१ नोव्हेंबर - बारावा दिवस



थीम-पार्कमध्ये एक दिवस ...


आदल्या दिवशी आम्ही 'गेंटींग हायलंड'ला पोचलो तोवर रात्र झालेली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी उठल्यावर आधी खिडकीतून बाहेरचं दृश्य बघितल्याशिवाय मला करमलंच नसतं. सकाळची वेळ, सूर्याची कोवळी किरणं, थंडी, धुकं, हिरव्या डोंगरदऱ्या यांच्या मिश्रणातून जे तयार होतं ना त्याला केवळ 'लाजवाब' हाच एक शब्द योग्य आहे - मग जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा! त्यावेळची ती गार, ताजी-ताजी हवा नाकात भरून घ्यायला मला फार आवडते.
आमच्या खोलीच्या खिडकीतून हॉटेलचा परिसर दिसत होता. तिथली बाग, रस्ते काही अंतरानंतर धुक्यात हरवून गेलेले होते. लांबवर तर डोंगरसुध्दा धुक्यामुळे पांघरूणात गुरफटून झोपल्यासारखे वाटत होते.आमच्यापैकी एक-दोन काका बागेतल्या रस्त्यावरून फिरायला निघालेले दिसले. मला हे कसं सुचलं नाही कोण जाणे. खरंतर मला पहाटे लवकर उठणं अजिबात जमत नाही आणि आवडतही नाही. पण अश्या काही मोजक्या कारणांसाठी मात्र मी पहाटे उठायला सुध्दा एका पायावर तयार असते. सकाळी फिरायला जाण्याचा बेत दुसऱ्या दिवशी अमलात आणायचा ठरवला आणि तो आईला सांगायला घाईघाईने तिच्या खोलीत गेले. ती माझी वाटच पाहत होती कारण तिच्या खोलीच्या खिडकीतून दिसणारं दृश्य तिला मला दाखवायचं होतं. मी सुध्दा अगदी जोरात 'हो, मी पण पाहिलं सकाळी उठल्याउठल्या ...' असा भाव मारत पडदे सारले और मेरी तो बोलती ही बंद हो गयी कारण मी जे आधी पाहिलं होतं ते यापुढे काहीच नव्हतं!! इथे हॉटेलचा परिसर, रस्ते-बिस्ते काही नाही .... नजर जाईल तिकडे पामवृक्षांच्या काळपट-हिरव्या रंगात रंगलेल्या डोंगररांगा आणि सूर्याच्या कोवळ्या उन्हात विलक्षण रंगसंगती साधत तरंगणारा धुक्याचा शुभ्र कापूस .... बस्स!! त्याच धुक्याच्या मागे आदल्या दिवशी भयाण वाटलेलं ते जंगल पसरलेलं होतं हे सांगूनही कुणाला खरं वाटलं नसतं. बऱ्याच वर्षांनी दिवसाची अशी अप्रतिम सुरूवात झाली होती. कारण, इथे वापीत राहून असं धुकं-बिकं सगळं विसरायलाच झालंय आता....

पण आदित्यच्या दृष्टीने मात्र दिवसाची सुरूवात 'डोकं पकवणारी' झाली होती. तो सबंध दिवस आम्हाला तिथल्या थीम-पार्क मध्ये घालवायचा होता. साहजिकच त्यादिवशी सकाळी उठल्यावर सर्वात पहिलं कोण तयार झालं असेल तर आदित्य. कधी एकदा त्या थीम-पार्कचे दरवाजे उघडताहेत आणि आत घुसून तो तिथल्या वेगवेगळ्या राईड्सवर उलटापालटा, वरखाली, गोलगोल फिरायला सुरूवात करतोय असं त्याला झालं होतं. नेहेमीप्रमाणे नाश्त्याच्या ठिकाणी तो आमच्याआधी पोचला होता. जरा वेळाने मी तिथे गेले तर याचा चेहेरा पडलेला! समोर सगळे आवडीचे पदार्थ असताना आता हे काय नवीन ते मला कळेना. विचारल्यावर 'पाऊस पडतोय बाहेर' म्हणून माझ्यावरच डाफरला - . मग मला उलगडा झाला. बाहेर पाऊस म्हणजे तो थांबेपर्यंत तरी त्याला तसं उलटंपालटं होता येणार नव्हतं. वर डोकं-खाली पाय अश्याच वर्षानुवर्षांच्या अवस्थेत जमिनीवरच चालावं लागणार होतं. आता ती काही माझी चूक नव्हती. पण त्यानं त्याचा सगळा राग माझ्यावर काढला!!
... हवा किती झपाट्यानं बदलली होती! बोचरा गारवा होता म्हणून, नाहीतर मी आदित्यला घेऊन पावसात भिजायला नक्की गेले असते. पण आता नाईलाजास्तव इकडेतिकडे वेळ काढावा लागणार होता. मग आम्ही सगळेजण त्या रिसॉर्टच्या ४-५ मजल्यांवरून फेरफटका मारून आलो. सगळीकडे शॉपिंग मॉल्स, प्रदर्शनं, तरतऱ्हेच्या वस्तूंची दुकानं, उपहारगृहं अशी सरमिसळ होती. तिथे सुध्दा कुठून आलो, कुठे वळलो, किती मजले चढलो-उतरलो - काही म्हणता काही कळलं नाही. जमिनीच्या वर होतो की खाली ते ही लक्षात आलं नाही. 'तिथून पुन्हा आपापल्या खोल्यांपाशी परत जा' असं सांगितलं असतं तर कुणालाही ते जमलं नसतं. आमचा गाईड - झॅक - त्याच्यावरच आमची सगळी मदार होती. त्याच्या मागेमागे तिथे तसं फिरण्यात वेळ मात्र मस्त गेला आमचा .... आदित्य सोडून! त्याला एव्हाना 'आयुष्य व्यर्थ' वगैरे वाटायला लागलं होतं!! 'काही अर्थ नाही मलेशियाला येण्यात ...' इतपत विरक्ती पण आलेली होती....उरलासुरला राग काढायला आई होतीच!!! तासाभरानंतर मात्र पावसाला त्याची दया आली. लगेच त्याची कळी खुलली.

थीम-पार्कच्या प्रवेशद्वारापाशी प्रत्येकाच्या मनगटावर एकएक कागदाचा, barcode असलेला पट्टा गुंडाळला गेला. तो त्या पार्कचा Multiple Entry Visa होता. त्याचा अर्थ आदित्यला सांगितल्यावर तो तर नाचायचाच बाकी राहिला होता. कितीही वेळा आतबाहेर करा, कुठल्याही राईड्सवर कितीही वेळा बसा - आता त्याला कुणीही अडवणार नव्हतं - अगदी आईसुध्दा!! बॅंकॉकपासूनच तो जोशी काका-काकू आणि पूर्वाताईबरोबरच असायचा बहुतेकवेळा. त्याची आणि पूर्वाताईची एव्हाना भलतीच गट्टी जमली होती. त्यामुळे त्यादिवशीसुध्दा एकदा त्या थीमपार्कमध्ये शिरल्यावर तो त्यांच्याबरोबर जो गायब झाला माझ्यासमोरून तो थेट रात्री जेवायच्यावेळी पुन्हा भेटला मला. दिवसभर फक्त अधूनमधून कुठेतरी माझ्या दृष्टीस पडायचा, मध्येच कधीतरी त्याची हाक ऐकू यायची नाहीतर आवाज कानावर पडायचा इतकंच!

उच्च रक्तदाबवाल्यांना कुठल्याही राईड्सवर बसायला बंदी होती. त्यामुळे आईची इच्छा असूनही तिला कशात बसता आलं नाही. सासूबाईंना तिथला गारठा सहन झाला नाही. त्यांना थंडी वाजून ताप भरला. त्यामुळे त्या गोळी घेऊन खोलीत झोपून राहिल्या. बाबा मात्र अर्धा दिवस होते आमच्याबरोबर. तो दिवस माझ्या विशेष लक्षात राहिला त्याचं कारण म्हणजे त्या दिवशी मी आयुष्यात प्रथमच 'रोलर कोस्टर' नामक प्रकारात बसले. रोलर कोस्टरचं लहान रूप म्हणता ये‍ईल अशी एक राईड आधी दिसली, त्याच्यापासून सुरूवात करायचं ठरवलं. त्यात बसल्यावर आपल्याला मळमळलं नाही, पोटात ढवळलं नाही हे पाहून माझा उत्साह वाढला. मग मोठ्या रोलर कोस्टरवर बसायचं धाडस केलं. तिथे दोन ठिकाणी ३६० अंशात गिरकी घ्यायची होती. आधी २५-३० फ़ूट उंची गाठेपर्यंत मजा वाटली. पण खालच्या दिशेने जोरात निघाल्यावर मात्र वाट लागली. त्या वेगाचा, अचानक वळणांचा त्रास कमी करायचा असेल तर बेंबीच्या देठापासून जोरजोरात ओरडावं असं मी एकदा कुठेतरी वाचलं होतं. पण हा गृहपाठ न करता जरी मी गेले असते तरी चाललं असतं कारण ऊर्ध्व दिशा बदलून अचानक एका क्षणी जेव्हा आपण खालच्या दिशेनं वजनविरहित अवस्थेत तुफान वेगात निघतो तेव्हा ओरडण्याशिवाय गत्यंतरच नसतं!! त्यात पुन्हा मी माझे डोळेही घट्ट मिटून घेतले होते. मधली ती ३६० अंशाची दोन वळणं येऊन गेलेली आता अंधूक आठवताहेत मला... पण काही सेकंदांनंतर थांबल्यावर मात्र मेंदूत प्रचंड वावटळ येऊन गेल्यासारखं वाटत होतं थोडा वेळ!! पण मी खूष होते. कारण, इतके दिवस ज्या राईड्सकडे नुसतं पाहून मला पोटात ढवळायचं त्यांपैकी एका रोलर कोस्टरसारख्या महारथी राईडमध्ये त्या दिवशी मी चक्क बसले होते, ओरडले होते, हवेत गटांगळ्या खाल्या होत्या, गिरक्या घेतल्या होत्या .... मजा आली, त्रास झाला नाही पण का कोण जाणे, पुन्हा त्यात बसावंसंही वाटलं नाही. मात्र आधी द्विगुणित झालेला माझा उत्साह आता दशगुणित झाला होता. आता जरा आव्हानात्मक, उच्च्पदस्थ राईड्सकडेच माझं लक्ष जायला लागलं. एक Space Shot नामक राईड होती. एका ४०-५० फ़ूट उंच खांबावरून आपण बसलेला पाळणा खूप वेगाने वर खाली होतो. क्षणार्धात २५-३० फ़ूट वर, क्षणार्धात खाली .... बाकी काही नाही तरी दुपारनंतर त्या राईडमध्ये बसायचंच असं मी ठरवून टाकलं.

मी आणि बाबांनी आदित्यला आग्रह करून Go Carting ला पण नेलं. तो आधी तयार नव्हता - कदाचित चार चाकी गाडी चालवायची होती म्हणून असेल. तिथल्या त्या बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या म्हणजे खऱ्या गाड्यांच्या अगदी हुबेहूब प्रतिकृती होत्या. मारे अगदी F-1 च्या थाटात आम्ही हेलमेट घालून गाडीत बसलो, सीट-बेल्ट्स लावले ... आदित्यसाठी तर ते सगळं एकदमच रोमांचकारी होतं. सगळ्यांची पूर्वतयारी होईपर्यंत अगदी शिस्तीत सिग्नलचा लाल दिवा वगैरे चालू होता. तो हिरवा झाल्यावर सगळ्यांच्या अंगात अचानक 'शूमाकर' संचारला. पण त्या भ्रमाचा भोपळाही लगेच फुटला कारण कितीही केलं तरी त्या गाड्यांचा वेग १०-१५ च्या पुढे जातच नव्हता. सुरक्षेच्या दृष्टीनंच तशी तजवीज केलेली असणार म्हणा. १-२ फेऱ्या मारल्यावर मला आणि बाबांना तर कंटाळाच आला पण अर्ध्यातच थांबायला परवानगी नव्हती ... झक्कत त्या ४-५ फेऱ्या पूर्ण कराव्या लागल्या. आदित्यला मात्र खूपच मजा आली....

अर्धा दिवस संपत आला होता. आम्ही इकडेतिकडे भटकत होतो, मध्येच मनात आलं की एखाद्या राईडमध्ये बसत होतो .... त्या राईड्सप्रमाणेच, किंबहुना त्यापेक्षाही जास्त, ते तसं वयाचं, वेळेचं बंधन नसणं त्यादिवशी जास्त भावलं मला. दुपारी दोन वाजता इतरांबरोबर जेवायला जाणं मात्र अपरिहार्य होतं - ते सुध्दा वेळेचं बंधन म्हणून नव्हे तर नंतर एकट्याने गेलो असतो तर रस्ता सापडला नसता म्हणून...!!

जेवणानंतर सगळ्या आजी-आजोबांनी वामकुक्षीला प्राधान्य दिलं आणि आमच्यासारखे मात्र निघाले पुन्हा हुंदडायला. सकाळच्या त्या कोवळ्या किरणांनंतर दिवसभर सूर्य काही दिसला नाही. खूप धुकं होतं, गारठा होता पण तेच बरं होतं. स्वच्छ आकाश आणि कडक ऊन असतं तर मला वाटतं मी पण खोलीत बसून राहणं पसंत केलं असतं. लांबून Space Shot खुणावत होतं पण भरल्यापोटी लगेच कसं काय बसणार त्यात! मग एका निवांत ट्रेनमधून एक मोठी फेरी मारली, तिथल्या 'ग्रीन हाऊस'मध्ये पानं-फुलं बघत थोडा वेळ काढला. एका दुकानातून कॉफ़ीचा वास दरवळत आला. मग मस्त वाफाळती कॉफ़ी प्यायलो. तिथेच मक्याचे उकडलेले दाणे पण मिळाले गरमागरम. मजा आली ते पण खायला ...
अचानक वारा खूप जोरात वाहायला लागला, धुकं अजून दाटदाट व्हायला लागलं, गारठ्याचा बोचरेपणा अजूनच वाढला आणि एकएक करत सगळ्या राईड्स अपुऱ्या प्रकाशामुळे आणि धुक्यामुळे बंद झाल्या!!! नंतर सहा वाजेपर्यंत वाट पाहिली पण एकदोन अपवाद वगळता त्या पुन्हा सुरू नाही झाल्या. Space Shot मध्ये बसण्यासाठी एकवटलेला धीर सरळसरळ वाया गेला...!! पण आता त्याला काही इलाज नव्हता.

संध्याकाळनंतर तिथला 'कॅसिनो' बघायला जायचं होतं. वयोमर्यादा आणि वेशभूषा मर्यादा यांमुळे आदित्य आणि अजय दोघंही तिथे येऊ शकले नाहीत. पुरुषांसाठी लांब बाह्यांचा शर्ट आणि पॅंट घालणं आवश्यक होतं. तसा शर्ट नव्हता म्हणून अजय आणि १२ वर्षांखालील मुलांना आत प्रवेश नव्हता म्हणून आदित्य...!! वयोमर्यादा समजण्यासारखी होती पण जुगारच खेळायचा तर लांब बाह्या काय आणि अर्धी चड्डी काय - काय फरक पडणार होता कोण जाणे!! त्या दोन अटींत बसणारे इतर सगळे मग त्या कॅसिनोतून फिरून आलो. मला स्वतःला सुध्दा त्यात विशेष स्वारस्य होतं अशातला भाग नाही पण 'नाहीतर अश्याठिकाणी आपण जायची वेळ तरी कधी येणार' या शुध्द हेतूनं मी तिथे गेले होते.
तो जगातला सर्वात मोठा कॅसिनो आहे. दूरदेशातले लोक गेटींग हायलंडला केवळ त्या कॅसिनोसाठी येतात असं कळलं. तीन मजल्यांवरच्या मोठमोठ्या दालनांत निरनिराळ्या प्रकारांचे जुगार अगदी रंगात आले होते. छतावर लटकणारी प्रचंड झुंबरं आणि एकूणच प्रकाशयोजना अप्रतिम होती. उंची दारूचे ग्लास, सिगारेटी, लोकांचे वेष - सगळ्यांतून श्रीमंती नुसती ओसंडून वाहत होती. काहीही शारिरीक कष्ट न करता, बसल्याजागी, केवळ नशिबावर हवाला ठेवून पैसे कमवण्याची माणसाची वृत्ती अजबच म्हणायला हवी. आपल्यासारख्या नोकरी-धंदा करून, दिवसभर खपून भविष्याची चिंता करणाऱ्या मध्यमवर्गीयांना तिथली ती गर्दी पाहून 'आपण मूर्खपणा तर करत नाही आहोत' अशी शंका सुध्दा ये‍ईल कदाचित!! जुगार खेळणाऱ्यांच्यात स्त्रियांची संख्याही लक्षणीय होती. मी एक-दोन टेबलांपाशी थोडा वेळ थांबून इमानदारीत समोर काय चाललंय ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण ओ की ठो कळलं नाही. बरं, सगळे व्यवहार शांतपणे चाललेले. त्यामुळे कानावर पडणाऱ्या शब्दांतून काही आकलन व्हावं तर ते ही नाही!! मला तिथली सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे तिथल्या त्या खोट्या नाण्यांची वर्गवारी करणारी यंत्रं!! त्या यंत्रात नाणी टाकली की क्षणार्धात दुसऱ्या बाजूने त्या-त्या नाण्यांच्या किंमतींप्रमाणे त्यांचे वेगवेगळे गट बनून बाहेर यायचे. तेच पहायला नंतर मला जास्त मजा आली. थोड्या वेळानं मात्र त्या सिगारेटचा धूर भरून राहिलेल्या खोल्यांमध्ये गुदमरल्यासारखं व्हायला लागलं.... 'उंची वातावरणात मध्यमवर्गीयांचा जीव गुदमरतो' हे विधान शब्दशः खरं ठरलेलं पाहून मला हसू आलं!!

रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. पुन्हा एकदा अनेक सरकत्या जिन्यांवरून वर-खाली सरकून रेस्तरॉंपाशी पोचलो. प्रवेशद्वारापाशीच एका भिंतीला लागून अनेक उंच, पारदर्शक बाटल्यांमध्ये मसाल्यांचे निरनिराळे जिन्नस भरून ठेवलेले होते - नुसते देखाव्याला. आदल्या दिवशी जेवायला गेलो तेव्हा तिकडे लक्ष गेलं नव्हतं. एखाद्या रेस्तरॉंच्या अंतर्गत सजावटीचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. बघायला खरंच छान वाटलं.

... मलेशियात येऊनसुध्दा चोवीस तास उलटून गेले होते. प्रामाणिकपणे सांगायचं तर 'एक दिवस थीम पार्कमध्ये' या गोष्टीबद्दल आधी मी म्हणावी तेवढी उत्सुक नव्हते. दिवसभर आदित्य मजा करेल आणि आपल्याला फक्त त्याच्या मागेमागे फिरावं लागेल अशी काहीशी माझी कल्पना होती. पण चोवीस तासांनंतर माझं मत पूर्णपणे बदललेलं होतं. आदित्यच्या बरोबरीनं आम्ही पण तेवढीच धम्माल केली होती....आणि एक गोष्ट नक्की होती - जसा पॅरासेलिंगचा दिवस माझ्या कायम स्मरणात राहणार होता तसाच हा थीम पार्कमधला एक दिवस आदित्य कधीही विसरणार नव्हता....!!!

No comments: