फिरून आला. बोगद्यातली फेरी संपल्यावर बाहेर पडायच्या मार्गावर भिंतींवर अनेक छोटी-छोटी aquariums लावलेली होती. म्हणजे त्यांची एक बाजू फक्त भिंतींवर दिसत होती. त्यामुळे त्या जणू हलणाऱ्या तसबीरीच वाटत होत्या!! हाताच्या मुठीत मावतील असे Jelly Fish आणि अंगठ्याच्या आकाराचे Sea Horse त्यात तरंगत होते ..... बघण्यासारखं इतकं होतं पण शेवटी पाय दुखायला लागले म्हणून आवरतं घ्यावं लागलं.

मरीन वर्ल्ड मधून बाहेर पडल्यावर समोर एक छोटी बाग होती. तिथून तो दुसरा Merlion व्यवस्थित दिसत होता. ती बागपण अनेक हिंदी चित्रपटांत दिसते. तिथे एका ठिकाणी जमिनीवर अमेरिकेतल्या महत्वाच्या शहरांच्या दिशा आणि त्या जागेपासूनचे त्यांचे अंतर अशी माहिती रंगवून ठेवलेली होती. कॅलिफ़ोर्निया तिथून साधारण चौदा हजार कि.मी.वर होते. मला ते अंतरांचे आकडे वाचून लगेच विमान, इकॉनॉमी क्लास ह्या सगळ्या गोष्टीच आठवायला लागल्या आणि तिथून मी काढता पाय घेतला .....
सहा वाजत आले होते. सिंगापूरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची एक झलक आता पहायला मिळणार होती. आता आम्हाला जायचं होतं 'म्युझिकल फ़ाऊंटन शो' पहायला. चक्क एका 'बस स्टॉप' वर जाऊन उभे राहिलो. 'रविवार आहे, गर्दी आहे, बसमध्ये पटकन चढावं लागतं, बस जास्त वेळ थांबत नाही' या गाईडच्या सूचना आम्ही ऐकून सरळ सोडून दिल्या !! 'गर्दी आणि सार्वजनिक वाहतूक' या विषयाच्या परिक्षेत आम्ही सगळे तिच्यापेक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो असतो. आपल्या एखाद्या 'आराम बस'च्या तोंडात मारेल अशी ती तिथली सार्वजनिक वाहतूक करणारी बस आली. एकदम रुंद आणि मस्त ऐसपैस !! फक्त बसायला बाकं अगदी कमी आणि उभं रहायला मात्र भरपूर जागा ... हादरे, गचके बसायचा तर प्रश्नच नव्हता, रस्ते लोण्याहूनही मऊ होते .... पोटातलं पाणीपण हललं नाही. १०-१५ मि.त आमचा 'इश्टाप' आला.
'म्युझिकल फ़ाऊंटन शो' सुरू व्हायला अजून बराच वेळ होता पण योग्य जागा पकडण्यासाठी आम्ही तिथे जवळजवळ तास-दीड तास लवकर गेलो होतो. तेवढा वेळ मात्र जरा कंटाळवाणा गेला. दिवसभर दमणूक झाली होती, जरा चहा-कॉफ़ी प्यावी म्हटलं तर कुठे मिळाली नव्हती, थोडी भूकपण लागली होती. काहीतरी बडबड करून, गप्पा मारून मी आदित्यचा किल्ला लढवला तासभर. पूर्ण अंधार पडून 'शो' सुरू झाल्यावर मात्र त्याचा कंटाळा गेला. सगळेच पाऊण-एक तास हरवून गेले होते.

आठाच्या सुमाराला 'शो' संपला. दुपारी 'माऊंट फ़ेबर'पाशी सोडलेली बस बाहेर आमची वाट पाहत उभी होती. येताना केबलकारनं आलो तरी सिंगापूरला परतताना बसनं जायचं होतं. जाताना सीन नदी, तिच्यावरचा तो सकाळचा घाट सगळं पुन्हा दिसलं. हॉटेलपाशी उतरून आधी थेट जेवायला गेलो.

हॉटेलच्या रूमवर परतल्यावर मी नेहेमीच्या सवयीनं झोपण्यापूर्वी खिडकीत जाऊन उभी राहिले. रेस्तरॉंसमोरच्या रस्त्यावर दिवाळीनिमित्त केलेली रोषणाई तिथून छान चमचम करताना दिसत होती. सिग्नल्स तसेच चालू होते. मध्यरात्री २-३ वाजता सुध्दा ते पाळले जाताहेत का ते पहायची माझी फार इच्छा होती. पण झोपणं आवश्यक होतं. आडवं पडल्यावर बंद डोळ्यांसमोरून संध्याकाळचा तो मोठ्ठाच्या मोठ्ठा 'स्टिंग रे' पोहत गेला .....