३ नोव्हेंबर - चौदावा दिवस



तीन दिवसांत तिसरं हॉटेल ...


मलेशियातला तो आमचा तिसरा दिवस होता. आधीच्या दोन दिवसांत मलाय शब्दसंग्रहात थोडी भर पडली होती. Pintu म्हणजे 'दरवाजा', Masuk म्हणजे 'प्रवेश', Keluar म्हणजे 'बाहेर जायचा रस्ता', Dilarang Masuk म्हणजे 'प्रवेश निषिध्द' वगैरे, वगैरे. अर्थात हे ज्ञान हॉटेलमधल्या निरनिराळ्या पाट्या वाचून आलेलं होतं. कानावर पडणाऱ्या शब्दांतून मात्र कुठलाही बोध होणं कठीणंच होतं.

परतायला दोनच दिवस अवकाश होता आणि एक अप्रिय गोष्ट घडली. आमच्या गृपमधल्या एक आजी हॉटेलच्या लॉबीत पाय घसरून पडल्या आणि त्यांच्या कंबरेला जबर दुखापत झाली. त्यांना ताबडतोब तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. एक रात्र तिथेच रहावं लागलं. त्यांच्या कंबरेचं हाड एका ठिकाणी मोडलं होतं असं कळलं. पुढचे दोन दिवस त्यांना हॉटेलच्या खोलीतच पडून रहावं लागलं. चौदाव्या दिवसाची सुरूवात या गालबोटानंच झाली होती....

जसं गेंटींग हायलंडला एक दिवस थीम-पार्क मध्ये घालवला, तसंच त्या दिवशी 'सन-वे लगून' रिसॉर्टच्या 'वॉटर पार्क' मध्ये दिवसभर धम्माल करायची होती. पण त्यापूर्वी ते आवडलेलं हॉटेल आणि ती सतराव्या मजल्यावरची आवडलेली खोली सोडायची होती. दर एक-दोन दिवसांनी सामान उचकायचं, पुन्हा भरायचं हे सगळं आता अंगवळणी पडलं होतं. सामानसकट तिथून बसनं निघालो आणि थोड्याच वेळात त्या रिसॉर्टला पोचलो.
त्या परिसरात वेगवेगळ्या दर्जांची ४-५ हॉटेल्स होती. आमचा मुक्काम 'सन-वे पिरॅमिड' नामक हॉटेलमध्ये होता - तो ही फक्त २४ तासांसाठी.... मलेशियात आल्यापासून तीन दिवसांत आम्ही तीन हॉटेल्सचं मीठ खाल्लं होतं!!

'सन-वे लगून' हा परिसर म्हणजे दक्षिण आफ़्रिकेतल्या 'सन सिटी'ची हुबेहूब प्रतिकृति आहे असं समजलं ... तेच सन सिटी जिथे काही वर्षांपूर्वी 'मिस वर्ल्ड' स्पर्धा झाली होती, ज्याच्या विरोधात खूप निदर्शनं झाली होती आणि ज्या स्पर्धेत आपली ऐश्वर्या जिंकली होती ... असं ते शहर फक्त ऐकूनच माहीत होतं. आता मूळ कलाकृतीच पाहिलेली नसल्यामुळे तिची ही प्रतिकृति हुबेहूब आहे की नाही ते कळणार कसं? आणि तसंही, ते न कळल्यानं काही फरकही पडणार नव्हता. किमान प्रत्यक्ष त्या 'सन सिटी'ला भेट दे‍ईपर्यंत तरी!! ही नक्कल सही-सही होती किंवा कसं ते तिथे गेल्यावर ठरवता आलं असतं ... त्या क्षणी तरी 'वॉटर पार्क' वर लक्ष केंद्रित करायचं ठरवून निघालो.
'वॉटर पार्क'ला जायची वाट आमच्या हॉटेलच्या मागच्या बाजूनं, एका ५-६ मजली चकाचक 'शॉपिंग मॉल'च्या तिसऱ्या मजल्यावरून जात होती. पूर्वीचे चौकोनी वाडे असायचे तशी काहीशी त्या मॉलची रचना होती - म्हणजे, मध्ये मोकळी जागा आणि चहूबाजूंनी दुकानं. तळमजल्यावरच्या मोकळ्या जागेत 'फ़िगर स्केटिंग' आणि 'आईस हॉकी' खेळण्याची सोय होती. अगदी लहान-लहान मुलंसुध्दा तिथल्या गुळगुळीत बर्फाच्या पृष्ठभागावरून सहज इकडे-तिकडे करावं तशी फिरत होती, सराव करत होती. तिथला दिव्यांचा लखलखाट, झगमग, ती छानछान दुकानं, ते स्केटिंग - हे सगळं पाहून आम्ही थोडा वेळ 'वॉटर पार्क' वगैरे विसरूनच गेलो. संध्याकाळी त्या दुकानांतून एक-एक चक्कर टाकायचीच असं मनोमन ठरवून टाकलं.
त्या मॉलमधून पुढे गेल्यावर एका लिफ़्टनं सहा-सात मजले वर जाऊन मग वॉटर पार्कच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचता यायचं. वाटेत ठिकठिकाणी 'काम चालू, गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत' अश्या पाट्या दिसत होत्या. पण त्या इंग्रजीतच होत्या ... त्यामुळे मलाय भाषेत दिलगिरी कशी व्यक्त करतात ते समजण्याची एक मोलाची संधी हुकली. त्या वॉटर पार्कचं आधुनिकीकरण चालू होतं. म्हणजे, 'इथे अजून काहीतरी नवीन बनतंय जे आपल्याला पहायला मिळणार नाहीये' याचीच रुखरूख तिथे शिरण्यापूर्वी !!! ... 'अजून ४-६ महिन्यांनी आलो असतो तर नव्या स्वरूपातलं वॉटर पार्क बघायला मिळालं असतं' असा विचार हटकून आलाच मनात !! जे मिळतंय त्यात आनंद मानायच्याआधीच जे हुकणार आहे त्याबद्दल हळहळ का वाटते आपल्याला?

गेंटिंग हायलंडच्या थीम-पार्कप्रमाणेच इथेही दिवसभर सगळेजण आपापली वयं विसरून चिक्कार हुंदडले. दुपारच्या जेवणानंतर आम्ही थोडे ढेपाळलो पण आदित्यचा उत्साह कायम होता. त्याला पुन्हा पाण्यात डुंबायचं होतं, उड्या मारायच्या होत्या. त्याच्या उत्साहावर पाणी पडू नये म्हणून त्याला पाण्यात सोडलं आणि आम्ही काठावर बसून राहिलो आरामात. पण अर्ध्या-एक तासात आभाळ भरून आलं आणि गडगडाटासह पाऊस सुरू झाला. सर्वांना लवकरात लवकर तिथून बाहेर पडायला सांगण्यात आलं.परतताना वाटेत एके ठिकाणी Sandstone Exhibition होतं ते पाहिलं. फ़्लॉवरच्या गड्ड्यांसारखे किंवा मश्रूमसारखे दिसणारे निरनिराळ्या रंगांचे आणि आकारांचे दगड मांडून ठेवले होते आणि जोडीला आकर्षक प्रकाशयोजना केलेली होती. दगडांचे ते नैसर्गिक आकार केवळ अप्रतिम होते!!

संध्याकाळी मॉलमधून फेरफटका मारायचा निश्चय काही मजल्यांपुरता पूर्णत्वाला नेता आला. पाण्यात खेळून पाय खूप दुखायला लागले होते, त्यात तो ५-६ मजल्यांवरचा अगणित दुकानांचा पसारा ... उत्साह खूप होता पण २-३ मजले फिरून होईपर्यंत पायांनी असहकार आंदोलन सुरू केलंच!! मग हॉटेलवर परत येऊन थोडा वेळ निवांत गप्पा-टप्पा केल्या, पत्ते खेळलो. आमच्या खोलीच्या खिडकीतून खालच्या कॉफ़ी-शॉपमधला मोठा टी.व्ही.चा पडदा दिसत होता. कुठलातरी फ़ुटबॉलचा सामना चालू होता, तो पाहिला थोडा वेळ.

जेवणं झाल्यावर हॉटेलच्या बाहेर एक फेरी मारून आलो. सगळीकडे दिवाळी-ईद निमित्त अतिशय सुंदर रोषणाई केलेली दिसली. त्या असंख्य नाजूक दिव्यांच्या सोबतीनं निवांत फिरायला फारच छान वाटलं. सण आणि दिव्यांचा झगमगाट यांचं जगभर अतूट नातं आहे. आपल्याकडेही नवरात्रात, गणेशोत्सवात त्याच तोडीची रोषणाई असते, फक्त त्याच्या जोडीनं कर्कश्य आवाजातली गाणीही असतात जी त्यातली मजा पार घालवून टाकतात ...

हॉटेलवर परतल्यावर पुन्हा सामानाची आवराआवर करायची होती ... दुसऱ्या दिवशी परतीचा विमान-प्रवास होता. मलेशिया सोडताना थोडी रुखरुख जाणवली की थीम-पार्क, वॉटर-पार्कच्या नादात तिथल्या साध्या-साध्या गोष्टी निरखायला मिळाल्या नाहीत. पण २-३ दिवसांच्या धावत्या भेटीत दुसरं काय होणार? तसं बघितलं तर फक्त सिंगापूरच का, प्रत्येक देशात, प्रत्येक ठिकाणीच किमान आठवडाभर तरी राहता आलं पाहिजे ... जे कुणालाच शक्य नाही. मग ती दुधाची तहान अशी ताकावर भागवावी लागते ... पण निदान तेवढं तरी करायलाच हवं आणि ते आम्ही केलं होतं....
खरं म्हणजे 'दुधाची तहान ताकावर ...' असं म्हणून पंधरा दिवसांच्या अभूतपूर्व आणि अनेक अर्थांनी आनंददायी घटनांवर बोळा फिरवायची कुणाचीच इच्छा नव्हती ... !!!

1 comment:

Anonymous said...

atishay sundar lihilay. sagla ajoon vachla nahi fakta ojharta najrekhalun ghatla ani photo pahile. Tu hee trip kashi arrange kelis? kuthlya travel agency chya thru ka??
Vinita